|Tuesday, October 23, 2018
You are here: Home » क्रिडा » 15 वर्षांच्या झॅगितोव्हाचे यश, रशियाला पहिलेच सुवर्ण

15 वर्षांच्या झॅगितोव्हाचे यश, रशियाला पहिलेच सुवर्ण 

वृत्तसंस्था/ गँगनेयूंग

‘टिनेज फिगर स्केटर’ ऍलिना झॅगितोव्हाने आपलीच राष्ट्रीय सहकारी इव्हगेनिया मेदेव्हेडेव्हाला अगदी किंचीत फरकाने पिछाडीवर टाकत हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धेत रशियाला पहिले सुवर्ण जिंकून दिले. 15 वर्षीय ऍलिनाने केवळ 1.31 अंकांनी येथे बाजी मारली. इव्हगेनिया रौप्य तर कॅनडाची कॅएटलिन ओस्मंड कांस्यपदकाची मानकरी ठरली. रशियावर उत्तेजक चाचणीत सातत्याने दोषी आढळल्याने राष्ट्र म्हणून प्रतिनिधीत्वाची संधी मिळाली नसून त्यांचे ऍथलिट ‘ओएआर’ अर्थात, ऑलिम्पिक ऍथलिट ऑफ रशिया या नामनिर्देशाच्या माध्यमातून स्पर्धेत उतरत आहेत.

‘मी चॅम्पियन ठरले, यावर माझाच विश्वास बसत नाही’, असे ऍलिना सुवर्णपदकावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर म्हणाली. यापूर्वी शुक्रवारी फ्री स्केटिंगमध्ये ऍलिना व मेदेव्हेडेव्हा 156.65 अंकांसह बरोबरीत होते. सर्वात शेवटी स्केटिंग करणाऱया मेदेव्हेडेव्हाला मात्र आपली सर्वोत्तम कामगिरी साकारता आली नाही. यापूर्वी, ऑक्टोबर महिन्यात झालेल्या दुखापतीमुळे तिला दोन महिने सक्तीची विश्रांती घ्यावी लागली होती. त्यानंतर इथे पुनरागमनात तिला सुवर्णपदकाची अपेक्षा होती. पण, किंचीत फरकाने सुवर्ण हुकल्यानंतर तिला अश्रु अनावर झाले.

ऍलिना व मेदेव्हेडोव्हा यांनी पोडियमवर मात्र एकमेकांना अलिंगन देत परस्परांचे अभिवादन केले. रेड बॅलेरिना कॉस्टय़ूममध्ये असलेल्या ऍलिनाने मागील महिन्यात संपन्न झालेल्या युरोपियन चॅम्पियनशिपमध्ये देखील मेदेव्हेडोव्हापेक्षा सरस कामगिरी साकारली होती. येथे ती अमेरिकेच्या लिपिन्स्कीनंतर सुवर्ण जिंकणारी सर्वात युवा ऑलिम्पियन महिला चॅम्पियन देखील ठरली. लिपिन्स्कीने यापूर्वी 1998 मध्ये असा पराक्रम गाजवला होता.

Related posts: