|Tuesday, March 26, 2019
You are here: Home » क्रिडा » सायनासाठी कठीण, सिंधूला सोपा ड्रॉ

सायनासाठी कठीण, सिंधूला सोपा ड्रॉ 

ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेचा ड्रॉ जाहीर, सायनासमोर अग्रमानांकित तेई तेजु यिंगचे आव्हान

वृत्तसंस्था/ बर्मिंगहॅम

बॅडमिंटनच्या जागतिक कार्यक्रमातील सर्वात प्रतिष्ठेच्या ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेसाठी भारताच्या सायना नेहवालसाठी कठीण तर सिंधूसाठी सोपा ड्रॉ मिळाला आहे. सायनासमोर सलामीला अव्वलमानांकित तेई तेजु यिंगचे आव्हान असणार आहे. सोपा ड्रॉ मिळालेल्या सिंधूची सलामीची लढत थायलंडच्या पोर्नपावी चोच्युवांगशी होईल. या प्रतिष्ठेच्या स्पर्धेला 14 मार्चपासून प्रारंभ होणार आहे.

जागतिक क्रमवारीत 11 व्या स्थानी असलेल्या सायनाने 2015 मध्ये ऑल इंग्लंड बॅडमिंटनच्या अंतिम फेरीत धडक मारली होती. गत महिन्यात झालेल्या इंडोनेशिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेत तेईने सायनाला पराभूत केले होते. या स्पर्धेत सलामीच्या लढतीत पराभवाचे उट्टे काढण्याची नामी संधी सायनाकडे असेल. आजवर सायनाची अग्रमानांकित तेईविरुद्ध कामगिरी फारशी चांगली नाही मात्र अनुभवाच्या जोरावर झेप घेण्याची क्षमता सायनाकडे असल्याने ही लढत चुरशीची होईल. दुसरीकडे सिंधूचा पहिला सामना थायलंडच्या पोर्नपावीशी होणार आहे. यानंतर दुसऱया फेरीत अमेरिकेच्या बेवेन झांगशी तिचा सामना होईल. विशेष म्हणजे, गत महिन्यात इंडिया ओपनमध्ये बेवेनने सिंधूला नमवत जेतेपद पटकावले होते. सिंधूने बेवेनला नमवत उपांत्यपूर्व फेरी गाठल्यास जपानच्या नोझोमी ओकुहाराशी तिचा सामना होईल.

श्रीकांत, प्रणॉयला सोपा ड्रॉ

पुरुष एकेरीत श्रीकांतला तिसरे स्थान मिळाले असून त्याच्यावर गेल्या मोसमातील सातत्य टिकवण्याचे आव्हान असेल. गेल्या मोसमात चार विजेतेपद मिळवणाऱया श्रीकांतसमोर सलामीला फ्रान्सच्या बिगरमानांकित ब्रिस लेवेर्डेचे आव्हान असणार आहे. प्रणॉयला देखील सोपा ड्रॉ मिळाला असून सलामीला त्याची लढत आठव्या मानांकित चोऊ तिएनशी होणार आहे. साईप्रणितसमोर दक्षिण कोरियाचा माजी अग्रमानांकित सोन वॅन होचे आव्हान असेल.

पुरुष दुहेरीत चिराग शेट्टी-सात्विकसाईराज यांची सलामी जपानच्या ताकुरो होकी-कोबायाशी यांच्याशी होईल. मिश्र दुहेरीत प्रणव चोप्रा-एन.सिक्की रेड्डी जर्मनीच्या एमिल-लिंडा जोडीशी खेळतील. अश्विनी पोनप्पा व सिक्की जपानच्या मिसाकी-अयाका ताकाहासी यांच्याशी खेळतील. महिला दुहेरीतील उदयोन्मुख जोडी मेघना व पूर्वशा यांच्यासमोर जपानच्या शिहो तनाका-कोहारु यानामोटो यांचे आव्हान असेल.

 

Related posts: