|Thursday, August 22, 2019
You are here: Home » विशेष वृत्त » गुजरातमधील एकमेव मराठी शाळाही इतिहासजमा होण्याच्या मार्गावर

गुजरातमधील एकमेव मराठी शाळाही इतिहासजमा होण्याच्या मार्गावर 

प्रशांत चव्हाण /  महाराजा सयाजीराव गायकवाड साहित्यनगरी, बडोदा

गुजरातमधील पहिली व सध्या अस्तित्वात असलेली एकमेक मराठी शाळा असा लौकिक असलेल्या महाराणी चिमणाबाई हायस्कूलमधील विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस घटतच चालली असून, ही शाळा आता इतिहासजमा होण्याच्या मार्गावर आहे.

महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी 11 नोव्हेंबर 1911 रोजी या शाळेची स्थापना केली. महाराजांच्या दिवंगत पत्नी महाराणी चिमणाबाई यांचे नाव या शाळेला देण्यात आले. परशुराम गणपुले यांनी या शाळेसाठी जागा दिली. त्यामुळे शाळेच्या या इमारतीला परशुराम बिल्डिंग असे संबोधतात. कवी माधव ज्युलियन यांनी या शाळेत अध्यापन केले असून, हरिभाऊ देसाई, नगरकर, सबनीस यांच्या नावानेही ही शाळा ओळखली जाते. क्रिकेटपटू अंशुमन गायकवाड, श्रीनिवास खळे यांच्यापासून अनेक दिग्गजांची या शाळेत जडणघडण झाली आहे. मात्र, ऐतिहासिक वारसा सांगणारी ही शाळा सध्या अत्यवस्थ स्थितीत आहे. साधारण 1997 च्या सुमारास या शाळेत 17 तुकडय़ा होत्या. त्यातील प्रत्येक तुकडीत 65 विद्यार्थीसंख्या होती. मात्र, आता एकूण विद्यार्थ्यांची संख्या केवळ 500 ते 600 पर्यंत खाली आली आहे. त्यामुळे या शाळेचे अस्तित्वच धोक्यात आले आहे.

पहिली ते बारावीपर्यंत असणाऱया या हायस्कूलमध्ये शिकणारी मुले प्रामुख्याने सर्वसामान्य कुटुंबातील आहेत. रोजंदारीवर काम करणाऱया पालकांची मुले या शाळेत असून, खासगी शाळेत परवडत नसल्याने त्यांनी आपल्या मुलांना या शाळेत प्रवेश घेतला आहे. असे असले, तरी शाळेत काही प्रमाणात आकारलेले जाणारे शुल्क व प्रवासखर्च यांचाही मेळ घालणे बेताच्या स्थितीमुळे शक्य होत नसल्याने दिवसेंदिवस शाळेतील विद्यार्थीसंख्या घटताना दिसत आहे. त्यामुळे ही शाळा टिकवायची असेल, तर महाराष्ट्र शासनाने या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती सुरू करणे गरजेचे आहे. अन्यथा, गुजरातमधील मराठी माध्यमाची ही एकमेव शाळाही इतिहासजमा होण्याची भीती व्यक्त होत आहे. सध्या या शाळेत प्राथमिक विभागात 320 विद्यार्थी असून, 10 शिक्षक आहेत. दुसरीकडे नगरपालिकेची पहिली ते आठवी अशी एकच मराठी शाळा असून, त्यात केवळ 120 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

मराठी विभागही संकटात

मराठी शाळेबरोबरच महाराजा सयाजीराव विद्यापीठातील मराठी विभागाचीही अवस्था बिकट आहे. कला शाखेतील 150 विद्यार्थ्यांनी मराठी ऐच्छिक विषय म्हणून घेतला आहे. मात्र, एमएला केवळ चारच विद्यार्थ्यांनी हा विषय घेतला आहे. त्यामुळे विद्यापीठातील मराठी विभागाचे अस्तित्वही धोक्यात आहे.