|Thursday, January 17, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » पाक मुत्सद्दय़ाविरोधात एनआयएची कारवाई

पाक मुत्सद्दय़ाविरोधात एनआयएची कारवाई 

इंटरपोलला रेड कॉर्नर नोटीस काढण्याची सूचना

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट करणाऱया पाकिस्तानी मुत्सद्दय़ाविरोधात राष्ट्रीय अन्वेषण प्राधिकारणाने (एनआयए) कारवाई करण्यास प्रारंभ केला आहे. अमिर झुबेर सिद्दिकी असे त्याचे नाव आहे. दक्षिण भारतातील इस्रायली आणि अमेरिकन दूतावासांवर दहशतवादी हल्ले करण्याची त्याची योजना होती. तिचा सुगावा लागताच ही कारवाई करण्यात आली आहे.

कागदोपत्री माहिती तयार करण्याचे कार्य जवळपास पूर्ण करण्यात आले असून आता ही माहिती इंटरपोलला सुपुर्द करण्यात येणार आहे. सिद्दिकी याच्या विरोधात भारतात तक्रार नोंदविण्यात आली आहे. तो 2014 मध्ये श्रीलंकेत पाकिस्तानी दूतावासात अधिकारी म्हणून कार्यरत होता. याच काळात त्याने दक्षिण भारतातील अमेरिकन आणि इस्रायली दूतावासांना लक्ष्य बनविण्याचा कट रचला होता.

त्याने आपल्या हस्तकांकरवी चेन्नईतील अमेरिकन दूतावास आणि बेंगळूरमधील इस्रायली व्यापारी दूतावासाची गुप्त पाहणी केली होती. मुंबईवर केलेल्या हल्ल्यासारखा हल्ला करण्याची त्याची योजना होती. यासाठी मालदीवहून दोन दहशतवादी आणले जाणार होते.

सिद्दिकी याची माहिती शिक्षा भोगत असलेला आणखी एक गुन्हेगार सकीर हुसेन याच्याकडून मिळल्यानंतर त्याचा शोध सुरू झाला. सध्या तो पाकिस्तानात असल्याचे वृत्त आहे. मात्र तो अन्य देशांमध्येही प्रवास करता अशी माहिती प्राप्त झाली आहे. अमेरिकेनेही त्याच्यासंबंधी महत्वाची गुप्त माहिती पुरविल्याचे सांगण्यात येत आहे. सिद्दिकी याचे ईमेल अकाऊंटही आता बंद करण्यात आले आहे. राष्ट्रीय अन्वेषण प्राधिकरणाने त्याची गंभीर नोंद घेऊन तपास चालविला आहे. तामिळनाडू पोलिसांशीही संपर्क करण्यात आला असून महत्वाची माहिती मिळविण्याचा प्रयत्न सुरू आहे. कर्नाटक आणि तामिळनाडू राज्यांचे पोलीस याकामी सहकार्य करीत आहेत. लवकरच त्याचा शोध घेण्यात यश येईल, अशा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

Related posts: