|Tuesday, March 26, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » अखेर मनपाच्या बैठकीस अनुमती

अखेर मनपाच्या बैठकीस अनुमती 

प्रादेशिक आयुक्तांकडून सूचनापत्र जारी

प्रतिनिधी / बेळगाव

महापालिका सभागृहाची बैठक होणार की नाही याबाबत संभ्रमावस्था निर्माण झाली होती. पण बैठक आयोजित करण्यास नगरविकास खात्यासह प्रादेशिक आयुक्तांनी अनुमती दिली आहे. यामुळे बैठक आयोजित करण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. मात्र, धोरणात्मक विषय वगळता अन्य विषयांवर चर्चा करण्यासाठी बैठक आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती महापौर संज्योत बांदेकर यांनी दिली.

महापौर-उपमहापौर निवडणूक जाहीर झाल्याने सभागृहाची बैठक घेता येत नसल्याचे सांगून महापालिकेच्या अधिकाऱयांनी बैठक घेण्यास टाळाटाळ चालविली होती. परिणामी सभागृहाची बैठक संभ्रमाच्या कात्रीत सापडली होती. यामुळे  महापौर संज्योत बांदेकर यांनी प्रादेशिक आयुक्त पी. ए. मेघण्णावर यांना पत्र पाठवून बैठक आयोजनाबाबतचे स्पष्टीकरण विचारले होते. प्रादेशिक आयुक्तांनी नगरविकास खात्याला पत्र पाठवून स्पष्टीकरण विचारले होते. बैठक आयोजित करण्यास कोणतीच हरकत नसल्याचा निर्वाळा नगरविकास खात्याने प्रादेशिक आयुक्तांना दिला आहे. यामुळे प्रादेशिक आयुक्तांनी महापौर संज्योत बांदेकर यांना पत्र पाठवून बैठक आयोजनाबाबत स्पष्टीकरण दिले आहे. महापौर-उपमहापौर निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर बैठक आयोजित करण्यास कोणतीच हरकत नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. पण कोणतेच धोरणात्मक निर्णय बैठकीत घेता येणार नाहीत, अशी सूचना केली आहे.

दोन दिवसात बैठकीची तारीख निश्चित होणार

महापौर-उपमहापौर निवडणूक जाहीर झाल्यानंतर बैठक आयोजित करता येत नाही, अशी मनपा अधिकाऱयांनी दिलेली माहिती नगरविकास खात्याच्या स्पष्टीकरणामुळे खोटी ठरली आहे. जनतेच्या हितासाठी आणि अत्यावश्यक विषयांवर बैठकीत चर्चा करता येऊ शकते. बैठक आयोजित करण्यास कोणतीच हरकत नसल्याने येत्या दोन दिवसात बैठकीची तारीख ठरविण्यात येईल, अशी माहिती महापौरांनी दिली. दोन्ही गटनेत्यांशी चर्चा करून बैठकीची तारीख निश्चित करण्यात येणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. 

 

 

Related posts: