|Monday, June 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » शिवरायांनी आदर्श राज्याचा वस्तुपाठ घालून दिला

शिवरायांनी आदर्श राज्याचा वस्तुपाठ घालून दिला 

वार्ताहर /मडकई :

स्वराज्यातून सुराज्य निर्माण करताना छत्रपती शिवाजी महाराजांनी जात पात धर्म बाजूला ठेऊन सर्वांना एकत्र करीत आदर्श राज्य उभे केले. राज्य व राष्ट्र कसे चालवावे याचा आदर्श घालून दिला. शिवरायांचे विचार व आचरण आजच्या काळातही तेवढेच प्रभावी आहेत, असे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाम मंत्री सुदिन ढवळीकर यांनी केले.

 फर्मागुडी येथील राज्यस्तरीय शिवजयंती सोहळय़ात मंत्री ढवळीकर बोलत होते. मंत्री सुदिन ढवळीकर, कला व संस्कृतीमंत्री गोविंद गावडे यांच्यासह अन्य इतर मान्यवरांनी फर्मागुडी किल्ल्यावरील शिवरायांच्या अश्वारुढ पुतळय़ाला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. त्यानंतर गोपाळ गणपती देवस्थानच्या प्रांगणात झालेल्या कार्यक्रमाला व्यासपीठावर मंत्री सुदिन ढवळीकर व मंत्री गोविंद गावडे यांच्यासह माहिती आणि प्रसिध्दी खात्याचे संचालक टी. एस. सावंत, कवळे जिल्हा पंचायत सदस्य चित्रा फडते, सरपंच रामचंद्र नाईक, प्रमुख वक्ते इतिहास अभ्यासक डॉ. लहू गायकवाड, ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक औदुंबर शिंक्रे आदी उपस्थित होते.

 छत्रपती शिवाजी महाराज हे खऱयाअर्थाने युगपुरुष होते. त्यांच्यातील प्रत्येक गुण व्यक्ती व राष्ट्र उभारणीसाठी मार्गदर्शक ठरणारा आहे, असेही मंत्री ढवळीकर पुढे बोलताना म्हणाले.

शिवाजी महाराज उत्कृष्ट योद्धे होते, त्याच प्रमाणे उत्तम प्रशासकही होते. शिवकालीन इतिहास हा प्रत्येकासाठी काही ना काही प्रेरणा देणार आहे. त्यामुळे छत्रपतींच्या नावाने नुसता जयघोष न त्यांचे विचार आत्मसात करा, असे मंत्री गोविंद गावडे म्हणाले.