|Friday, February 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » रंगभूमीवरील सर्व बंधने हटविली पाहिजेत

रंगभूमीवरील सर्व बंधने हटविली पाहिजेत 

डी. डी. कोसंबी विचार महोत्सवाचे उद्घाटन

प्रतिनिधी/ पणजी

एका बाजुने जग जागतिकरणाच्या दिशेने वेगाने जात आहे तर दुसऱया बाजुने राष्ट्रीयता आणि संस्कृती पोकळ होत चालली आहे. बेगडी राष्ट्रप्रेम दिसत असून एकमेकांमधील द्वेश आणि जातीयवाद अधिक उफाळून येतो. रंगमंचाबाहेर चाललेल्या या नाटकाचा पर्दाफाश फक्त रंगभूमीच करू शकते. त्यासाठी रंगभूमीवरील सर्व बंधने हटवली पाहिजेत, असे प्रतिपादन ज्येष्ठ रंगकर्मी, साहित्यिक, नाटय़लेखक, कादंबरीकार वस्तुशिल्पकार मकरंद साठे यांनी केले.

11 व्या डी डी कोसंबी विचार महोत्सवाला काल मंगळवार 13 फेब्रुवारीपासून प्रारंभ झाला असून या व्याख्यान मालेचे पहिले पुष्प मकरंद साठे यांनी गुंफले. जागतिकीकरणाच्या काळातील राष्ट्रीयता आणि रंगभूमी या विषयावर त्यांनी आपले विचार मांडले.

आपण निराशावादी नाही, मात्र जग ज्या दिशेने जात आहे ते पाहाता एकामेकांबद्दल द्वेश भावनाच जास्त उफाळून येत असल्याचे ते म्हणाले.

भारत एकाचवेळी जगतोय वेगवेगळय़ा काळात

भारत एकाच वेळी वेगवेगळय़ा काळात जगत आहे. काही लोक अत्यंत पुढारलेले आहेत. त्यांना डोळय़ांनी फक्त पैसा दिसतो, राष्ट्रीयता, देशप्रेम कशाशी खातात हेही त्यांना माहीत नाही. काही जणांना धर्म, देश, जात, आदी अफुची गोळी वाटते. ते अशा प्रकारे जगतात जसे काय त्यांना वास्तव माहितच नाही. आपले तेच खरे करीत ते टोकाची भूमिका घेताना दिसतात. तिसऱया प्रकारच्या लोकांच्या विश्वात फक्त अज्ञान असते. जेवढे आम्ही प्रगत होऊ तेवढे विशाल विचारांचे होण्याऐवजी संकुचित होत चालल्याचे त्यांनी दु:ख व्यक्त केले.

उघड उघड चाललेय ते काय

अमेरिकेत जागतिक कला प्रदर्शन होते. जगाच्या कानाकोपऱयातून चित्रकारांनी सहभाग घेतला, पण सात देशातील चित्रकारांना अमेरिकेने प्रवेश नाकारला. कारण ते बंदी घातलेल्या देशातील नागरिक होते. कला, संगीत, नाटक, साहित्य याला जात, धर्म, भाषा, देशाच्या सिमा बांधू शकत नाही, असे बोलले जायचे पण आता उघड उघड काय चालले आहे? असा प्रश्न त्यांनी केला.

लोकशाही पद्धतीने हुकुमशाहीचीच निवड

लोकशाही असलेल्या देशात लोकशाही पद्धतीने हुकुमशाहीच निवडून देतात असा आरोप करताना लोकशाहीची भारतातही पायमल्ली चालल्याचे ते म्हणाले. निवडून आलेला प्रत्येक नेता एकाधिकारशाही चालवतो. ज्या देशात हुकुमशाही आहे त्याना मात्र दोष दिला जातो.

देशप्रेम हे द्वेशभाव वाढवण्यासाठीच?

देशभक्ती, देशप्रेम हे फक्त भारत पारतंत्र्यात होता तेव्हाच अस्तित्त्वात होते की काय, असा प्रश्न आपल्याला पडतो असे सांगताना स्वतंत्र भारतात देशप्रेम हे द्वेशभाव वाढवण्यासाठीच अधिक वापरले जाते, असा आरोप त्यांनी केला.

राजकारण्यांना साहित्याशी देणेघेणे नाही

पूर्वीच्या काळातील सर्व राजकारणी साहित्याशी निगडित होते. नाटककार होते. आताच्या राजकारण्यांना साहित्याशी काहीच देणे घेणे नसल्याचे ते म्हणाले. स्वातंत्र्यलढय़ात चळवळ उभारण्यास ज्या प्रमाणे रंगमंचाने सिंहाचा वाटा उचलला त्याच प्रमाणे समाजातील तमोगूण दूर सारण्यासाठी विद्यमान रंगमंच विविध प्रयोग करीत आहे. या रंगमंचाला स्वातंत्र्य हवे, कुठल्याच बंधनात अडकवता कामा नये असे सांगतानाच सिरियल आणि सिनेमाचे अनुकरण रंगमंचाने करू नये, असे ते म्हणाले.

पूर्वी अभ्यासक्रमात शेक्सपियराची नाटके सक्तीने शिकावी लागायची. आता अभ्यासक्रमात नाटके वगळत चाललीत. प्रत्येक विद्यार्थ्यांला नाटक शिकावेच लागेल असा अभ्यासक्रम असावा असा विचार त्यांनी मांडला. नाटक शिकता शिकता स्वत:च्या जीवनातील गुपितेही उलगडली जातात, असे ते म्हणाले.

डी. डी. कोसंबी विचार महोत्सवाचे उद्घाटन कला व संस्कृतीमंत्री गोविंद गावडे यांच्या हस्ते झाले. विचार केवळ विचार न राहता तो प्रत्यक्षात आला पाहिजे, असे सांगताना प्रत्येकाने त्यासाठी योगदान द्यावे असे आवाहनही त्यांनी केले. कला सचिव दौलत हवालदार यांनी उपस्थितांचे स्वागत पेले. विचार हा दिशादर्शकाप्रमाणे आहे तो मार्ग सूचवतो. त्याची अंमलबजावणी आपल्या हातात असते. जीवनात चांगले विचारच नाहीत अशी स्थिती अधिक धोक्याची असल्याचे ते म्हणाले. विक्रांत नाईक यांच्या इशस्थवनाने कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. खात्याचे संचालक गुरूदास पिळर्णकर यांनी फळांची परडी देऊन पाहुण्यांचे स्वागत केले. आनंद माथूर यांनी कार्यक्रमाची सूत्रे सांभाळली.

Related posts: