|Saturday, July 20, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » कॅनडाच्या पंतप्रधानांचा गुजरात दौरा

कॅनडाच्या पंतप्रधानांचा गुजरात दौरा 

अहमदाबाद / वृत्तसंस्था :

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी सोमवारी अहमदाबादचा दौरा केला. या दौऱयादरम्यान ट्रुडो यांनी पत्नी आणि तिन्ही मुलांसमवेत साबरमती आश्रमाला भेट दिली. येथे त्यांनी चरखा चालविण्याचा अनुभव घेतला. आश्रमात पूर्ण ट्रुडो कुटुंब भारतीय पेहरावात दिसून आले. साबरमती आश्रमानंतर ट्रुडो यांनी अक्षरधाम मंदिरात जात दर्शन घेतले.

ट्रुडो यांनी साबरमती आश्रमाच्या अतिथी नोंदवहीत संदेश लिहिला. हे अत्यंत सुंदर ठिकाण असून येथे शांतता, सत्य आणि सद्भावना जोपासली गेल्याचे ट्रुडो यांनी नमूद केले. आश्रमात ट्रुडो पत्नी सोफी आणि मुलगे जेवियर, एला-ग्रेस, हेड्रियनसोबत पोहोचले होते. स्वतःच्या 7 दिवसांच्या दौऱयात ट्रुडो अमृतसर तसेच मुंबईचा दौरा करणार आहेत.

23 रोजी मोदींची घेणार भेट

23 फेब्रुवारी रोजी ट्रुडो हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अधिकृत भेट घेणार आहेत. ट्रुडो यांचा हा दौरा दोन्ही देशांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे. यात युरेनियम, खलिस्तान आणि दोन्ही देशांमधील व्यापाराच्या मुद्यावर चर्चा होऊ शकते. ट्रुडो पंतप्रधान म्हणून स्वतःच्या पहिल्या भारत दौऱयावर आले आहेत. मागील एक वर्षादरम्यान भारतातील कॅनडाची गुंतवणूक 15 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचल्याचे त्यांनी सांगितले. सरकार तसेच उद्योगक्षेत्राशी निगडित व्यक्तींसोबत ट्रुडो चर्चा करणार आहेत. त्याचबरोबर महिला सशक्तीकरण विषयक कार्यक्रमात ते सहभागी होतील.

अहमदाबादचे वाढते महत्त्व

-सप्टेंबरमध्ये जपानचे पंतप्रधान शिंजो अबे अहमदाबादमध्ये पोहोचले होते. त्यांनी मोदींसोबत रोड शो करत अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेन प्रकल्पाची कोनशिला ठेवली होती.

-17 जानेवारी रोजी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामीन नेतान्याहू यांनी मोदींसोबत साबरमती आश्रमाला भेट दिली होती. यावेळी एका तंत्रज्ञान विषयक केंद्राचे उद्घाटन करण्यात आले.

-2015 मध्ये मोदींसोबत चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांनी अहमदाबादचा दौरा केला होता. जिनपिंग यांचा गुजरात दौऱयाला आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी प्रसिद्धी मिळाली होती.