|Tuesday, June 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » वालचंद महाविद्यालयावर शोककळा

वालचंद महाविद्यालयावर शोककळा 

प्रतिनिधी /सांगली :

किल्ले पन्हाळय़ावरून शिवज्योत आणण्यासाठी गेलेल्या अभियंत्यांच्या अपघाती मृत्यूमुळे वालचंद महाविद्यालयावर शोककळा पसरली. पाच उमद्या अभियंत्यांवर शिवजन्मदिनीच काळाने घाला घातल्याने वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालय परिसरात हळहळ होत आहे. दरम्यान, महाविद्यालयात शिवजयंतीनिमित्त आयोजित सर्व कार्यक्रम तात्काळ रद्द करण्यात आले. एमटीई सोसायटीमध्ये श्रध्दांजली वाहण्यात आली. 

अभियांत्रिकीत प्रतिष्ठेचे म्हणून ‘वालचंद’ची गणना केली जाते. महाविद्यालयामध्ये दरवर्षी शिवजयंती मोठय़ा उत्साहात साजरी केली जाते. यावर्षीही शिवजयंती निमित्त महाविद्यालयात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पन्हाळ्यावरुन शिवज्योत आणून दणक्यात शिवजयंती साजरी करण्याचा संकल्प विद्यार्थ्यांनी केला होता. मात्र नियतीच्या मनात काही वेगळेच होते.  आयशर ट्रकमधून शिवज्योत आणण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांवर काळाने झडप घातली. पन्हाळ्यावरुन शिवज्योत घेऊन येत असताना आयशर वाहनाला ठोकरल्याने झालेल्या अपघातात प्रणित शांताराम त्रेलोटकर (वय 19 रा. चेंबूर, टाटा कॉलनी, मुंबई), सुशांत विजय पाटील (वय 18 रा, तासगाव, सांगली), केतन प्रदीप खोचे (वय 21, तासगाव, सांगली) अरुण आंबादास भोदने (वय 21, रामगाव, बुलढाणा), सुमित संजय कुलकर्णी (वय 19, रा. विरळे, शाहूवाडी जि. कोल्हापूर) या पाच उमद्या अभियंत्यांचा मृत्यू झाला. तर 23 जण जखमी झाले. जखमीतील तीन जणांची प्रकृती गंभीर आहे.

परिसर सुन्न

दरम्यान, या घटनेचे वृत्त वालचंद महाविद्यालयात कळताच संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली. महाविद्यालयाचा परिसरा अक्षरशः सुन्न झाला होता. शिवजयंती निमित्त महाविद्यालयाला सुट्टी होती. त्यामुळे परिसरात आधीच शुकशुकाट होता. मात्र अपघाताची बातमी कळताच परिसरात विद्यार्थ्यांनी मोठय़ा संख्येने गर्दी केली. प्रत्येकाकडून अपघातामध्ये बळी पडलेल्या विद्यार्थ्यांबाबत हळवळ व्यक्त केली जात होती. प्रत्येकाच्या चेहरे चिंताग्रस्त झाले होते. अपघाताच्या घटनेनंतर शिवजयंती निमित्त आयोजित सर्व कार्यक्रम तात्काळ रद्द करण्यात आले. एमटीई सोसायटीमध्ये मृत विद्यार्थ्यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. तर मंगळवारी सकाळी 10 वाजता वालचंद महाविद्यालयामध्ये श्रध्दांजली वाहण्यात येणार असल्याची माहिती प्रा. कुलकर्णी यांनी दिली.

प्राचार्य, प्राध्यापक घटनास्थळी  

विद्यार्थ्यांच्या अपघातांचे वृत्त कळताच एमटीईचे अध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, सचिव प्रा. श्रीराम कानिटकर, सहसचिव सुरेंद्र चौगुले यांनीही सीपीआरला भेट देत जखमी विद्यार्थ्यांची विचारपूस केली. मयत विद्यार्थ्यांच्या पालकांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले. अपघातामधील मृत व जखमी विद्यार्थ्यांना शक्य तितकी मदत करु अशी ग्वाहीही यावेळी सचिव प्रा. कानिटकर यांनी दिली. महाविद्यालयाचे प्राचार्य जी. व्ही. परिशवाड यांच्यासी काही प्राध्यापक, कर्मचाऱयांनीही सीपीआरमध्ये जात जखमींची विचारपूस केली.

प्रतीक पाटील यांची सीपीआरला भेट

माजी केंद्रीयमंत्री प्रतीक पाटील यांनीही अपघाताचे वृत्त कळताच कोल्हापूरला धाव घेतली. हॉस्पिटलमध्ये जात जखमी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. अपघाताची माहिती घेतली. मृत विद्यार्थ्यांच्या पालकांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले. यावेळी शाहूवाडीचे पोलीस उपअधीक्षक आर.आर. पाटील, प्रा. राजेंद्र भोसले, प्रा. उदय दबडे, प्रा. बी. जे. पाटील, प्रा. संकपाळ, नगरसेवक तौफिक मुलाणी, आरोग्यमित्र बंटी सावंत, जीवरक्षक टीमचे दिनकर कांबळे, समाजसेवक विश्वनाथ बनसोडे उपस्थित होते.