|Friday, February 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » महिलेचे व्हिडीओ चित्रीकरण करणास चोप

महिलेचे व्हिडीओ चित्रीकरण करणास चोप 

प्रतिनिधी/ कराड

एसटीत प्रवास करताना प्रवासी महिलेचे मोबाईलमध्ये व्हिडीओ चित्रीकरण करणारास बेदम चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. कोल्हापूर-भोर एसटीतील या प्रकाराने इतर प्रवाशांसह महिलेच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त करत संशयिताविरोधात कराड शहर पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी संशयिताचा मोबाईल हस्तगत केला असून त्याच्याकडे चौकशी सुरू आहे. उदय रामचंद्र चव्हाण (वय 56 रा. इचलकरंजी) असे संशयिताचे नाव आहे.

  पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, कोल्हापूर-भोर एसटी नेहमीप्रमाणे कोल्हापूरकडून निघाली. एसटीत कराड, साताऱयासह इतर प्रवासी बसले होते. एसटी कोल्हापूरपासून निघाल्यानंतर एक प्रवासी इसम त्याच्या समोरच्या सीटवर बसलेल्या महिला प्रवाशाचे मोबाईलमध्ये चोरून व्हिडीओ चित्रीकरण करत होता. त्या महिला प्रवाशास झोप लागली असल्याने त्यांचे याकडे लक्ष नव्हते. संशयित मोबाईलवर रूमाल ठेवून प्रवासी महिलेचे बराचवेळ व्हिडीओ चित्रीकरण करत असल्याचे अन्य एका युवकाच्या लक्षात आले. त्याने हा प्रकार महिला एसटी वाहकाच्या लक्षात आणून दिला. वाहकानेही चित्रीकरण करणाराची हालचाल पाहून खात्री केली. त्यानंतर वाहकाने ज्या महिलेचे चित्रीकरण होत आहे, त्या महिलेस जागे करून हा प्रकार सांगत सावध केले. तोपर्यंत एसटी कराडजवळ आली होती. महिलेच्या नातेवाईकांना हा प्रकार समजल्यावर त्यांच्यासह इतर प्रवासीही संतप्त झाले. त्यांनी संशयितास बेदम चोप देण्याचा प्रयत्न केला. कोल्हापूर नाक्यावर आल्यावर वाहतूक पोलीस दिसल्यावर एसटी थांबवली. वाहतूक पोलिसाला हा प्रकार वाहक सांगत असताना संशयिताने एसटीतून उडी मारण्याचा प्रयत्न केला. पोलिसाने त्याला अटकाव करत एसटी थेट कराड पोलीस ठाण्यात आणली. संशयिताला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. पोलिसांनी त्याच्याकडील मोबाईल काढून घेत तपासला. त्याने महिलेचे चित्रीकरण केल्याचे समोर आल्यावर पोलिसांनी संशयितास ठाणे अंमलदार कक्षात बसवले. महिलेची तक्रार घेऊन संशयितावर गुन्हा दाखल करण्यात आला. 

 

शासकीय नोकर… म्हणत हात जोडले

महिलेचे मोबाईलमध्ये व्हिडीओ चित्रीकरण करणाऱयास पोलीस ठाण्यात आणल्यावर त्याच्याकडे पोलिसांनी चौकशी केली. माझी मुलगी कराडात राहते, तिला भेटायला आल्याचे सांगत आपण शासकीय नोकर असून घडल्या प्रकाराबाबत माफी असावी, असे तो वारंवार म्हणत होता. पोलिसांसह त्या महिलेच्या नातेवाईकांकडे हात जोडत होता. त्याच्या शासकीय नोकरीची चौकशी सुरू होती.

Related posts: