|Thursday, August 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » शिवाजी तरुण मंडळाकडून छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची जंगी शोभायात्रा

शिवाजी तरुण मंडळाकडून छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची जंगी शोभायात्रा 

शिवजयंती सोहळ्याला प्रारंभ : शोभायात्रेत शिवाजी पेठेतील दोन हजारांवर कार्यकर्त्याचा सहभाग

प्रतिनिधी/ कोल्हापूर

गेल्या 70 वर्षांपासून सामाजिक कार्याचा वसा घेऊन संपूर्ण महाराष्ट्रात लौकिक मिळविलेल्या शिवाजी पेठेतील शिवाजी तरुण मंडळाच्या वतीने शिवजयंती सोहळ्याला प्रारंभ करण्यात आला. या सोहळ्याचाच एक भाग म्हणून उभा मारूती चौकात प्रतिष्ठापना करण्यात येणाऱया छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 फुटी अश्वारूढ पुतळ्याची शुक्रवारी ऐतिहासिक दसरा चौकातून जंगी शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेत मंडळाचे दोन हजारांवर कार्यकर्ते वाहनांसह सहभागी झाले होते. त्यांनी शेकडो तिरंगे झेंडे लहरत शोभायात्रा मार्गातील सर्वांची लक्ष वेधून घेतले. तसेच क्षणाक्षणाला छत्रपती शिवाजी महाराज की जय, जयभवानी-जयशिवाजी, तुमचे आमचे नाते काय-जयजिजाऊ जयशिवराय अशा घोषणा देऊन शोभायात्रेचा मार्ग अक्षरशः गर्जुन सोडला.    

    दरम्यान, दुपारी दीड वाजता शिवाजी पेठेतील उभा मारूती चौकात शोभायात्रेची सांगता झाली. या चौकामध्येच मंडळाकडून उभारण्यात आलेल्या दुर्गराज किल्ले रायगडाच्या प्रवेशद्वाराच्या भव्य प्रतिकृतीमध्ये सायंकाळी 7 वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याची प्रतिष्ठापना करण्यात आली. पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. संजय पाटील यांच्या हस्ते पुतळा व रायगड प्रवेशद्वाराच्या प्रतिकृतीचे उद्घाटन करण्यात आले. तत्पूर्वी दुपारी मंडळाच्या वतीने दसरा चौकातून छत्रपती शिवाजी पुतळ्याची शोभायात्रा काढण्यात आली. शोभायात्रेसाठी जमलेल्या दोन हजारांवर कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत आमदार राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते पुतळ्याचे पूजन करण्यात आले. यावेळी माजी नगरसेवक रवीकिरण इंगवले, सचिन चव्हाण, शिवाजी तरूण मंडळाचे अध्यक्ष सुजित चव्हाण, सहसचिव सुरेश जरग, शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष विशाल बोंगाळे, उपाध्यक्ष अशेक देसाई, जयवंत अतिग्रे, सागर भालकर, सुरेश खोराटे, सुरेश साळोखे, संजय पडवळे, तुकाराम साळोखे, अजय दळवी, प्रताप देसाई आदी उपस्थित होते.

   ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, जय भवानी जय शिवाजी’ असा जयघोष करत आणि हातातील तिरंगे झेंडे लहरत कार्यकर्त्यांनी शोभायात्रेला प्रारंभ केला. दसरा चौकातून सुरू झालेल्या या शोभायात्रेने आयोध्या चित्रमंदिरच्या दिशेने प्रयाण केले. शोभायात्रा जशी पुढे-पुढे जाऊ लागली, तशी कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर गुलाबाच्या पाकळ्याची उधळण करण्याला सुरवात केली. ही शोभायात्रा बिंदू चौक, देवल क्लब, मिरजकर तिकटी, बिनखांबी गणेश मंदिर, निवृत्ती चौक आदी मार्गावरून फिरून उभा मारुती चौकात पोहोचली. यानंतर शेकडो कार्यकर्त्यांनी तब्बल 15 मिनिटे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा जयघोष करून चौक परिसर दणाणून सोडला. शोभायात्रेची सांगता झाल्यानंतर चौकात उभारलेल्या दुर्गराज किल्ले रायगडाच्या प्रवेशद्वाराच्या भव्य प्रतिकृतीमध्ये पुतळा विराजमान करण्यात आला.