|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » उपचारादरम्यान मुलीच्या मृत्यूने तणाव

उपचारादरम्यान मुलीच्या मृत्यूने तणाव 

मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाईकांचा नकार, गुन्हा दाखल झाल्यानंतर तणाव निवळला

प्रतिनिधी/ कराड

आजारी असलेल्या बारा वर्षांच्या मुलीचा उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मुलीचा मृत्यू झाल्याचा आरोप करून नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिल्याने तणाव निर्माण झाला होता. शुक्रवार 16 रोजी रात्री ही घटना घडली. उपचारात हलगर्जीपणा करणाऱया डॉक्टरवर गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्याची मागणी करत नातेवाईकांसह ग्रामस्थांनी शहर पोलीस ठाण्यात गर्दी केली. साक्षी दीपक कवळे (वय 12, रा. चोरे, ता. कराड) असे रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे. 

दरम्यान, याबाबत शहर पोलिसांत गुन्हा दाखल झाल्यानंतर शवविच्छेदन करून नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतल्याने तणाव निवळला. 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, साक्षी कवळे हिच्या पोटात दुखत असल्याने तिच्यावर उंब्रज येथील पाटील हॉस्पिटलमध्ये प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी तिला कराड येथील निकम हॉस्पिटलमध्ये दाखल केले. पोटात जास्त दुखत असल्याने तिच्यावर शस्त्रक्रिया करणे गरजेचे असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. शस्त्रक्रिया सुरू असताना साक्षीच्या हालचालीमध्ये संशयास्पद बदल झाला. त्यामुळे तिला अधिक उपचारासाठी निकम हॉस्पिटल येथून एका नामांकित  हॉस्पिटलमध्ये नेण्याचा निर्णय झाला. तेथे नेल्यानंतर ती मयत असल्याचे तेथील डॉक्टरांनी सांगितले. त्यामुळे निकम हॉस्पिटलमध्येच डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे साक्षीचा मृत्यू झाल्याचा आरोप करून नातेवाईकांनी तिचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला.

शुक्रवारी रात्री ही घटना घडल्यानंतर शनिवारी सकाळी साक्षीच्या नातेवाईकांनी रुग्णालयातील सर्व रिपोर्ट आम्हाला मिळावेत, अशी मागणी करत आक्रमक पवित्रा घेतल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे रुग्णालयातील कर्मचाऱयांनी रुग्णालयाचा मुख्य दरवाजा बंद करून घेतला. त्यानंतर चोरे येथील ग्रामस्थ व साक्षीच्या नातेवाईकांनी शहर पोलीस ठाण्याकडे आपला मोर्चा वळवला. येथे त्यांनी संबंधित डॉक्टरवर गुन्हा दाखल करून त्याला अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा घेतला. यावेळी मोठी गर्दी जमल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

दरम्यान, चौकशी करून दोषी असल्यास कायदेशीर करवाई करण्याचे आश्वासन पोलीस अधिकाऱयांनी दिले. शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांनी  ताब्यात घेतला. याबाबतची फिर्याद प्रकाश ज्ञानू कवळे यांनी शहर पोलिसात दिली आहे.  तपास पोलीस उपनिरीक्षक खाडे करत आहेत.