|Thursday, August 22, 2019
You are here: Home » उद्योग » 2020 पर्यंत ऑनलाईन खरेदी 100 अब्ज डॉलर्सवर

2020 पर्यंत ऑनलाईन खरेदी 100 अब्ज डॉलर्सवर 

मुंबई / वृत्तसंस्था :
2020 पर्यंत ग्राहकांकडून ऑनलाईन खर्च 2.5 पटीने वाढण्याची अपेक्षा आहे. ई व्यापार, प्रवास, हॉटेल, अर्थसेवा, डिजिटल मीडिया यामुळे हा खर्च 100 अब्ज डॉलर्सवर पोहोचेल असे अहवालात म्हणण्यात आले. ऑनलाईन प्रकारात डिजिटल माध्यमातून 40 अब्ज डॉलर्सचा खर्च सध्या भारतीयांकडून करण्यात येतो.
ई व्यापारामध्ये अपॅरल, एक्सेसरीज, ग्राहकोपयोगी इलेक्ट्रॉनिक्स, ग्राहकोपयोगी वस्तू, अन्न आणि किराणा माल या वस्तूंची सर्वाधिक खरेदी करण्यात येते. सध्या साधारण या सर्व प्रकारातील खरेदी 18 अब्ज डॉलर्सवर आहे. 2020 पर्यंत ती 40 ते 45 अब्ज डॉलर्सवर पोहोचण्याचा अंदाज आहे बोस्टन कन्सल्टिंग ग्रुपने गुगलच्या साहाय्याने प्रकाशित करण्यात आलेल्या अहवालात म्हणण्यात आले.
हॉटेल आणि प्रवास यासाठी डिजिटल देयकांची आकडेवारी 2020 पर्यंत 20 अब्ज डॉलर्सवर पोहोचेल. सध्या 11 अब्ज डॉलर्सचे व्यवहार करण्यात येतात. याचप्रमाणे अर्थसेवा क्षेत्रातील ऑनलाईन उलाढाल 12 अब्ज डॉलर्सवरून 30 अब्ज डॉलर्स, डिजिटल मिडीयामध्ये 20 कोटी डॉलर्सवरून 57 कोटी डॉलर्सवर पोहोचण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला. गेल्या चार वर्षात ऑनलाईन व्यवहार करणाऱया वापरकर्त्यांची संख्या दुप्पट होत 43 कोटीवर पोहोचली आहे. स्वस्त स्मार्टफोन, कमी किमतीत डेटा, मोबाईल ऍप आणि स्थानिक भाषेत मजकूर यामुळे वापरकर्त्यांची संख्या वेगाने वाढत आहे.
35 वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱया निमशहरी भागातील महिला ग्राहकांमध्ये अधिक वाढ होण्याची शक्यता आहे. 75 ते 80 टक्के इंटरनेट वापरकर्ते अजूनही ऑनलाईन खर्च करत नाहीत. देशात डिजिटल मिडीयाचा वेगाने वापर होत असला तरी डिजिटल खर्चामध्ये वाढ होत नाही. ऑनलाईन क्षेत्रात पायाभूत सुविधा मजबूत केल्यास आणि डिस्काऊंट दिल्यास अधिक ग्राहकांमध्ये वाढ होईल असे म्हणण्यात आले.