|Sunday, August 25, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » पोलीस असल्याची बतावणी करून वृद्धाचे दागिने लंपास

पोलीस असल्याची बतावणी करून वृद्धाचे दागिने लंपास 

कणकवलीतील तहसील कार्यालयानजीक घटना

कणकवली:

सीआयडी अधिकारी असल्याची बतावणी करत वृद्धाच्या अंगावरील दोन अंगठय़ा व सोन्याची चेन मिळून सोन्याचे अडीच तोळय़ाचे दागिने अनोळखी तरुणाने हातचलाखीने लंपास केले. ही घटना येथील तहसील कार्यालयासमोरील रस्त्यावर शुक्रवारी दुपारी 12.15 च्या सुमारास घडली. तब्बल अडीच तोळय़ांचे दागिने चोरटय़ाने हातोहात लांबविले.

जनार्दन केशव राणे (74, सातरल-खालचीवाडी) हे येथील तहसील कार्यालयासमोरील रस्त्यावरून साटम झेरॉक्सच्या दिशेने जात होते. त्याचवेळी तेथे महामार्गावरून मोटारसायकलने एक तरुण आला. त्याने सर्वप्रथम राणे यांच्या नजीकच असलेल्या एका मुलाला जवळ बोलावले. त्याच्याकडील पैसे, दागिने आदी वस्तू घेऊन त्या एका रुमालात बांधून परत त्याच मुलाकडे दिल्या.

याचवेळी त्या तरुणाने राणे यांनाही हाक मारली. राणे थांबले असता तो तरुण त्यांच्याकडे आला. आपण सीआयडी अधिकारी असून सध्या गांजा, चरस वाहतूक सुरू असल्याने आपल्याला चेकिंग करायची असल्याचे त्याने सांगितले. त्यानंतर त्याने राणे यांच्याकडे त्यांचा रुमाल मागितला. पुढे त्याने राणे यांचा मोबाईल, खिशातील पैशांची चिल्लर तसेच हातातील प्रत्येकी अर्धा तोळय़ाच्या दोन अंगठय़ा व दीड तोळय़ाची सोन्याची चेनही मागून घेतली.

‘जिकडे-तिकडे चोऱया होत आहेत. अंगावर दागिने घालून फिरू नका’ असे सांगत त्याने राणे यांच्याकडील सर्व वस्तू त्यांच्याच रुमालात बांधल्या. रुमालाची पुडी राणे यांच्या हातात देऊन तो महामार्गाच्या दिशेने मोटारसायकलने निघून गेला. त्यानंतर राणे हे झेरॉक्स सेंटर येथे आले. त्यांनी रुमालाची पुडी उघडली असता आतमध्ये मोबाईल, चिल्लर तसेच होते. मात्र, दागिने नव्हते. या प्रकाराने धास्तावलेल्या राणे यांना परिसरातील नागरिकांनी धीर दिला. त्यानंतर राणे यांनी पोलिसांत धाव घेत अनोळखी तरुणाविरोधात फिर्याद दिली.

तरुणाचे वय 30 – 35 वर्ष असून उंची साडेपाच फूट आहे. तो जाड असून रंगाने सावळा आहे. अंगात आकाशी बारीक रेघोटय़ा असलेले फूलशर्ट व त्याच रंगाची पँट, डोक्यावर देवानंदसारखी कॅप असल्याचे राणे यांनी फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास कणकवली पोलीस करत आहेत. अलिकडेच सावंतवाडीतही अशीच घटना घडली होती. त्यामुळे नागरिकांनी सतर्कता बाळगावी. अशा वस्तू कुणी मागितल्यास देऊ नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.