|Saturday, August 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » बहारदार सतारवादन आणि गायनाने रंगली मैफल

बहारदार सतारवादन आणि गायनाने रंगली मैफल 

प्रतिनिधी /मिरज :

प्रसिध्द तंतूवाद्य निर्माते आबासाहेब सतारमेकर यांच्या जन्मशताब्दी निमित्त आयोजित संगीत सभेत ख्यातनामक सतारवादक पं. विदूर महाजन व त्यांच्या कन्या, अभिनेत्री नेहा महाजन यांचे बहारदार सतारवादन झाले. तर अमेरीकेच्या पंडीत मनू श्रीवास्तव यांचे सुरेल गायन झाले. सुमारे अडीच तास रंगलेल्या या मैफीलीचा आनंद रसिकांनी मनमुरादपणे लुटला.

आबासाहेब सतारमेकर यांच्या जन्मशताब्दी संगीत सोहळ्याची सांगता शनिवारी रात्री झाली. प्रारंभी प्रसिध्द हृदयरोगतज्ञ डॉ. रियाज मुजावर यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. अध्यक्षस्थानी उद्योजक, इंजिनिअर डी.एन.देशपांडे होते. स्वागत मजिद सतारमेकर यांनी केले. प्रास्ताविक जन्मशताब्दी सोहळा समितीचे अध्यक्ष ऍड. सुभाष बापट यांनी केले. यावेळी नौशादभाई सतारमेकर, उस्ताद रफिक नदाफ, हारुण सतारमेकर, मैनुद्दीन सतारमेकर, अल्ताफ सतारमेकर, नईम सतारमेकर, विनायक गोखले, संभाजी भोसले, विनायक गुरव उपस्थित होते.

उद्घाटनानंतर पहिल्या सत्रात पं. विदूर महाजन आणि अ†िभनेत्री नेहा महाजन यांचे सतार सहवादन झाले. त्यांनी ‘यमन’राग पेश केला. दीर्घ अशा आलापीनंतर जोड, झाला असे प्रकार बहारदारपणे सादर करीत त्यांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. पं. विदूर महाजन यांनी सतारवादनात वेगवेगळे प्रयोग करीत आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. ग्रामीण भागात सतारवादनाचा प्रसार व्हावा, यासाठी ते कार्यरत असतात. त्यांच्या कन्या अभिनेत्री नेहा महाजन यांनीही सतारवादनात हातखंडा मिळविला आहे. वडील विदूर महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी सतारवादनाच्या अनेक मैफीली गाजविल्या आहेत. महाजन पिता-पुत्रीचे बहारदार सतारवादन ऐकण्याची संधी या कार्यक्रमाच्या निमित्ताने मिरजकर श्रोत्यांना मिळाली. त्यांना तबला साथ मकरंद तुळाणकर यांनी केली.

दुसऱया सत्रात पं. मनू श्रीवास्तव (अमेरीका) यांचे सुरेल गायन झाले. त्यांनी मारुबिहाग राग पेश केला. या रागातील स्वरचित बंदीशी त्यांनी विलंबित आणि द्रुत लयीत सादर केल्या. त्यानंतर त्यांनी पं. रामप्रसाद झा यांच्या बंदीशी सुरेलपणे सादर करीत श्रोत्यांना श्रवणसुखाची अनुभुती दिली. त्यांना तबला साथ महेश देसाई, संवादिनी साथ सुधांशु कुलकर्णी यांनी केली. आभार संभाजी भोसले यांनी मानले. सुत्रसंचालन सौ. अर्चना दात्ये यांनी केले. सुमारे अडीच तास चालेल्या या मैफलीला रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.