|Tuesday, March 26, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » देशभरातील खासदारांना उदयनराजेंचे आकर्षण

देशभरातील खासदारांना उदयनराजेंचे आकर्षण 

कमी बोलतात पण कामाची उत्तम मांडणी करतात

प्रतिनिधी/ सातारा

उदयनराजे भोसले हे गेली दहा वर्ष साताऱयातून लोकसभेचे नेतृत्व करतात. मी त्यांना नेहमी दिल्लीत भेटतों. देशभरातील खासदार आम्हाला उदयनराजेंना भेटायचे आहे. ते छत्रपती शिवाजी महाराजांचे वशंज आहेत. भेटल्यानंतर त्यांना खूप आनंद झालेला जाणवतो. ते पुन्हा येवून भेटतात व सांगतात. उदयनराजेंची नम्रता पाहून आम्ही भारावून गेलो. लोकसभेत ते कमी बोलतात. परंतु कामांची मांडणी उत्तम करतात, असे गौरवोदग्रा राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी काढले.

येथील जिल्हा परिषदेच्या मैदानावर खासदार उदयनराजे भोसले यांच्या 51 व्या वाढदिवसानिमित्ताने आयोजित गौरव सोहळयात ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री गिरीश महाजन, मंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री विजय शिवतारे, खासदार विजयसिंह मोहिते -पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी आमदार आनंदराव पाटील, आमदार शंभूराज देसाई, आमदार मोहन कदम, माजी आमदार कांताताई नलावडे, शिवाजीराजे भोसले, सुभाष शिंदे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष सुनील माने, माजी खासदार गजानन बाबर, नगराध्यक्ष माधवी कदम, उपनगराध्यक्ष सुहास राजेमहाडिक, माजी आमदार सदाशिव सपकाळ, विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, प्रभाकर देशमुख, जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास शिंदे, मुख्याधिकारी शंकरराव गोरे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

शरद पवार म्हणाले, सातारकर व मराठी माणसांसाठी उदयनराजे हे नेहमी काम करताना दिसतात. ते काम करतात पण त्याची जाहिरात करत नाहीत. व ज्यांनी त्यांना कामाची संधी दिली. त्यांचे हित ते पाहत असतात. ज्या जिजाऊ मातेने हिंदवी स्वराज्य स्थापनेसाठी छत्रपती शिवाजी महाराजांवर जे आदर्श घातले. तेच आदर्श राजमाता कल्पनाराजेंनी घातले असून त्या आज जनतेत बसल्या आहेत. तुम्ही आदर्श काम करत रहा. तुमच्या कामाला साथ राहिल, असे सांगून शरद पवार यांनी तुम्ही जनतेची कामे अखंडपणे करावे म्हणून उत्तम आरोग्य लाभो असे आर्शिवादही दिले.

दोस्तो कां दोस्त उदयनराजे

पालकमंत्री विजय शिवतारे म्हणाले, काही दिवसांपूर्वी पवारसाहेबांचा कार्यक्रम याच मैदानावर झाला. त्यानंतर हा गर्दीचा दुसरा उच्चांक आहे. दोस्तो कां दोस्त म्हणजे उदयनराजे भोसले. ते सर्वांनाच आपलेसे वाटतात. सर्वांना हवे हवेसे वाटणारे नेते आहेत. व यामध्येच हे त्यांचे यश दडलेले आहे. पालकमंत्री म्हणून सातारा येथे माझी नेमणूक झाल्यानंतर शिवेंद्रराजे, रामराजे, शंभूराजे व उदयनराजे या चार राजामध्ये काम करण्याचे थेडे न कळत दडपण आले. परंतु पालकमंत्री झाल्यावर प्रथमच मी साताऱयात आलो. त्यावेळी शासकीय विश्रामगृहात माझ्या स्वागताला खुद्द उदयनराजे भोसले हे उपस्थित होते. त्यांना पाहताच आता साताऱयात मला काही अडचण येणार नाही. याची खात्री झाली. सर्व सामान्यांसाठी झटणारा नेता व तरुणांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे उदयनराजे भोसले यांना दिर्घायुष्य लाभो, असे नामदार शिवतारे यांनी सांगितले.

जिह्याचा चेहरा मोहरा बदलणारा नेता

मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, उदयनराजे भोसले यांनी त्यांच्या कामाच्या पद्धतीने जिह्याचा चेहरामोहरा बदललेला आहे. ते मंत्रालयात ज्यावेळेस काम घेवून येतात. त्यावेळी आम्हालाच संकोचल्यासारखे वाटते. आम्ही त्यांना म्हणतो तुम्ही महाराज आहात. आम्हाला फोनवरुन जरी काम सांगितले तरी आम्ही करु. परंतु रयतेसाठी झटणारा हा राजा प्रत्यक्ष येवून कामाचा पाठपुरावा करतो. आजही हेलिपॅडवर मुख्यमंत्री व माझे स्वागत करायला ते स्वतः जातीने हजर होते. त्यांची नम्रता त्यांची दोस्ती ही अतुलनिय आहे. त्यांच्याकडून भविष्यात ऐतिहासिक कामे घडावित असे गौरवोदगार त्यांनी काढले.

कराडला विसरु नका

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, आज वाढदिवसानिमित्ताने विकास कामांचा शुभारंभ झाला. उदयनराजे भोसले हे भांडून हट्टाने कामे करुन घेतात. नवीन कामांची यादी नेहमी त्यांच्याजवळ असते. महाराष्ट्राचे नेतृत्व करायची क्षमता उदयनराजे यांच्यामध्ये आहे. ते सातारा जिह्याचे खासदार आहेत. परंतु कराडला त्यांनी विसरु नये. कारण ते कराडचेही खासदार आहेत, असे सांगुन त्यांच्या दिर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

मला विसरु नका

उदयनराजे भोसले सत्काराला उत्तर देताना म्हणाले, मी तुमचाच आहे. माझ्याकडून काही चुक झाली असल्यास विसरुन जावा. व माझ्यावर आहे असेच प्रेम राहू द्या, असे सांगतानाच ते भावूक झाले. उदयनराजेंचे गहिवरलेले शब्द ऐकताना समोरील जनताही थोडी शांत झाली. त्यावर सावरासावरी करताना उदयनराजे भोसले यांनी मन भरुन आले असल्याचे सांगितले. परंतु योगायोग पाहता शरद पवारांचे नाव घेतानाच उदयनराजे का गहिवरले याबाबत काही राजकीय तज्ञ मंडळींमध्ये चर्चा सुरु होती. परंतु उदयनराजे भोसले यांनी सावरासावरी करत काल, आज आणि उद्या मी हेच सांगतो. सत्ता असो अथवा नसो. मी सत्तेला कधीच किमंत देत नाही. मी एकच जिद्द बाळगली आहे. ताकद आहे. व माझ्यात स्वास आहे तोपर्यंत तुम्हा सर्वांसाठी मी जगणार, असे सांगून सर्वांनी अशीच मला साथ द्या, असे आवाहन त्यांनी केले.

प्रास्ताविक शंभूराज देसाई यांनी केले आणि राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने यांनी आभार मानले.

दरम्यान, उदयनराजे यांच्या भाषणाआधी भल्ला मोठा केक स्टेजवर आणण्यात आला. व खासदार शरद पवार यांचा हात हातात घेवून तो केक कापण्यात आला. तसेच त्यानंतर उदयनराजे भोसले यांच्या राजकीय कारकिर्दीवरील चित्रफित दाखवण्यात आली. सर्व कार्यक्रम संपल्यानंतर उदयनराजे भोसले यांना प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा देण्यासाठी भलीमोठी रांग लागली होती. रात्री उशिरापर्यंत हा शुभेच्छांचा वर्षाव सुरु होता. 

Related posts: