|Saturday, May 25, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » मालवणात निषेध मोर्चातून ‘स्वाभिमान’चे शक्तिप्रदर्शन

मालवणात निषेध मोर्चातून ‘स्वाभिमान’चे शक्तिप्रदर्शन 

प्रशासकीय बंदी असूनही मोर्चा  निघालाच महिला वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

प्रतिनिधी / मालवण:

तहसीलदारांनी नाकारलेली परवानगी आणि जिल्हय़ात मनाई आदेश लागू असतानाही महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाने जाहीर केलेला निषेध मोर्चा मच्छीमार आणि स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त गर्दीत तहसील कार्यालयावर धडकला. माजी खासदार नीलेश राणे यांनी या मोर्चाचे नेतृत्व केले. भरड दत्त मंदिर, बाजारपेठ मार्गे तहसील कार्यालयावर हा मोर्चा नेण्यात आला होता. मोर्चासमोर येऊन तहसीलदार समीर घारे यांनी स्वाभिमानचे निवेदन स्वीकारले. मोर्चाच्या समारोपप्रसंगी राणेंनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना शिवसेनेच्या पालकमंत्री, आमदार व खासदारांवर सडकून टीका केली. पोलीस यंत्रणेकडून प्रथमच मोर्चाचे चित्रीकरण ड्रोन कॅमेऱयाच्या सहाय्याने करण्यात आले होते.

गोव्याच्या बोटींवर हल्लाबोल आंदोलन छेडल्यानंतर मच्छीमारांवर दरोडय़ाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यामुळे दोन मच्छीमारांसह सात खलाशांना अटक करण्यात आली होती. मच्छीमारांच्या अटकेच्या निषेधार्थ आणि गुन्हे दाखल करण्यासाठी पोलीस अधीक्षकांनी पुढाकार घेतल्याने महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाने निषेध मोर्चा काढण्याचे जाहीर केले होते. मोर्चासाठी तहसीलदारांनी मनाई आदेश असल्याने परवानगी नाकारली होती. पोलिसांनीही स्वाभिमान आणि मच्छीमार समाजातील नेत्यांना नोटीसा बजावून मोर्चा काढू नये, असे स्पष्ट केले होते. त्यामुळे मोर्चाबाबत किनारपट्टीवर चर्चा रंगली होती. महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचा मोर्चा असल्याने शहराला पोलीस छावणीचे स्वरुप प्राप्त झाले होते. प्रत्येक नाक्मयावर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात होता.

स्वाभिमानच्या मोर्चाला राष्ट्रीयस्तरावरील मच्छीमार कृती समितीचा पाठिंबा मिळाला होता. नरेंद्र पाटील, लिओ कोलासो, रामकृष्ण तांडेल, राजन मेहर, खलील वस्त आदी मच्छीमार नेत्यांसह मच्छीमार संघटनांचे नेते सहभागी झाले होते. तसेच स्वाभिमानचे जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत, सतीश सावंत, अशोक सावंत, मंदार केणी, संदीप कुडतरकर, बाळू कोळंबकर, संजू परब, सुदेश आचरेकर, गोटय़ा सावंत, बाबा परब, महेश जावकर, राजू बिडये, अभय कदम, लिलाधर पराडकर, भाई मांजरेकर, छोटू सावजी, राजू परुळेकर, महेंद्र चव्हाण, कृष्णनाथ तांडेल, दामोदर तोडणकर, उदय परब, अजिंक्य पाताडे, जिल्हा परिषद अध्यक्षा रेश्मा सावंत, सरोज परब, दीपक पाटकर, संजय लुडबे, सुभाष लाड, जगदिश गावकर, संदीप भोजने, आबा हडकर व मोठय़ा संख्येने मच्छीमार, पदाधिकारी मोर्चात सहभागी झाले होते.

कार्यकर्त्यांची गर्दी

सकाळी नऊपासून स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांची गर्दी भरड येथील दत्त मंदिरात होऊ लागली होती. कार्यकर्ते, मच्छीमारही मोठय़ा संख्येने मंदिरात दाखल झाल्यानंतर सकाळी 11.30 वाजता मोर्चा निघाला. भरड, बाजारपेठ, फोवकांडा पिंपळ येथून तहसील कार्यालयावर मोर्चा धडकला. ‘मच्छीमार एकजुटीचा विजय असो, हम सब एक है, मच्छीमारांना न्याय मिळालाच पाहिजे, एलईडी हटवा …मच्छीमार जगवा, समुद्र आमच्या हक्काचा…नाही कुणाच्या बापाचा’ अशा घोषणांनी परिसर दणाणला होता. मोर्चात मोठय़ा संख्येने कार्यकर्ते व मच्छीमार  महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. मोर्चाला छोटू सावजी, सुदेश आचरेकर, कृष्णनाथ तांडेल, दत्ता सामंत, खलील वस्त यांनी मार्गदर्शन केले.

पालकमंत्र्यांनी मालवणात येऊन मच्छीमारांवर बोलावे!

मच्छीमारांवरचा अन्याय थांबला पाहिजे, यासाठीच हा इशारा देणारा मोर्चा आहे. मोर्चाला मच्छीमार येऊ नयेत, यासाठी शिवसेनेने कारस्थाने रचली, मच्छीमारांना घाबरविण्यात आले. गोव्याच्या तीन बोटी परत गेल्या, तर स्वाभिमान गप्प बसणार नाही. मच्छीमारांचे उदरनिर्वाहाचे साधन कोण उद्ध्वस्त करीत असतील, तर महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष स्वस्थ बसणार नाही. गोव्याने सिंधुदुर्गातील मासळी घेण्याचे बंद केले. याबाबत शिवसेना आमदार, खासदार बोलत नाहीत. पालकमंत्री सावंतवाडीत राहून मच्छीमारांविरोधात बोलत आहेत, त्यांनी मालवणात येऊन बोलावे. पालकमंत्र्यांचे कुटुंब गोव्यात असल्याने गोव्याच्या बोटी सोडविण्यासाठी ते प्रशासनावर दबाव आणत आहेत. मच्छीमारांच्या पाठिशी आम्ही ठामपणे उभे राहणार आहोत. प्रशासनाने आमच्यावर गुन्हे दाखल करावेत, असा इशारा राणे यांनी दिला. 

Related posts: