|Thursday, June 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » आझाद मैदानावर खाणग्रस्तांचे शक्तीप्रदर्शन

आझाद मैदानावर खाणग्रस्तांचे शक्तीप्रदर्शन 

खाणी सुरु करण्याची एकमुखी मागणी

प्रतिनिधी/ पणजी

 सर्वोच्च न्यायालयाने गोव्यातील खाणबंदीचा आदेश दिल्याने गोव्यावर आर्थिक संकट कोसळले आहे. खाण व्यवसायायवर अवलंबून असलेल्या खाणग्रस्तांनी काल बुधवारी पणजीतील आझाद मैदानावर शक्तीप्रदर्शन केले. खाणप्रश्नी सरकारने तोडगा काढून कायदेशीर खाणी पुन्हा सुरु कराव्यात, अशी मागणी केली. यावेळी भाजप तसेच कॉंग्रेसच्या आमदारांनी त्यांना पाठिंबा दर्शविला. या विषयावर आम्ही चाळीसही आमदार एकत्र असून यावर तोडगा काढला जाणार आहे, असे आश्वासन आमदारांनी खाणग्रस्तांना दिले.

 या शक्ती प्रदर्शनात राज्यभरातील सुमारे 5 हजार खाणग्रस्त लोक आझाद मैदानावर आले होते. या शक्ती प्रदर्शनामध्ये खाण ट्रकमालक, खाण कंपन्यांचे कामगार तसेच खाण व्यवसायवर अवलंबून असलेल्या सर्व लहानमोठय़ा लोकांनी सहभाग घेतला होता.

खाणपट्टय़ातील आमदारांचा पाठिंबा

 खाणपट्टय़ातील आमदारांनी यावेळी खाणग्रस्तांना आपला पाठिंबा दर्शविला. लवकरात लवकर सरकार खाणी सुरु करण्यासाठी प्रयत्न करणार असून आम्ही तुमच्या सोबत आहोत, असे आश्वासन त्यांनी खाणग्रस्तांना दिले. खाणी बंद होणार नसून आम्ही सर्वोच्च न्यायालयात आमची बाजू मांडणार आहोत. त्यामुळे गोव्याची खाणबंदी दूर होणार आहे, असे भाजपचे आमदार नीलेश काब्राल, राजेश पाटणेकर, प्रसाद गावकर, दीपक पाऊसकर, प्रविण झांटय़े यांनी सांगितले.

 पर्रीकर आल्यानंतर तोडगा काढणार : काब्राल

 सरकार हे तुमचे आहे. सरकारला खाणी बंद झालेल्या नकोत. सर्वोच्च न्यायालयात आम्ही आमची बाजू पटवून देणार आहोत. मुख्यमंत्री पर्रीकर सध्या आजारी असल्याने हा विषय रखडला आहे. ते आल्यावर नक्कीच तोडगा काढणार आहेत. खाणी 16 मार्च अगोदर सुरु होणारच, असे कुडचडेचे आमदार नीलेश काब्राल यांनी सांगितले.

 खाणप्रश्नी सरकार गंभीर : पाऊसकर

 सर्वोच्च न्यायालयाने खाणी अचानक बंद केल्याने गोव्यात खाण अवलंबितांवर संकट कोसळेले आहे. आम्ही अधिवशेनात हा विषय काढणार आहोत. हा विषय सरकारने गांर्भियाने घेतला आहे. आम्ही खाणपट्टय़ातील सर्व आमदारांनी यासाठी सरकारकडे मागणी केली आहे, असे आमदार दीपक पाऊसकर यांनी सांगितले.

 खाणी सुरु केल्या पाहिजेत : गांवकर

 गोव्याची खरी अर्थ व्यवस्था ही खाण आहे, त्यामुळे खाण व्यवसाय सुरु होणे गरजेचे  आहे. आमचा आवाज आम्ही सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहचविला पाहिजे. सरकारने कायदेशीर बाबी सर्वोच्च न्यायालयासमोर मांडून या खाणी पुन्हा सरु केल्या पाहिजेत, असे आमदार प्रसाद गांवकर यांनी सांगितले.

 खाणबंदीचा राज्यावर परिणाम : पाटणेकर

 खाण बंदीचा परिणाम संपूर्ण राज्यावर होत आहे. आज खाणी बंद झाल्या तर अनेक लोक बेरोजगार होणार आहेत. खाण पिडीतांवर आम्ही अन्याय होऊ देणार नाही. खाणी लवकरात लवकर सुरु करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. आमचा आवाज दिल्लीपर्यंत जाणार आहे, असे आमदार राजेश पाटणेकर यांनी सांगितले. मयेचे आमदार प्रविण झांटय़े यांनी आपला पाठिंबा दर्शविला

काँग्रेसचा खाणग्रस्तांना पूर्ण पाठिंबा

 खाणग्रस्तांना कॉंगेसने पूर्ण पाठिंबा दिला असून कुठल्याही परिस्थितीत सरकारने कायदेशीर खाणी सुरु कराव्यात अशी मागणी केली आहे. या खाण पिडीतांच्या शक्ती प्रदर्शनाला कॉंग्रेसचे विरोधी पक्षनेते बाबु कवळेकर, आमदार प्रतापसिंह राणे, लुईझिन फालेरो, रवी नाईक यांनी आपला पाठिंबा दर्शविला तसेच लवकरात लवकर खाणी सुरु करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार, असे यावेळी सांगितले.

 खाणी सुरु करण्यास सरकारला पाठिंबा : कवळेकर 

खाणी म्हणजे गोव्याचा अर्थिक कणा असून आम्ही सर्व 40 आमदार खाणग्रस्तांना सहकार्य करणार आहे. खाणी सुरु करण्यासाठी आम्ही सरकारला पाठिंबा देत आहोत. सरकारने लवकरात लवकर खाणी सुरु करण्यावर तोडगा काढावा. सर्वोच्च न्यायालयात आमची बाजू मांडावी, असे यावेळी विरोधी पक्षनेते बाबु कवळेकर यांनी सांगितले.

 खाणी लवकरात लवकर सुरु व्हाव्यात : राणे

 खाण व्यवसाय हा गोव्याचा मोठा व्यवसाय असून खाणी सुरु होणे गरजचे आहे. खाण बंदी झाल्यावर अनेक लोकांवर त्याचा परिणाम होणार आहे. त्यामुळे खाणी लवकरात लवकर सुरु व्हायला हव,s असे यावेळी प्रतासिंह राणे यांनीं सांगितले. यावेळी लुईझिन फालेरो, रवी नाईक यांनीं आपली मते मांडली.

 सकाळपासून राज्यातील खाणपट्टय़ातील लोक आझाद मैदानावर आले होते. त्यानंतर खाणपट्टय़ातील आमदारांनी येऊन आपला पाठिंबा दर्शविला. दुपारी कॉंगेसच्या नेत्यांनी आपला पाठिंबा दर्शविला.