|Friday, February 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » फोंडा, धारबांदोडा तालुक्यात महाशिवरात्रीचा जागर

फोंडा, धारबांदोडा तालुक्यात महाशिवरात्रीचा जागर 

प्रतिनिधी/ फोंडा

फोंडा व धारबांदोडा तालुक्यातील विविध शिवमंदिरामध्ये मंगळवारी महाशिवरात्री उत्सव भक्तीभावाने साजरा करण्यात आला. अभिषेक व देव दर्शनासाठी पहाटेपासून भाविकांची रिघ लागली होती.

तांबडीसुर्ल येथील प्राचिन शिवमंदिर, आगापूर येथील प्राचिन माधव रामेश्वर मंदिर, कपिलेश्वरी येथील श्री कपिलेश्वर, ढवळी येथील श्री कमळेश्वर या प्राचिन मंदिरांसह, शिरोडा येथील शिवनाथ तसेच तालुक्यातील गणनाथ, सोमनाथ व इतर महादेव मंदिरांमध्ये दिवसभर धार्मिक विधी व इतर कार्यक्रमांची रेलचेल सुरु होती.

तांबडी सुर्ल येथील स्वयंभू शिवलिंग असलेल्या प्राचिन महादेव मंदिरात शिवरात्री उत्सवासाठी गोव्यातील विविध भागातून भाविकांनी पहाटेपासून उपस्थिती लावली होती. येथील शिवलिंगावर भाविकांनी स्वहस्ते दुग्धाभिषेक व बेलपत्रे वाहून प्रार्थना केली. हजारो भाविकांची दिवसभर दर्शनासाठी गर्दी लागून राहिली होती. आगापूर येथील श्री रामेश्वर माधव मंदिर हेही प्राचिन शिवमंदिर असून या मंदिरातही अभिषेकासाठी भाविकांची रिघ लागली होती. दिवसभर शिवनाम जप व इतर धार्मिक विधी, भाविकांसाठी महाप्रसाद व रात्री सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले. फोंडय़ातील ग्रामदैवत असलेल्या श्री कपिलेश्वर व याच पंचायतनातील ढवळी येथील श्री कमळेश्वर या प्राचिन मंदिरातही शिवरात्री उत्सव साजरा करण्यात आला. शिरोडा येथील श्री शिवनाथ, बोरी येथील सिद्धनाथ पर्वत, श्री शिवेश्वर मंदिर, निरंकाल येथील गणनाथ, पार उसगाव येथील गणनाथ, बेतोडा येथील श्री महादेव या व इतर मंदिरामध्ये महाशिवरात्री उत्सव साजरा करण्यात आला.

फोंडा परिसरातील श्री मंगेश देवस्थानमध्ये महाशिवरात्री उत्सव मोठय़ा स्वरुपात साजरा केला जातो. त्यामुळे मंगेश देवस्थानमध्येही भाविकांची दिवसभर दर्शनासाठी गर्दी होती. रामनाथी येथील श्री रामनाथ देवस्थानच्या वार्षिक जत्रोत्सवाला शिवरात्रीपासून सुरुवात झाली. मोठय़ा मंदिरांबरोबरच तालुक्यातील छोटय़ामोठय़ा मंदिरांमध्येही महाशिवरात्रीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. बहुतेक मंदिरामध्ये रात्री उशिरापर्यंत उत्सवाचा माहोल होता. चिन्मय मिशन, फोंडा आश्रमात शिवनाम जप व इतर धार्मिक विधी पार पडले.

 

Related posts: