|Friday, August 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » महापैठणीचा मांडलेला खेळ निशीगंधा कुबल यांनी जिंकला

महापैठणीचा मांडलेला खेळ निशीगंधा कुबल यांनी जिंकला 

शिवसेना आयोजित कार्यक्रमात आदेश बांदेकरांनी आणली रंगत  महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

वार्ताहर / कणकवली:

‘भगिनी.., माऊली..’ अशी साद घालत कधी त्यांची आदरपूर्वक चेष्टा करीत, तर कधी सन्मानपूर्वक सल्ले देत ‘लाईव्ह ऑर्केस्ट्रा’सोबत युवतींना गायनासाठी प्रोत्साहन देत, तर महिला, आजींना व्यासपिठावर खास कणकवली स्टाईलमध्ये नृत्य करण्यास भाग पाडून ‘भावोजी’ म्हणजेच आदेश बांदेकर यांनी गुरुवारी महापैठणीचा मांडलेला खेळ चांगलाच रंगविला. महिलांचा तुफान प्रतिसाद लाभलेल्या या कार्यक्रमावर अगदी शेवटपर्यंत बांदेकर यांनी आपले वर्चस्व राखले. उखाणे घेताना महिलांना कधी शाब्दिक चिमटे काढत, तर कधी प्रशंसा करीत टाळय़ांची दाद मिळविली. उत्सूकता वाढविणाऱया या कार्यक्रमात अखेर मूळ श्रावण येथील व कणकवलीतील रहिवासी निशीगंधा कुबल यांनी महापैठणी जिंकण्याचा मान मिळविला.

कलमठ सरपंच देविका गुरव उपविजेत्या ठरल्या. तर परिणिता कोठावळे यांनी तृतीय क्रमांक मिळविला. त्यांनाही पैठणी देण्यात आली.

‘होम मिनिस्टर’ मालिकेमुळे घराघरात लोकप्रिय झालेले आदेश बांदेकर यांच्यासोबत महापैठणीसाठी खेळायला मिळणार असल्याने महिला वर्गात कमालीची उत्सूकता होती. कणकवली शिवसेनेतर्फे ‘खेळ मांडियेला महापैठणीचा’ या कार्यक्रमाचे आयोजनही देखणे केले होते. मैदानावर दोन मोठय़ा ‘क्रीन’ लावल्यामुळे तालुक्यातून आलेल्या प्रेक्षकांनाही विद्यामंदिर हायस्कूलच्या पटांगणावर कार्यक्रमाचा मनसोक्त आनंद लुटता आला. सुमारे तीन तासांहून अधिक काळ चाललेल्या या कार्यक्रमात आदेश बांदेकर यांनीही ‘नॉनस्टॉप’ उत्साहीपणे महिलांशी संवाद साधत सर्वांचीच मने जिंकली.

स्पर्धेसाठी महिलांनी सायंकाळपासूनच उपस्थिती दर्शविली होती. उपस्थित महिलांकडून कुपन भरून घेण्यात आले होते. त्यातील 50-50 कुपन्स काढून पन्नास महिलांच्या गटांमध्ये संगीत खुर्ची, तळय़ात-मळय़ात, खेळाच्या ऍक्शन ओळखणे आदी विविध खेळ खेळविले जात होते. या गटांमधून दहा-दहा विजेत्यांना पुढील फेरीत पाठविण्यात येत होते व उर्वरित 40 महिलांना भेटवस्तू देण्यात येत होत्या व उखाणे म्हणण्याची संधीही देण्यात येत होती. अशा पन्नास महिलांच्या गटातून दहा-दहा महिला पुढच्या फेरीत जात होत्या. 300 स्पर्धकांना भेटवस्तू तसेच लकी ड्रॉमधील 20 भाग्यवान विजेत्यांना चांदीची नाणी व पाच इस्त्राr अशा भेटवस्तू देण्यात आल्या.

पुढच्या फेरीत गेलेल्या महिलांकडून खुर्चीत रिंग टाकणे, डोक्यावर वही ठेवून चालणे, डोक्यावर वही व वहीवर छोटी प्लास्टिक बादली ठेवून चालणे आदी खेळ घेण्यात आले. अखेरच्या तीन महिला स्पर्धकांमध्ये डोक्यावर वही, बादली ठेवून तोंडात चमचा व चेंडू ठेवून चालण्याची फेरी घेण्यात आली. यात सौ. कुबल या विजेत्या ठरल्या.

स्पर्धेच्या उद्घाटनानंतर आदेश बांदेकर व सुशांत नाईक यांनी विचार मांडले. यातून आगामी न. पं. निवडणुकीत पाठिशी राहण्याचे आवाहन करण्यात आले. त्यानंतर बांदेकर यांनी महिलांशी थेट संवाद साधत, प्रेक्षकांमध्ये जाऊन त्यांच्याशी चर्चा, प्रश्न व त्यांना भेटवस्तू देत महिलांचा सन्मान केला.

बांदेकर यांनी ‘लाईव्ह ऑर्केस्ट्रा’च्या तालावर महिलांना व्यासपिठासमोरील मोकळय़ा भागात फुगडय़ा घालायला तसेच ‘झिंगाट’ डान्ससह चांगलेच नाचायला लावले. महिलाही तेवढय़ाच उत्स्फूर्तपणे नाचून दाद देत होत्या. महिलांच्या फिरक्या घेत, हास्य विनोदाने आदेश बांदेकर यांनी स्पर्धेत रंगत आणली.

भेटवस्तू, व लकी ड्रॉमधील विजेत्यांना बक्षिसांची खैरात व भाग्यवान विजेत्यांना चांदीची नाणी अशा भेटवस्तूंच्या वर्षावात स्पर्धा उशिरापर्यंत सुरू होती. महिलांसाठी ही पर्वणीच ठरली. कार्यक्रमात आगामी न. पं. निवडणुकीतही असेच पाठिशी राहण्याचे आवाहन करण्यात आल्याने कार्यक्रम आयोजनामागचा हेतू काहीसा स्पष्ट झाला. मात्र, कार्यक्रमातून आदेश बांदेकर यांनी उपस्थितांची मने चांगलीच जिंकली तरी मते जिंकतात का? याची उत्सूकता लागून राहिली आहे.

शहरातील ज्येष्ठ नागरिकांचा शिवसेनेतर्फे सत्कार करण्यात आला. उद्घाटनप्रसंगी आमदार वैभव नाईक, नगरसेवक सुशांत नाईक, स्नेहा नाईक, जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दूधवडकर, महिला आघाडी जिल्हाप्रमुख स्नेहा तेंडुलकर, तालुकाप्रमुख सचिन सावंत, शहरप्रमुख शेखर राणे, विधानसभा संपर्कप्रमुख शैलेश भोगले, सतीश नाईक, सुजित जाधव, प्रतीक्षा साटम, तेजल लिंग्रज, साक्षी आमडोसकर, सुवर्णा राणे, संजीवनी पवार, वैभवी पाटकर, निकिता मुंज, युवासेना तालुकाप्रमुख राजू राठोड, बाळू पारकर, महेश देसाई, राजू वर्णे, प्रमोद मसुरकर आदी उपस्थित होते.