|Thursday, January 17, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » पाकच्या अनेक चौक्या उद्ध्वस्त

पाकच्या अनेक चौक्या उद्ध्वस्त 

हाजी पीर, तंगधर भागात धडक कारवाई, काही पाक सैनिकांनाही कंठस्नान

श्रीनगर / वृत्तसंस्था

पाकिस्तानच्या सततच्या शस्त्रसंधी उल्लंघनाला भारतीय लष्कराने धडाकेबाज कारवाई करून प्रत्युत्तर दिले आहे. जम्मू-काश्मीरच्या हाजी पीर आणि तंगधर या सीमावर्ती भागात पाकच्या अनेक चौक्यांना लक्ष्य बनविण्यात आले असून त्या नष्ट करण्यात आल्या आहेत. या प्रतिहल्ल्यात पाकिस्तानचे अनेक सैनिकही ठार झाले आहेत.

भारताचे हे ठोस प्रत्युत्तर 20 फेब्रुवारीपासून सुरू आहे. सीमेवर पाकिस्तान आता दबावाखाली आला असून त्यामुळे त्यांच्या सैन्यात निराशा पसरली आहे. बुधवारी रात्रीपासून तंगधर क्षेत्रात भारतीय सैन्याने तुफान गोळीबार चालविला असून त्यात पाकचे किमान तीन सैनिक ठार झाले आहेत. तर हाजी पीर भागात सेनेकडून पाकच्या चौक्या नष्ट करण्यासाठी क्षेपणास्त्र प्रक्षेपकांचा उपयोग करण्यात येत आहे.

हाजी पीर भागात पाकच्या किमान चार चौक्या शुक्रवार सकाळी आणि त्यापूर्वीच्या दोन दिवसांमध्ये उद्ध्वस्त करण्यात आल्या. त्यात असलेले सर्व सैनिक ठार झाल्याचा दावा करण्यात आला. प्रत्येक चौकीत किमान चार ते सहा सैनिक असतात. त्या हिशेबाने 18 ते 22 सैनिक गारद झाले आहेत, असे लष्कराच्या प्रवक्त्यांनी स्पष्ट केले.

किमान 22 ठार

नववर्षाच्या पहिल्या 50 दिवसात सीमेवर पाकिस्तानचे किमान 22 सैनिक टिपण्यात यश आल्याचे लष्कराच्या प्रवक्त्याने सांगितले. पाकिस्ताननेही या काळात किमान 150 वेळा शस्त्रसंधीचा भंग केला आहे. भारतात जास्तीत जास्त संख्येने दहशतवादी घुसविण्याचा पाकचा डाव आहे. पाकिस्तानच्या कोणत्याही दबावतंत्राला भारत बळी पडणार नाही आणि आपली कारवाई सौम्य करणार नाही, अशी माहिती देण्यात आली.

सेनेला पूर्ण मुभा

पाकिस्तानचे डावपेच आणि हिंसाचार हाणून पाडण्यासाठी कोणतीही कारवाई करण्याची पूर्ण मुभा भारतीय सेनेला देण्यात आली आहे. सेनेचे हात रोखणार नाही, असा स्पष्ट संदेश सरकारने दिला आहे. सीमेपलीकडील दहशतवाद्यांच्या तळांवर आपले सैनिक हल्ले करून असून त्यांना उडविण्यात येत आहे. त्यांना संरक्षण देणाऱया पाक सैनिकांचेही मोठे नुकसान आणि जीवितहानी होत आहे, असे प्रतिपादन प्रवक्त्याने केले.

200 दहशतवादी टपून

सीमेपलिकडे सुमारे 200 दहशतवादी भारतात घुसण्यासाठी टपून बसलेले आहेत, अशी माहिती गुप्तचरांकडून मिळालेली आहे. पीर पंजाल पर्वतरांगांच्या पलिकडे त्यांचे तळ असून ते पर्वत ओलांडून येण्याच्या तयारीत आहेत. तथापि, त्यांचे प्रयत्न उधळून लावण्यासाठी सेना सज्ज आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

बॉक्स

अमेरिकेचा दबाव उपयोगी

अमेरिकेच्या डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने पाकिस्तानचे लष्करी अर्थसाहाय्य बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. याचा परिणाम म्हणून पाक लष्कर बरेच दबावाखाली आल्याचे स्पष्ट जाणवत आहे. आपण दबावाखाली नाही हे दाखविण्यासाठी काहीवेळा त्याच्याकडून हल्ले केले जातात. तथापि, त्यांचे नैराश्य आता जाणवू लागले आहे, अशी माहिती सेनेच्या प्रवक्त्याने दिली.

बॉक्स

जोरदार प्रत्युत्तर…

ड पाकिस्तानच्या मुजोरीला भारताचे जोरदार प्रत्युत्तर

ड तुलनेने पाकिस्तानचे नुकसान अधिक, अनेक ठार

ड प्रत्युत्तराची कारवाई थांबविली न जाण्याचा संकेत

ड सरकारची सेनेला कारवाईसाठी पूर्ण मुभा, समर्थन

Related posts: