आर्थिक निकषावर शेतकऱयांना आरक्षण द्या – शरद पवार

ऑनलाईन टीम / मुंबई
आर्थिक निकषांवर शेतकऱयांना आरक्षण देण्याची सध्या गरज आहे. त्यामुळे आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिकदृष्टय़ा मागास शेतकऱयांना आरक्षण देण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी मंगळवारी मुंबईत केली.
प्रसारमाध्यमांशी बोलताना शरद पवार म्हणाले, दिवसेंदिवस शेती कमी होत चालली आहे. 82 टक्के लोकांकडे 2 एकरपेक्षा कमी शेती आहे. तर 70 ते 72 टक्के शेतजमीनीला पाणी नाही. त्यामुळे आर्थिक निकषावर शेतकऱयांना आरक्षण द्यायला पाहिजे. कोणत्याही प्रकारची तयारी न करता शेतकऱयांना कर्जमाफी योजनेची घोषणा करण्यात आली. त्यामुळे दिवसेंदिवस लाभार्थी आणि निधीची संख्या कमी होत आहे, असा टोला शरद पवार यांनी लगावला.
मंडल आयोगाची अंमलबजावणी महाराष्ट्रात आधी झाली असून महिला आरक्षणाचा निर्णय झाला होता, तेव्हा मी मुख्यमंत्री होतो. त्यामुळे माझी भूमिका स्पष्ट होती. त्यावर एससी, एसटी आणि ओबीसी यांना घटनेने जे आरक्षण दिले आहे. त्याला धक्का लागता कामा नये. त्या व्यतिरिक्त अन्य घटकांना आर्थिक निकषावर आरक्षण देता येईल, असे यावेळी त्यांनी सांगितले.