|Thursday, August 22, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » मालदीव संकट : भारत-चीन तणाव वाढणार

मालदीव संकट : भारत-चीन तणाव वाढणार 

हिंदी महासागरात चीनने पाठविल्या युद्धनौका : मालदीवच्या आणीबाणीप्रकरणी भारताची कठोर प्रतिक्रिया

वृत्तसंस्था/  नवी दिल्ली

भारताने मालदीवमधील राजकीय संकटावर कठोर भूमिका घेत तेथील आणीबाणी हटविण्याची मागणी केली आहे. परंतु कोणत्याही प्रकारच्या सैन्य हस्तक्षेपाचे संकेत देणे भारताने प्रकर्षाने टाळले आहे. दुसरीकडे चीनच्या युद्धनौकांनी हिंदी महासागरातील हालचाली वाढविल्याने तणावात भर पडली आहे. मालदीवमध्ये 15 दिवसांसाठी घोषित करण्यात आलेल्या आणीबाणीला आणखीन 30 दिवसांची मुदतवाढ मिळाल्याचे
समजते.

मालदीवचे अध्यक्ष अब्दुल्ला यामीन यांनी आणीबाणी 30 दिवसांसाठी वाढविण्याचा प्रस्ताव संसदेत मांडला होता. या मुद्यावर होणाऱया चर्चेसाठी सत्तारुढ प्रोगेसिव्ह पार्टीचे 39 खासदार उपस्थित राहिले, परंतु विरोधी खासदारांनी यावर बहिष्कार टाकला. मालदीव सरकार आणीबाणीत वाढ करणार नाही, अशी अपेक्षा असल्याचे सांगत तेथे राजकीय प्रक्रिया त्वरित सुरू केली जावी, अशी मागणी भारताने
केली.

लोकशाहीचे पालन व्हावे

आणीबाणी हटविण्यात आल्यानंतर न्यायपालिका समवेत सर्व लोकशाहीवादी संस्थांना पूर्ण स्वातंत्र्यासह काम करू दिले जावे. घटनेनुसार सर्व यंत्रणांमध्ये पारदर्शकता अवलंबिली जावी. मालदीवच्या सर्वोच्च न्यायालयाने 1 फेब्रुवारी रोजी दिलेल्या आदेशाचे पूर्णपणे पालन केले जावे. मालदीवने लवकरात लवकर लोकशाहीच्या मार्गावर परतावे. तेथे कायद्याचे शासन प्रस्थापित व्हावे, जेणेकरून जनतेच्या अपेक्षा पूर्ण होत आंतरराष्ट्रीय समुदायाच्या चिंता दूर होऊ शकतील असे भारताच्या विदेश मंत्रालयाने म्हटले आहे.

चीनच्या हालचाली वाढल्या

चीनने हिंदी महासागरात स्वतःच्या युद्धनौकांच्या हालचाली वाढवून मालदीव प्रकरणी हस्तक्षेप न करण्याचा संदेश भारताला देण्याचा प्रयत्न केला आहे. फेब्रुवारी महिन्यात चीनच्या 11 युद्धनौका पूर्व हिंदी महासागरात पोहोचल्या आहेत. या चिनी युद्धनौका महत्त्वाच्या ठिकाणी तैनात आहेत. मालदीव हिंदी महासागरातील महत्त्वाच्या व्यापारी मार्गावर स्थित असून तेथे चीन सातत्याने स्वतःचा प्रभाव वाढवतोय. मालदीवचे नवे संकट भारत आणि चीनमधील तणावाचे नवे कारण ठरले आहे.