|Saturday, May 25, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » महावितरण कर्मचाऱयांचे काम बंद आंदोलन

महावितरण कर्मचाऱयांचे काम बंद आंदोलन 

प्रतिनिधी /कोल्हापूर :

इचलकरंजी येथील कार्यकारी अभियंता आनंदराव शिंदे यांना तडकाफडकी सक्तीच्या रजेवर पाठवल्याच्या निषेधार्थ बुधवारी महावितरणच्या कर्मचाऱयांनी कामबंद आंदोलन केले. ही कारवाई करणाऱया प्रादेशिक संचालक संजय ताकसांडे यांचा निषेध करून त्यांच्या विरोधात निदर्शनेही करण्यात आली. 

निदर्शनामध्ये सहभागी झालेल्या कर्मचाऱयांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (10 फेब्रुवारी) महावितरणचे प्रादेशिक संचालक संजय ताकसांडे कोल्हापूर परिमंडळाच्या दौऱयावर आले होते. यावेळी त्यांनी जिह्यातील वीज कामगारांचा निर्धार मेळावा घेतला. थकबाकी शंभर टक्के वसूल करण्याची सूचना त्यांनी केली. त्यानंतर अभियंत्यांची बैठक घेतली. यावेळी त्यांनी कोल्हापूर जिह्याचे काम अत्यंत खराब आहे. वसुली नाही. वीज गळती अधिक आहे. तुम्ही नीट काम करत नाही. असे खडे बोल अभियंत्याना सुनावले. इचलकरंजी येथील कार्यकारी अभियंता आनंदराव शिंदे यांना तुमचे काम योग्य नाही. तुम्ही वीजेचे वितरण योग्य प्रकारे केलेले नाही असे सांगत त्यांच्यावर ताकसांडे यांनी आरोप केला. यावेळी शिंदे यांनी ठाम भुमिका घेऊन आपले काम उत्तम असल्याचे पुराव्यानिशी दाखवून दिले. यावेळी उलट उत्तर का दिले म्हणून ताकसांडे यांनी शिंदे यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचे आदेश दिले.

बुधवारी ही कारवाई करण्यात आली. त्यानंतर महावितरणच्या ताराबाई पार्क कार्यालयातील अभियंते, कर्मचारी, कार्यालयीन अधिकारी गेट समोर एकत्र आले. त्यांनी ताकसांडे यांच्या विरोधात निदर्शने केली. शिंदे यांच्या वरील कारवाई मागे घेण्याची मागणी केली. त्यानंतर दिवसभर कर्मचाऱयांनी कामबंद आंदोलन केले. दरम्यान संघटनांच्या पदाधिकाऱयांनी महावितरणचे मुख्य अभियंता किशोर परदेशी यांच्याशी संपर्क केला असता ते रजेवर असल्याचे समजले. शिंदे यांच्यावरील कारवाई बाबत ठोस निर्णय झाला नाही तर शुक्रवार पासून बेमुदत कामबंद आंदोलन करण्याचा निर्णय संघटनांनी घेतला आहे.

Related posts: