|Monday, June 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » देशात विमानतळांसाठी 15 हजार कोटी खर्च करणार

देशात विमानतळांसाठी 15 हजार कोटी खर्च करणार 

प्रतिनिधी/ वास्को

ओडिशा, अरूणाचल प्रदेश व सिक्किम या राज्यांसह देशात अनेक शहरांमध्ये नवीन विमानतळ उभारले जाणार असून विमानतळ प्रकल्पांच्या विस्तारासाठी 15 हजार कोटी रुपये येत्या काळात खर्च करण्यात येणार आहेत. देशातील हवाई मार्गावर 900 अतिरीक्त विमानांची भर पडणार आहे, अशी माहिती भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. गुरुप्रसाद मोहापात्रा यांनी दिली.

डॉ. मोहापात्रा यांनी शुक्रवारी दाबोळी विमानतळाला भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत दाबोळी विमानतळाचे संचालक बी. सी. नेगी व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

हवाईक्षेत्राचा विकासदर वाढतोय

पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले की देशात हवाईक्षेत्राचा विकास दर वाढत आहे. वाढती गरज ओळखून देशात हवाई तळांची संख्याही वाढवण्यात येणार आहे. पश्चिम ओडिशा, अरूणाचल तसेच सिक्किम या तीन राज्यांत भारतीय विमानतळ प्राधिकरण नवे विमानतळ उभारत असून झारखंडसह देशातील कोलकाता, चेन्नई सारख्या शहरातही विमानतळ उभारण्यात येणार आहेत. काही विमानतळ खासगीकरणातून उभारण्यात येतील, असे मोहापात्रा यांनी सांगितले.

इलाहाबादमध्ये अकरा महिन्यात विमानतळ

अलाहाबाद शहरात अकरा महिन्यांत विमानतळ उभारण्याचे आव्हान भारतीय विमानतळ प्राधिकरणाने स्वीकारलेले असून येत्या वर्षी फेब्रुवारीमध्ये होणाऱया कुंभमेळय़ासाठी येणाऱया लाखो भाविकांची सोय नजरेसमोर ठेवून विमानतळाचे काम करण्यात येत आहे. तसेच इलाहाबाद शहरात शैक्षणिक सुविधांही वाढलेल्या असल्याने विमानतळांची गरज निर्माण झालेली आहे.

ओडिशा, सिक्कीममध्ये विमातनळ विकास

ओडिशातील विमानतळासाठी 200 कोटी खर्च करण्यात आलेले आहेत. हा विमानतळ एप्रिलमध्ये कार्यान्वित होईल. सिक्कीमच्या विमानतळासाठी 650 कोटी खर्च करण्यात येत आहेत. येणाऱया काळात विमानतळ इमारत प्रकल्पांच्या विस्तारासाठी आणि विमानतळांच्या विकासासाठी 15 हजार कोटी खर्च करण्यात येणार असल्याची माहिती डॉ. मोहापात्रा यांनी दिली. हवाई प्रवाशांची वाढती गरज पूर्ण करण्यासाठी देशात येणाऱया काळात 900 अतिरीक्त हवाई जहाजांची भर पडणार असल्याचे ते म्हणाले.

मोहापात्रा यांच्या हस्ते दाबोळीतील सेवांचे उद्घाटन

भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. गुरुप्रसाद मोहापात्रा यांच्या हस्ते हवाई प्रवासी आणि विमानतळ कर्मचाऱयांच्या सोयीसाठी हवाई सेवा नियंत्रण कक्षाचे उद्घाटन काल शुक्रवारी करण्यात आले. भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या देशातील 125 विमानतळापैकी आता दाबोळी विमानतळासह ही सुविधा 12 विमानतळांवर आहे. मोहापात्रा यांच्या हस्ते मदत आणि माहिती केंद्राचेही उद्घाटन करण्यात आले. यावेळी अंजली मोहापात्रा यांच्या हस्ते महिलांसाठी कॅन्सर रोगासंबंधीत जागृतीसाठी आरोग्य शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. भारतीय विमानतळ प्राधिकरण महिला कल्याण संघटना व गोवा मणिपाल हॉस्पिटल्स तसेच गोवा कॅन्सर सोसायटी यांनी संयुक्तरीत्या या मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते. अंजली महोपात्रा या भारतीय विमानतळ प्राधिकरण महिला कल्याण संघटनेच्या अध्यक्ष आहेत. यावेळी डॉ. गुरुप्रसाद मोहापात्रा, बी. एस. नेगी, मणिपाल हॉस्पिटल्सच्या डॉ. शुभा ज्योती उपस्थित होत्या.

150 कोटी खर्चून दाबोळी विमानतळाचा विकास

गोव्यात लवकरच मोपा विमानतळाचे काम सुरू होणार आहे. गोव्यातही हवाई प्रवाशांची संख्या वाढत आहे. गोवा हे पर्यटन केंद्र आहे. येणाऱया दहा वर्षांत मोठय़ा प्रमाणात विकास होणार आहे. त्यामुळे गोव्याला विमानतळाची गरज आहे. दाबोळी आणि मोपा हे दोन्ही विमानतळ सुरळीतपणे कार्यरत राहतील, असे ते म्हणाले. दाबोळी विमानतळाचा 150 कोटी खर्चून विकास करण्यात येणार आहे. विमानतळावरील जुनी इमारत पाडण्यात येत आहे. पुढील दोन महिन्यांत ही जागा उपलब्ध होईल. त्यामुळे अतिरीक्त विमानांच्या उड्डाणासाठी दाबोळी विमानतळावर सोय करणे शक्य  होईल. बहुमजली पार्किंग प्रकल्पही येत्या जूनमध्ये कार्यान्वित होईल. येत्या दोन वर्षांत दाबोळी विमानतळावर अनेक सुधारणांची कामे पूर्ण होतील. दाबोळी विमानतळाच्या सुरळीत सेवेत नौदलाचे योग्य सहकार्य मिळते, असे डॉ. मोहापात्रा म्हणाले.