|Tuesday, July 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » कुपवाडमध्ये अनैतिक संबंधातून युवकाचा खून

कुपवाडमध्ये अनैतिक संबंधातून युवकाचा खून 

मृतदेहाची शोधाशोध

वार्ताहर/ कुपवाड

पत्नीशी अनैतिक संबंध ठेवून तीला पळवून नेल्याच्या संशयावरुन कुपवाडमधील सागर भीमराव माळी (26, रा. समर्थचौक, कापसे प्लॉट) या पत्नीच्या प्रियकराचा गुरुवारी रात्री खून केल्याची चर्चा कुपवाड परिसरात सुरू आहे. या युवकाचा खून करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने संशयितांनी मृतदेह सांगलीतील कृष्णा नदीत टाकल्याची माहिती कुपवाड पोलिसांच्या चौकशीत समोर आली आहे.

 त्यानुसार कुपवाड पोलिसांच्या पथकाने आयुष हेल्पलाइन टिमच्या मदतीने शुक्रवारी दिवसभर कृष्णानदीत शोध मोहीम राबवली. परंतु, सायंकाळी उशिरापर्यंत मृतदेह न सापडल्याने शोधमोहीम थांबवली असून शनिवारी सकाळी पुन्हा सुरु केली जाणार आहे.

   याप्रकरणी कुपवाड पोलिसांनी संशयावरुन संबंधित महिलेच्या पतीसह चार ते पाचजनाणा ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी सुरु केली आहे. याप्रकरणी पोलिसात स्वत:हून हजर झालेला संशयित रमेश सिद्राम सूर्यवंशी (45, रा.कापसे प्लॉट, कुपवाड) यासह अन्य तिघाजणांनी मिळून त्या तरूणाचा खून करून मृतदेह सांगलीच्या कृष्णा नदीत टाकल्याची चर्चा सुरू आहे.

     याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मृत सागर माळी हा तरूण व संशयित रमेश सूर्यवंशी हे दोघे अनेक वर्षापासून कुपवाडमधील कापसे प्लॉट परिसरात रहात होते. सागर व रमेश दोघेही चारचाकी वाहनावर ड्रायव्हर म्हणून काम करतात. दोघे चांगले मित्र असल्याने सागरचे सूर्यवंशी यांच्याघरी सतत येणेजाणे सुरु होते. त्यामुळे सागरचे सूर्यवंशी याच्या पत्नीसोबत अनेक महिन्यापासून अनैतिक संबंध सुरु असल्याचा सूर्यवंशी याला संशय होता. यावरुन सागर व सूर्यवंशी यांच्यात यापूर्वी वारंवार जोरदार वादावादी झाली होती. त्या दोघांतील व पती-पत्नीमधील वाद मिटविण्यासाठी कुपवाडमधील काही लोकांनी मध्यस्थीही केली होती. पण, त्यांना यश आले नाही. त्यानंतर सागर व संशयिताची पत्नी या दोघानी कुपवाडमधून पलायन केले. सागरने त्याच्या घरातून दोन लाखाची रोकड सोबत नेल्याची माहिती यावेळी सागरच्या वडिलांनी पत्रकारांशी बोलताना सांगितली. याबाबत संशयित सूर्यवंशी याने पत्नी घरातून बेपत्ता झाल्याची फिर्याद 19 फेब्रुवारी रोजी कुपवाड पोलिसात दाखल केली. त्यानंतर सूर्यवंशी व त्यांच्या अन्य काही साथीदारांनी बेपत्ता पत्नीचा शोध घेतला असता पत्नी तिचा प्रियकर सागर सोबत इचलकरंजी परिसरात असल्याची माहिती सूर्यवंशीला मिळाली. त्यानुसार सूर्यवंशी यांच्यासह साथीदारांनी गुरूवारी त्यांना शोधून पकडले. त्या दोघांना रात्री कुपवाडमध्ये आणून पत्नीला अज्ञात ठिकाणी ठेवले व सागरला कुपवाड-मिरज रस्त्यावरिल  बडेपीर दर्गा परिसरात नेऊन सूर्यवंशी व त्याच्या अन्य साथीदारानी सागरला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. या मारहाणीत सागरचा जागीच मृत्यू झाला. त्यामुळे सुर्यवंशीसह साथीदारांनी भीतीने खुनाचा पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने सागरचा मृतदेह गुरुवारी मध्यरात्री सांगलीतील कृष्णा नदीच्या पुलावरून वाहत्या पाण्यात फेकून दिल्याची चर्चा कुपवाड परिसरात सुरु आहे.     

   दरम्यान, सागरचा खून करुण मृतदेह नदीत टाकून संशयित सूर्यवंशी शुक्रवारी सकाळी स्वतःहून कुपवाड पोलिसात हजर झाल्याने खुनाची घटना उघड़किस आली. त्यामुळे खड़बडून जागे झालेल्या कुपवाड पोलिसांनी सूर्यवंशी याच्या माहितीवरून खुनाच्या घटनेचा गतीने तपास सुरु केला. पोलिसांनी आयुष हेल्पलाइन टिमच्या मदतीने कृष्णानदीत शुक्रवारी दिवसभर शोध मोहीम राबवली. परंतु, सागरचा मृतदेह सायंकाळी न सापडल्याने शोध मोहीम थांबवली. शनिवारी सकाळपासून पुन्हा मोहिम सुरु करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. शुक्रवारी सायंकाळी पोलिसांनी सूर्यवंशीसह त्याच्या अन्य तीन साथीदारांना ताब्यात घेऊन सखोल चौकशी सुरू केली आहे. संशयितानी तरूणाचा मृतदेह नदीत फेकून दिल्याची कबुली पोलिसांना दिल्यामुळे पोलिसांनी नदीत मृतदेहाची शोध घेतला तरीही मृतदेह हाती लागला नाही. या घटनेची नोंद करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत कुपवाड पोलिसात सुरु होते.