|Friday, April 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » खेडचा सुपुत्र बनला आंतरराष्ट्रीय क्रिकेट पंच

खेडचा सुपुत्र बनला आंतरराष्ट्रीय क्रिकेट पंच 

शिव मधील अल्लाउद्दीन पालेकरांची भरारी

भारत-दक्षिण आफ्रिका टी-20 सामन्यातून प्रारंभ

सध्या दक्षिण आफ्रिकेत वास्तव्य

प्रतिनिधी /खेड

खेड तालक्यातील शिव गावचे सुपुत्र अल्लाउद्दीन पालेकर यांनी भारत व दक्षिण आफ्रिकेदरम्यान टी-20 सामन्यातून आंतराष्ट्रीय क्रिकेट पंच म्हणून कारकिर्द सुरू केली आहे. पालेकर हे सध्या दक्षिण आफ्रिकेतच वास्तव्यास असून आपला मुळ देश व सध्या राहत असलेला देश या दोघांमधील लढतीमध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण करण्याचा दुर्मिळ योग यानिमित्ताने जुळून आला आहे.

अल्लाउद्दीन पालेकर (39) यांचे आजोबांनी दक्षिण आफ्रिकेत स्थलांतर केले होते. त्यामुळे अलाउद्दीन लहानपणापासूनच दक्षिण आफ्रिकेत वास्तव्यास असले तरी आपल्या देशाबद्दल व गावाबद्दल त्यांना ओढ आहे. प्रिटोरियातील एका खासगी शाळेत शिक्षक म्हणून नोकरी करतानाच क्रिकेटचा छंदही त्यांनी जोपासला. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत दक्षिण आफ्रिकेतच क्रिकेट क्षेत्रात पाय रोवले. लहानपणापासून क्रिकेट खेळात त्यांनी विक्रमांवर विक्रम रचले. आफ्रिकेत प्रथम श्रेणीच्या 16 सामन्यात पालेकर यांनी प्रतिनिधीत्व केले आहे. आता याच खेळातील पंच म्हणून त्यांनी नवी कारकिर्द सुरू केल्याचे शिव येथील त्यांच्या नातेवाईकांनी ‘तरूण भारत’शी बोलताना सांगितले.

भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिकेच्या सामन्यात पंच म्हणून अल्लाउद्दीन पालेकर काम पहात असल्याचे टी.व्ही. वर पाहताच शिव गावासह तालुकावासीयांना अत्यानंद झाला. जिल्हावासीयांसाठीही ही अभिमानाची बाब असून पालेकर यांनी यानिमित्ताने आपल्या गावासह कोकणचा झेंडा दक्षिण आफ्रिकेत फडकवला आहे.

तीन वर्षांपुर्वी गावाला भेट

तीन वर्षापूर्वी पालेकर आपल्या मूळगावी शिव येथे आले होते. तेथे त्यांनी आपल्या नातेवाईकांची भेट घेतली होती. त्यानंतर दोनच दिवसापूर्वी प्रत्यक्ष टी.व्ही. वर त्यांना पाहण्याचा योग गावकऱयांना आला. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सामन्यात क्रिकेट पंच म्हणून भुमिका निभावणाऱया पालेकरांना पाहून गावकऱयांसह साऱया जिल्हावासीयांचा उर अभिमानाने आणि आनंदाने भरून आला.

यापुर्वी रणजी सामन्यात पंच

2015 मध्ये मुंबईच्या वानखेडे स्टेडीयमवर मुंबई व मध्यप्रदेश यांच्यात झालेल्या रणजी सामन्यात त्यांनी पंच म्हणून जबाबदारी पार पाडली होती. बीसीसीआयच्या एक्सचेंज योजनेंतर्गत पालेकर यांना ही संधी मिळाली होती. ज्या मैदानावर प्रवेश करण्यापासुन त्यांना रोखण्यात आले होते, त्याच मैदानावर 14 वर्षांनी पंच म्हणून काम करण्याचा बहुमान मिळाला ही आपल्या आयुष्यातील सर्वात मोठी गोष्ट असल्याचे त्यांनी एका मुलाखतीत सांगितले होते. 2000 मध्ये दक्षिण आफ्रिकतून मुंबईत एका नातेवाईकाच्या लग्नासाठी पालेकर आले होते. त्यावेळी वानखेडे स्टेडीयम पाहण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली. मात्र सुरक्षारक्षकांनी त्यांना रोखले होते.

Related posts: