|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » पान एकसाठी इज्तेमावरुन परताना हगलूर जवळील अपघातात पोलिसासह पाचजण ठार

पान एकसाठी इज्तेमावरुन परताना हगलूर जवळील अपघातात पोलिसासह पाचजण ठार 

प्रतिनिधी/ सोलापूर

इज्तेमावरून परतत असताना उभारलेल्या जीपवर कार आदळून झालेल्या भीषण अपघातात एका पोलीस कर्मचाऱयासह पाचजण जागीच ठार झाले आहेत तर, सात जण जखमी झाले आहेत. यापैकी एकाची प्रकृती गंभीर आहे. मंगळवारी पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास सोलापूर-तुळजापूर महामार्गावरील हगलूर येथील हॉटेल शितलजवळ हा अपघात घडला. या अपघातात दोन्ही वाहनांचा चक्काचूर झाला आहे. या अपघातात ठार झालेले मृत जखमी हे बसवणबागेवाडी येथील व मोहोळ तालुक्यातील पेनूर येथील आहेत. दोन्ही स्वतंत्र वाहने घेवून ते सर्वजण औरंगाबाद येथे इज्तेमासाठी गेले होते.

या अपघातात ठार झालेल्यामध्ये पोलीस कर्मचारी मामूद अकलाक पाटील (पटेल) (30) जमीर हुसेन दादासाहेब पाटील (पटेल) (32, रा. दोघेही पेनुर ता. मोहोळ, जिल्हा सोलापूर) कर्नाटकातील अब्दुल हुसेन छप्परबंद (53), टिपूसुल्तान उमरसाब छप्परबंद (26), अमीर हमज लाडसाहेब नंदवाडगी (50, तिघेही रा. बसवनबागेवाडी जि. विजापूर) यांचा समावेश आहे. तर जखमीमध्ये सलमान मुसा पाटील (पटेल) (रा. पेनुर), सोहेल मदार राजनाल (18), इस्माईल नबीसाब वालीकर (26), इमामअली मलिकसाब छप्परबंद (50)  दावलसाब दस्तगीरसाब वालीकर (65, सर्व रा. बसवनबागेवाडी), सुलेमान गनीसाब शेख (25) आणि राजेसाब हुसेनसाब भागेवाडी (वय 40, दोघेही रा. सिध्दापूर, ता. मंगळवेढा, जि. सोलापूर) यांचा समावेश आहे.

औरंगाबाद येथे इज्तेमाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास सोलापूरसह कर्नाटकातील मुस्लीम बांधव मोठय़ा प्रमाणात गेले होते. तेथील कार्यक्रम संपवून परतत असताना या मुस्लीम भाविकांच्यावर काळाने घाला घातला. मयत पोलीस कर्मचारी मामूद अकलाक पाटील (पटेल) जमीर उसेन दादासाहेब पाटील (पटेल) आणि सलमान मुसा पाटील (पटेल, रा. पेनुर) हे तिघे चुलतबंधूही आपल्या होंडासिटी एमएच 12-सीएक्स 1248 या कारमधून इज्तेमाला गेले होते. मंगळवारी सकाळी परतत असताना महामार्गावरील हगलूर हद्दीतील हॉटेल शितलजवळ आले असता शेतातून अचानकपणे त्यांच्या गाडीला आडवे रानडुक्कर आले. या डुक्कराला वाचविण्याच्या नादात चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने गाडीने दोन पलटय़ा खात हॉटेल समोर रस्त्याच्याकडेला उभारलेल्या केए-23एम 4526 या जीपवर जोरदार आदळली. त्यामुळे जीपही पलटी झाली.

हा अपघात इतका भयानक होता की दोन्ही वाहनांचा चक्काचूर झाला. घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरीकांनी आणि इज्तेमावरून परत येणाऱया भाविकांनी गाडय़ात अडकून पडलेल्या भाविकांना बाहेर काढले. पण, यामध्ये होंडा सीटीकारमधील पोलीस कर्मचारी मोमीन पाटील, चुलतभाऊ जमीरहुसेन पाटील यांच्यासह उभारलेल्या जीपमधील टीपूसुलतान छप्परबंद, अमिर नंदवाडगी, अब्दुल छप्परबंद हे पाच जण जागीच ठार झाले.

कर्नाटकातील बसवनबागेवाडी येथील मुस्लीमबांधव चार जीपमधून औरंगाबादला इज्तेमासाठी गेले होते. ही चारही वहाने एकत्र परतत होती. पण, हॉटेल शीतल जवळ आल्यानंतर यापैकी एक जीप पंक्चर झाली. त्यामुळे गाडीचे पंक्चर काढण्यासाठी ही सर्व वाहने थांबली होती. त्यामध्ये अपघातग्रस्त जीपचाही समावेश होता. पण, पहाटेची वेळ असल्याने गाडीतील काही भाविक खाली न उतरता गाडीतच झोपले होते. पण, नियंत्रण सुटलेली कार या जीपवर जोरदार आदळल्याने या जीपमधील टीपूसुलतान छप्परबंद, अमिर नंदवाडगी, अब्दुल छप्परबंद हे तिघेजन जागीच ठार झाले. तर सहाजण गंभीर जखमी झाले. ठार झालेल्यांच्या डोक्यालाच जबर मार बसला होता.

अपघात होताच कार्यक्रमाला गेलेल्या अन्य लोकांनी आसपाच्या लोकांच्या मदतीने पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलीसही घटनास्थाळी तात्काळ दाखल झाले. जखमींना ऍब्युलन्सच्या माध्यमातून उपचारासाठी सोलापूर येथील शासकीय रूग्णालयात तात्काळ हलविण्यात आले. घटनास्थळी पोलीस अधीक्षक एस. विरेश प्रभू, अप्पर पोलीस उपाधीक्षक मिलींद मोहीते, निरिक्षक हेमंत भंगाळे, आदीनी भेट दिली. ठार झालेल्या पाचही जणांचे शासकीय रूग्णालयात शवविच्छेदन करून त्यांचे मृत्यूदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. जखमींच्यावर शासकीय रूग्णालयात उपचार सुरू असून त्यापैकी एकाची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले.