|Thursday, August 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » आदर्श ग्रामसेवक पुरस्कार रणजित पाटील यांना प्रदान

आदर्श ग्रामसेवक पुरस्कार रणजित पाटील यांना प्रदान 

प्रतिनिधी/ आजरा

वाटंगी ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक रणजित पाटील यांनी यापूर्वी लाटगांव, एरंडोळ येथे ग्रामसेवक म्हणून काम करीत असताना केलेल्या कामाची दखल घेऊन जिल्हा परिषदेने त्यांना आदर्श ग्रामसेवक पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. कोल्हापूर येथे झालेल्या कार्यक्रमात त्यांना हा पुरस्कार जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सर्जेराव पाटील यांच्या हस्ते व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमणार, आजऱयाच्या सभापती सौ. रचना होलम यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात आला.

अतिशय दुर्गम आणि डोंगराळ भागात असलेल्या लाटगाव व एरंडोळ ग्रामपंचायतीकडे पाटील यांनी 9 वर्षे सेवा केली आहे. सध्या ते वाटंगीसारख्या मोठय़ा ग्रामपंचायतीकडे काम करीत आहेत. लाटगांवपैकी सातेवाडी येथे सौर दुहेरी पंप योजना राबविली. दोन्ही गावात राष्ट्रीय पेयजल योजनेचे काम उत्तम पद्धतीने करून घेतले. ग्रामपंचायत इमारत, सांस्कृतिक हॉल, स्मशान शेड, समाजिक सभागृह, शाळा खोल्या दुरूस्ती, रस्ते, गटर्स, पाणंद रस्ते, नरेगा, पंचायत क्रीडा अभियान, दलित वस्ती सुधार योजना, वृक्षलागवड योजना, शौचालय शंभर टक्के उद्दिष्ट पूर्तता, शंभर टक्के वसुली आदी कामात त्यांनी ठसा उमठविला आहे.

लाटगांव ग्रामपंचायतीला यशवंत ग्रामपंचायत पुरस्कार मिळवून देण्यात योगदान दिले आहे. बचत गटांचा तालुकास्तरावर द्वितीय क्रमांक, संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान, तंटामुक्त, निर्मलग्राम, राजमता जिजाऊ कुपोषण मुक्त अभियान पुरस्कार, स्मार्ट व्हीलेज, पर्यावरण विकासरत्न सलग तीन वर्षे पुरस्कार ग्रामपंचायतींना मिळवून देण्याचे काम त्यांनी केले आहे. त्यांना याकामी सभापती सौ. रचना होलम, सदस्य उदयराज पवार, गटविकास अधिकारी एस. व्ही. केळकर, विस्तार अधिकारी पी. जी. चव्हाण, माळी, एरंडोळ व लाटगांव येथील सरपंच, उपसरपंच, सदस्य व ग्रामस्थांचे सहकार्य लाभले.

         एरंडोळ येथील समान पाणी वाटप योजना आदर्शवत

एका बाजूला तीव्र चढ तर दोन्ही बाजूला तीव्र उतार अशी रचना असलेल्या एरंडोळ गावात ग्रामस्थांना पिण्याचे पाणी देताना ग्रामपंचायतीची दमछाक होत होती. याबाबत ग्रामसेवक पाटील यांनी सरपंच, उपसरंपच व सदस्यांना विश्वासात घेऊन एक अभिनव संकल्पना मांडली. याची माहिती गावातील सर्व ग्रामस्थांना दिली. ग्रामस्थांचे सहकार्य आणि ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने त्यांनी ही योजना राबविण्याचा निर्णय घेतला. गावातील सर्व गल्ल्यांचे सर्वेक्षण करून अतिउंचावरील व अति उतारावरील घरांची लेवल घेतली. त्यानुसार पाणी पुरवठा योजनेच्या नळ कनेक्शन कुटुंबांना देण्यात आली. यामुळे सर्व कुटुंबांना सारखे पाणी मिळू लागले. यामुळे ग्रामस्थांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटून गावात पाण्यावरून होणारे वाद संपविण्यात पाटील यांना यश आले. त्यांच्या या कामाची चर्चा तालुक्यात झाल्यानंतर अनेक गावातील ग्रामपंचायत सदस्यांनी एरंडोळला भेट देऊन नेमकी काय पद्धत राबविली आहे याची माहिती घेऊन आपापल्या गावातही हा प्रयोग राबविण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या गेल्या दहा वर्षातील सेवेत त्यांनी राबविलेला हा प्रयोग सर्वाधिक कौतुकाचा ठरला.