|Tuesday, May 21, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » जगासोबत व्यापारासाठी भारत सज्ज

जगासोबत व्यापारासाठी भारत सज्ज 

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे प्रतिपादन : जगाच्या अर्थव्यवस्थेतील सर्वात वेगवान देश

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

जगाच्या सर्वाधिक मुक्त अर्थव्यवस्थांमध्ये भारताचा समावेश असून जगासोबत व्यापार करण्यासाठी देश सज्ज असल्याचे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विदेशी गुंतवणुकीचा पुरस्कार केला. भारत-कोरिया व्यापार परिषदेला मंगळवारी त्यांनी संबोधित केले.

जगाच्या चारही बाजूला नजर टाकल्यास अर्थव्यवस्थेचे तीन महत्त्वपूर्ण घटक एकाचवेळी उपलब्ध असणारे अत्यंत कमी देश दिसून येतील. डेमोक्रेसी (लोकशाही), डेमोग्राफी (लोकसंख्या) आणि डिमांड (मागणी) हे तिन्ही घटक भारतात एकाचवेळी उपलब्ध असल्याचे मोदी म्हणाले.

द्विपक्षीय व्यापार 20 अब्ज डॉलर्सवर

दक्षिण कोरियासोबतचा द्विपक्षीय व्यापार मागील 6 वर्षांमध्ये पहिल्यांदाच 20 अब्ज डॉलर्सच्या पलिकडे पोहोचला आहे. दक्षिण कोरियन कंपन्यांचे नवोन्मेष आणि उत्तम उत्पादन निर्मितीसाठी कौतुक केले जाते. माहिती-तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स, ऑटोमोबाईल आणि स्टील या सर्व क्षेत्रांमध्ये कोरियाने स्वतःचे जागतिक ब्रँड तयार केल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले.

व्यापार अनुकूल वातावरण

खरेदी क्षमतेनुसार भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. लवकरच जीडीपीनुसार जगाची पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होण्याच्या दिशेने भारताची वाटचाल सुरू आहे. आज भारत जगाच्या सर्वात वेगाने वाढणाऱया अर्थव्यवस्थांपैकी एक आहे. त्याचबरोबर भारतात सर्वात मोठी स्टार्टअप इकेसिस्टीम उपलब्ध असल्याचे उद्गार त्यांनी काढले.

परवानाराज संपविण्याच्या दिशेने भारत

सरकार परवानाराजपासून मुक्तीच्या दिशेने वाटचाल करत आहे. औद्योगिक परवान्याची कालमर्यादा तीन वर्षांवरून वाढवत 15 वर्षे आणि त्याहून अधिक करण्यात आली आहे. कोरियाच्या गुंतवणुकीला संरक्षण देण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलली जातील, असे आश्वासन मोदींनी कोरियन उद्योजकांना दिले आहे.

 

Related posts: