|Tuesday, March 26, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » अवयव दानासंदर्भात गोव्यात वाढती सकारात्मकता

अवयव दानासंदर्भात गोव्यात वाढती सकारात्मकता 

महेश कोनेकर/ मडगाव

जन्माला आलेला प्रत्येक माणूस आज ना उद्या मरणारच… मृत्यू अटळ आहे. कुणाला कधी व कसा मृत्यू येईल हे सांगणे कठीण असते, ज्यांची ‘लाईफ लाईन’ संपली तो या जगाचा निरोप घेणारच… मेल्यानंतर आपल्या शवाला काहीच किंमत नसते असे आपण आजवर मानत आलोय, पण आज विज्ञानाने ऐवढी प्रगती केलीय की, आपल्या शरीराचे अनेक अवयव हे इतरांना उपयोगी पडू शकतात. त्यासाठी अवयव दान करण्याची सुविधा आता उपलब्ध झालीय…

मेल्यानंतर हिंदू धर्मात माणसाच्या देहाला अग्नी दिला जातो. देहाची राख होते. ख्रिस्ती व मुस्लिम धर्मात दफन विधी केले जातात, त्यामुळे शव नाश पावतो. मात्र, आपल्या मृत्यूनंतर देखील आपल्या शरीराचे बरेच अवयव हे इतरांसाठी उपयुक्त ठरू शकतात. मात्र, मेल्यानंतर ठराविक वेळात हे अवयव काढून घ्यावे लागतात. उदाहरणार्थ नेत्र (डोळे) मेल्यानंतर सहा तासांच्या आत काढल्यास ते दृष्टीहिनाच्या उपयोगी येतात. त्यांना नव्याने दृष्टी प्राप्त होऊ शकते. एखाद्याच्या जीवनात प्रकाश पडू शकतो, जीवन जगण्याचा आनंद मिळू शकतो.

उमा-सुदेशचा आदर्शवत निर्णय…

उमा व सुदेश मळकर्णेकर या पती-पत्नीने आपल्या शरीराचे सर्व अवयव दान करण्याची इच्छा प्रगट केली आहे. शनिवारी मडगाव रवींद्र भवनमध्ये दक्षिणायन अभियानने अवयव दान करण्यासंदर्भात जागृती तसेच इच्छुकांसाठी कागदोपत्री सोपस्कार पूर्ण करण्याचा उपक्रम राबविला. या उपक्रमाला 150 जणांनी प्रतिसाद दिला. त्यात एक जोडपे नजरेत भरले ते उमा व सुदेश मळकर्णेकर यांचे.

उमा व सुदेश हे दोघेही सुशिक्षित आहेत. त्यात सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेले जोडपे म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. अवयव दान करण्याचा निर्णय अगोदर कुणी घेतला असा सवाल जेव्हा या जोडप्याला केला, तेव्हा हा निर्णय दोघांचाही होता. त्यात एकमत होते असे सांगण्यात आले. गेल्या दोन वर्षामागे मडगाव गोमंत विद्या निकेतनमध्ये सामाजिक परिषदेचे आयोजन केले होते. त्यावेळी अवयव दान संदर्भात जागृती करण्यात आली होती. त्याचवेळी हा निर्णय झाला होता.

अवयव दान करण्यासाठी आपण अर्ज भरणार याची कल्पना आपण उमाला दिली, तेव्हा तिने देखील आपणही अर्ज भरणार असल्याची इच्छा व्यक्त केली. वास्तविक अवयव दान करण्याबरोबरच देहदान करण्याची तयारी आम्ही ठेवली होती. पण, मुलांना कल्पना द्यावी म्हणून जेव्हा हा विषय मुलगी ‘काश्वी’ हिच्याकडे काढला, तेव्हा तिने ‘देहदान’ करणार असला तर आम्हाला देखील हिंदू रिती रिवाजाच्या बंधनात अडकून ठेऊ नका असा सल्ला दिला. खास करून मासिक पाळीच्यावेळी जेव्हा बंधने घातली जातात, त्या बंधनातून मुक्त करा असाच सूर तिने व्यक्त केला. त्यामुळे काहींसा पेच प्रसंग निर्माण झाला.

हिंदू संस्कृती व रिती रिवाजात वाढल्याने एका क्षणात मुलीच्या सांगण्यामुळे हिंदू संस्कृती व रिती रिवाजाची बंधने तोडणे शक्य नव्हते, त्यामुळे देहदान करण्याचा निर्णय रद्द करावा लागला. मात्र, शरीराचे जेवढे अवयव दान करणे शक्य आहे. तेवढे दान करण्याचा निर्णय आम्ही दोघांनी घेतल्याचे सुदेशने सांगितले. त्यात नेत्र व किडणी शिवाय इतर अवयवांचा समावेश आहे.

वडिल करणार नेत्रदान

सुदेशचे वडिल तुळशीदास मळकर्णेकर यांनी यापूर्वीच नेत्रदान करण्याचा निर्णय घेतला आहे. मडगावात सामाजिक परिषद होण्यापूर्वीच त्यांनी म्हापशात अवयव दान संदर्भात झालेल्या एका कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती व त्याच ठिकाणी त्यांनी नेत्रदान करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यांनी सर्व कागदोपत्री सोपस्कार पूर्ण केले आहेत.

तुळशीदास मळकर्णेकर हे गोव्यातील सामाजिक क्षेत्रातील एक नावाजलेले व्यक्तीमत्व. खास करून सहकार चळवळीत त्यांनी उल्लेखनीय योगदान दिले आहे. गोव्याचा स्वातंत्र्य लढा तसेच इतर अनेक घटनांचे ते साक्षिदार आहेत.

एकाच कुटुंबातील तीन व्यक्तींनी अवयव दान करण्याचा निर्णय हा गोव्यातील बहुदा पहिलाच निर्णय असावा. आज अवयव दान करण्याच्या दृष्टीने बऱयापैकी जागृती होत आहे. अनेकजण स्वतःहून त्यासाठी पुढे येत असल्याने अवयव दान करण्यासदंर्भात गोवा राज्य इतरांना आदर्श ठरू शकते. मात्र, अद्यापही व्यापक अशी जागृती होणे आवश्यक आहे. त्या दृष्टीकोनातून मडगावचे उद्योजक दत्ता नायक हे प्रयत्नशील आहेत.

Related posts: