|Monday, July 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » महानगरपालिकेचा शिलकी अर्थसंकल्प सादर

महानगरपालिकेचा शिलकी अर्थसंकल्प सादर 

16 लाख 17 हजार शिलकी अंदाजपत्रकाचे सादरीकरण

प्रतिनिधी / बेळगाव

निधी, खर्च, शिल्लक यांचा ताळेबंद साधत महापालिकेचे अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक सादर करण्यात आले. मालमत्ता कर, ज्येष्ठ नागरिकांसाठी नाना-नानी पार्कची व्यवस्था, मुलांसाठी मैदाने आणि उद्यानांचा विकास, जाहिरात कर, परवाना, याशिवाय शहर विकासाच्यादृष्टीने बेळगाव महानगरपालिकेच्या 2018-19 सालच्या अंदाजपत्रकात आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. एकूण 318 कोटी 52 लाख 26 हजार रुपये जमापैकी 318 कोटी 36 लाख रुपये खर्च दर्शविण्यात आला आहे. त्यामुळे 16 लाख 17 हजार रुपयांचे शिलकी अंदाजपत्रक महापालिकेत सादर झाले आहे.

2018-19 सालचे अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक मांडण्यासाठी आणि 2017-18 सालच्या सुधारित अंदाजपत्रकावर चर्चा करण्यासाठी बेळगाव महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये बैठक बोलाविण्यात आली होती. महापौर संज्योत बांदेकर यांच्या अध्यक्षतेखाली अर्थ स्थायी समितीचे चेअरमन संजय सव्वाशेरी यांनी अर्थसंकल्प सादर केला. प्रारंभी महापौर संज्योत बांदेकर, मनपा आयुक्त शशीधर कुरेर, उपमहापौर नागेश मंडोळकर, सत्ताधारी पक्षाचे गटनेते पंढरी परब, विरोधी पक्षाचे नेते दीपक जमखंडी यांच्या हस्ते अर्थसंकल्पीय प्रतींचे अनावरण करण्यात आले.

अर्थसंकल्पाच्या प्रती लोकप्रतिनिधींच्या हातात मिळताच ऍड. रतन मासेकर आणि नगरसेविका सरला हेरेकर, माजी उपमहापौर संजय शिंदे यांनी संबंधित अर्थसंकल्पीय प्रतींमध्ये त्रुटी असून अर्थ स्थायी समितीच्या अध्यक्षांची नावे नाहीत. शिवाय अनुक्रमांकानुसार 18 अधिकाऱयांऐवजी 16 अधिकाऱयांची नावे आहेत. प्रत्यक्षात 58 नगरसेवक असताना 56 नगरसेवकांची नावे नमूद करण्यात आली असून 2 नगरसेवकांची नावेच नाहीत. नावातच इतक्या त्रुटी आहेत तर आकडेवारीतदेखील त्रुटी असतील, असे म्हणत सभात्याग करण्याचा इशारा दिला. नगरसेवक सोंटक्की यांनी या चुका गंभीर असून संबंधित अधिकाऱयांवर कारवाई करावी, अशी मागणी केली. यामुळे अर्थसंकल्प सादर करण्याआधीच बैठक वादळी ठरली.

याबाबत मनपा आयुक्त शशीधर कुरेर यांनी छपाईमध्ये अनावधानाने चुका झाल्या असून यामध्ये दुरुस्ती करण्यात येईल, असे नमूद करत अर्थसंकल्प सादर करण्यास मुभा द्यावी, असे सांगून अर्थसंकल्प सादरीकरणास प्रारंभ करावा, असे सांगितले. लोकप्रतिनिधी तसेच समितीच्या अध्यक्षांना विश्वासात न घेता अर्थसंकल्प मांडण्यात आल्याचा आरोपदेखील बैठकीत करण्यात आला. सदर बजेट स्वप्नवत असून जे साध्य करू शकणार आहोत त्याबाबतच्या तरतुदी अर्थसंकल्पात नाहीत. उद्देश समोर ठेवून अर्थसंकल्प सादर होणे गरजेचे होते. मात्र, पाण्याचा अपव्यय होऊ नये म्हणून पाण्याच्या टाकीला बसविण्यात येणारे सेन्सर, उद्यानांच्या विकासासाठी करण्यात येणारा खर्च व इतर नागरी सुविधा यासाठी खर्चाची तरतूद करण्यात आली आहे. मात्र, उद्यानांच्या देखभालीसाठी तरतूद नसल्याचे मत गटनेते पंढरी परब यांनी मांडले. यावेळी संबंधित अधिकाऱयांनी देखभालीसाठी 25 लाखाच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे, असे सांगितले.

महसूल वाढीसाठी अर्थसंकल्पात तरतूद

या अर्थसंकल्पात महसूल वाढीबाबत प्रस्ताव मांडण्यात येईल, अशी आशा होती. मात्र, प्रामुख्याने यासाठी विशेष तरतूद करण्यात आली नाही. नवीन इमारतींचे बांधकाम, बाजारपेठांमध्ये गाळे भाडेतत्त्वावर, पार्किंग सुविधा, व्यवसायाचा परवाना यांच्या माध्यमातून महसूल गोळा करण्यात येणार आहे. मात्र, महापालिकेच्या जागा विकून महसूल गोळा करणे याविषयीच चर्चा होत असून मनपाचे महसूल वाढविण्याकडे दुर्लक्षच होत आहे. यामुळे संबंधित प्राप्तिकर अधिकारी बदलण्याची गरज आहे, असे मत नगरसेवक किरण सायनाक यांनी व्यक्त करत महसूल वाढीसंदर्भात विशेष तरतूद नसल्याचे मत व्यक्त केले. शिवाय संबंधित अर्थसंकल्प आर्टीफिशियल आहे. खर्चावर नियंत्रण ठेवून महसूल वाढीवर लक्ष केंद्रित करावे, असे नमूद केले.

महापालिका अर्थ स्थायी समितीचा पाया आहे. यामुळे महापालिकेचे अंदाजपत्रक पारदर्शक असावे. वर्षभराचा लेखाजोखा असल्याने संबंधित अर्थ स्थायी समितीच्या चेअरमन आणि सभासदांनी त्याची पडताळणी करून ते मांडावे. मात्र, सदर अर्थसंकल्प मागील वर्षाप्रमाणेच असून यामध्ये कोणतीच भर पडली नसल्याचे नगरसेवक ऍड. रतन मासेकर यांनी सांगितले.

चौकट

मनपा अपघात जीवन विमा योजना राबवा

बेळगावची स्मार्ट सिटीकडे वाटचाल सुरू आहे. यामुळे अंदाजपत्रकात प्रामुख्याने स्मार्ट सिटीच्या धर्तीवर ओपन जीम, महापालिकेच्या आवारात कॅन्टीन, कॉर्पोरेशन बँक सर्वत्र नसल्याने कॅश काऊंटर तसेच दाणे गल्ली, शहापूर येथील भाजी मार्केटप्रमाणे व्यवसाय-व्यापारासाठी सोय म्हणून तरतूद करण्यात यावी. याशिवाय आरोग्याच्या दृष्टिकोनातून शहरांतर्गत होणाऱया अपघातांसाठी मनपा अपघात जीवन विमा याची सोय करण्याबाबत विचार व्हावा, असे मत गटनेते पंढरी परब यांनी व्यक्त केले.

 अर्थसंकल्पातील तरतुदी…

महापालिकेच्या अर्थसंकल्पामध्ये खर्च, नवीन तरतुदी, नागरी सुविधा,  देखभालीसाठी खर्चाची विभागणी करण्यात आली असून नवीन सुविधांमध्ये प्रामुख्याने महिलांसाठी शहर मर्यादित क्षेत्रात नवीन टॉयलेटची व्यवस्था करण्यात येणार आहे. शहरातील दुर्लक्षित आणि विकासकामे न झालेल्या भागात, झोपडपट्टी भागात सुविधांसाठी तरतूद करण्यात आली आहे. दिव्यांगांसाठी विशेष सोयीची तरतूद, याबरोबरच ज्येष्ठ नागरिकांसाठी 3 ठिकाणी नाना-नानी पार्कची उभारणी करण्यात येणार आहे. यामध्ये प्रामुख्याने म. फुले उद्यान वडगाव, चन्नम्मानगर पोस्टल कॉलनी व इतर नियोजित ठिकाणी 50 लाख खर्च करून नाना-नानी पार्क उभारण्याची तरतूद करण्यात आली आहे. गल्लीला मार्गदर्शक फलकांसाठी 50 लाखाची तरतूद, 4 कोटी कमर्शियल इमारतींसाठी, 1 कोटी 50 लाख मार्केटसाठी खर्च करण्यात येणार आहेत. विद्युत बचतीसाठी विविध योजना राबविण्याची तरतूद करण्यात आली आहे. याशिवाय शहराच्या स्वच्छता, उद्यान, मैदाने, महापौर चषक स्पर्धा, अधिकाऱयांचा अभ्यासदौरा, देखभाल, प्रदूषण नियंत्रणासाठी आवश्यक खर्चाबाबतचा ताळेबंद नमूद करण्यात आला आहे.