|Tuesday, March 26, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » ‘मन’ की नव्हे ‘काम’ की बात करा!

‘मन’ की नव्हे ‘काम’ की बात करा! 

 

अमर गुरव/   अथणी

 महात्मा बसवेश्वर व त्यांच्या अनुयायी अक्कमहादेवी, शिशुनाळ शरिफ आदींनी आपल्या विचाराद्वारे सर्वांना जोडण्याचे काम केले. महात्मा बसवेश्वरांनी हा कोण, तो कोण असे म्हणण्यापेक्षा सर्वजन आपलेच ही विचारधारा रुजविली. मात्र सध्या देशात सत्तेवर असलेल्या भाजपवाल्यांनी या तत्वांनाच तिलांजली दिली आहे. सत्तेत आल्यानंतर मोदी सरकारने काळा पैसा व रोजगाराचे दिलेले आश्वासन हे आश्वसानच राहिले असून सध्या या आश्वासना पासून दूर राहून स्वच्छ कारभाराची भाषा करत आहेत. मोदी सरकारने मन की बात नव्हे तर काम की करावी, असे टीकास्त्र राष्ट्रीय काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सोडले.

 शनिवारी मुंबई कर्नाटक भागातील अथणी येथे राहु गांधी यांच्या जनाशिर्वाद रॅलीच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. प्रारंभी कर्नाटक प्रदेश काँगेस कमिटीचे अध्यक्ष डॉ. जी परमेश्वर यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. ते पुढे म्हणाले, महात्मा बसवेश्वरांच्या चोरी, हिंसा, असत्य, बढाई व रोष हा संदर्भातील विचारांना भाजपवाल्यांनी तिलांजली दिली आहे. केंद्रात सत्ता उपभोगत असलेल्या नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील भाजपच्या सरकारादेखत निरव मोदी 22 हजार कोटींचा घोटाळा करुन पळून जातो, जय शहाचा व्यवसाय केवळ तीन महिन्याच्या कालावधीत 50 हजाराहून 80 कोटी पर्यंत वाढतो हे नग्न सत्य असून देखील पंतप्रधान मोदी व त्यांचे बाहूले स्वच्छ कारभाराची भाषा करतात. हा समस्त भारतीयांचा अपमानच होय असे ते म्हणाले.

भाजपचे प्रशासन असलेल्या सर्व राज्यात हिंसात्मक घटनांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. दलित, आदिवासी व अल्पसंख्यांक मारले जात आहेत. याचे थोडे देखील चिंतन केंद्र सरकार करत नाही. देशात विकासात्मक कामे केवळ आपणच करत आहोत. अशा बढाया मोदी मारत आहेत.

राज्यातील काँग्रेस सरकारची प्रशंसा

 कर्नाटकातील सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वातील काँग्रेस सरकारची प्रशंसा करताना राहूल गांधी म्हणाले, मोदी सरकारने केवळ मन की बात केली तर सिद्धरामय्या सरकारने कर्नाटकात काम की बात केली आहे. देशातील शेतकरी नैसर्गिक उलथापालथीमुळे संकटात सापडला असताना आपण मोदींना या शेतकऱयांसाठी काही तरी करावे अशी विनंती केली. पण मोदींनी त्याकडे साफ दुर्लंक्ष केले. जेंव्हा हिच बाब कर्नाटकातील सिद्धरामय्या यांच्या निदर्शनास आणून दिली. तेंव्हा त्यांनी तत्काळ कर्नाटकातील शेतकऱयांची साडे आठ हजार कोटी रुपयांची कर्जे माफ केली. तीन लाखा पर्यंत शेतकऱयांना बिनव्याजी कर्ज सुविध उपलब्ध करुन दिली. केंद्रातील भाजप सरकारने संपूर्ण देशातील मागासवर्गीयांच्या विकासासाठी 55 हजार कोटी रुपयांचा निधी दिला. तर कर्नाटकातील काँग्रेस सरकारने केवळ कर्नाटक या राज्यातील मागासवर्गीयांच्या विकासासाठी तब्बल 27 हजार कोटींचा निधी दिला.

 बोले तैसा चाले या संतोक्तीनुसार कर्नाटकातील काँग्रेस सरकार कार्यरत आहे. शेतकऱयांच्या दृष्टीने कर्नाटकातील काँग्रेस सरकारने भाजपपेक्षा तीन पटीने अधिक निधी खर्च केला आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीद्वारे पुन्हा कर्नाटकात काँग्रेसच सत्तेत येईल, असा विश्वास व्यक्त केला.

आधी तुमच्या नेत्यांकडे पहा…

याप्रसंगी बोलताना मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी एकीकडे कर्नाटकास उत्कृष्ट सरकारचा किताब बहाल करतात तर दुसरीकडे कर्नाटक सरकार भ्रष्ट असल्याचा कांगावा करतात. मोदी साहेबांनी काँग्रेस सरकारवर टीका करताना प्रथमत: आपल्या पक्षातील नेत्यांचा विचार करावा. कर्नाटकात भाजप सरकार असताना तत्कालीन मुख्यमंत्री येडियुराप्पा, मंत्री कट्टा सुब्रमण्यम, जनार्दन रेड्डी ही सर्व मंडळी जेलची हवा खाल्ली आहे. पक्षाध्यक्ष अमित शहा यांनीही जेलची संधी उपभोगली आहे. निरव मोदी, विजय मल्या, ललित मोदी हजारो कोटी रुपये घेऊन गायब झाले याबाबत मात्र पंतप्रधान काहीच बोलत नाहीत. आपण मात्र कर्जमाफी, अन्नभाग्य क्षीरभाग्य, शादीभाग्य मनस्वीनी, मैत्रैय, विद्याशिरी, अनिल भाग्य, आरोग्य भाग्य, इंदिरा कँटीन या सारख्या महत्वकांक्षी योजना राबवून देशात राज्याला आदर्श बणविले आहे.

गुजरात मधून क्रांतीची सुरुवात

यावेळी लोकसभेतील काँग्रेसचे पक्षनेते मल्लिकार्जून खर्गे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीतून शेतकरी, गरीब, छोटे व्यवसायिक आदींना कंगाल बनवले आहे. यामुळे केंद्रातील भाजपवर जनता नाराज असून याविरोधात क्रांतीची सुरुवात गुजरात येथून झाली आहे. कर्नाटकात तर भाजप सरकार येणे शक्यच नाही. राज्याची प्रगती सहन न झाल्याने भाजप नेते काँग्रेसवर टीका करत आहेत. कर्नाटकात काँग्रेस सरकारवर कमिशनची टीका करणारे केंद्रातील भाजप सरकारच  99 टक्के कमिशन सरकार असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.

यावेळी विविध मान्यवरांनी देखील आपली मनोगते व्यक्त केली. याप्रसंगी राज्याचे कॉंग्रेस प्रभारी वेणू गोपाल, माजी केंद्रीय मंत्री के. एच. मुणीयप्पा, उर्जा मंत्री डी. के. शिवकुमार, मंत्री एस. आर. पाटील, रोशन बेग, पालकमंत्री रमेश जारकीहोळी, खासदार प्रकास हुक्केरी, एआयसीसी सचिव आमदार सतिश जारकीहोळी, राष्ट्रीय महिला काँग्रेस अध्यक्षा सुस्मिता देव, आमदार गणेश हुक्केरी, विवेकराव पाटील, राज्य महिला काँग्रस अध्यक्षा लक्ष्मी हेब्बाळकर, विरण्णा मत्तीकट्टी, चिकोडी जिल्हा कॉंग्रेस अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे, माजी. आमदार काका पाटील, विरकुमार पाटील, शहाजहान डोंगरगाव, मेहरोज खान, दिग्वीजय पवार देसाई, श्रीमंत पाटील, अरिहंत समुह प्रमुख रावसाहेब पाटील, उत्तम पाटील, केपीसीसी सदस्य किरण पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Related posts: