|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » तुझा तू वाढवी आळस

तुझा तू वाढवी आळस 

सुरक्षित सरकारी नोकरी, नियमित वाढणारा महागाई भत्ता, दरवषीची इन्क्रीमेंट, अधूनमधून मिळणारी पगारवाढ वगैरे गोष्टी मिळाल्या की माणूस एकदम सुस्त आणि आळशी होऊन जातो. नोकरीच्या ठिकाणी मजबूत युनियन असते. तस्मात तो साहेबाला देखील भीत नाही. त्यामुळे त्याने आपले काम मनासारखे केले नाही आणि आपण चिडलो तर तो (किंवा ती) सरळ म्हणतात, ‘खुशाल साहेबाकडे जा.’ तुम्हाला-आम्हाला हा अनुभव  अधूनमधून येत असतो. सरकारी कचेरीत कोणत्याही कामानिमित्ताने जायचे म्हटले तरी अंगावर काटा येतो.

तीच गोष्ट सरकारी बँकांची. इथल्या बाबूंची तीन वर्षातून एकदा बदली होते असे म्हणतात. पण बदली होते म्हणजे बहुधा गावातल्या गावात शेजारपाजारच्या कचेरीत होत असणार. कारण कोणत्याही बँकेत काही वर्षे खाते ठेवले की सरावाने सगळे चेहरे ओळखीचे होतात.

एका खूपच मोठय़ा सरकारी बँकेबद्दल पब्लिक नाराज असते. बँकेबद्दल सोशल मीडियावर रोज तक्रारी आढळतात. कर्मचारी काम करीत नाहीत, अरेरावीने बोलतात, लंच अवर नियमानुसार न घेता जास्त वेळ घेतात, कर्ज देताना सामान्य खातेदाराला छळतात, वगैरे आशयाच्या या तक्रारी असतात. अर्थात अशा बँकांमध्ये वाजवीपेक्षा कामाचा रेटा अधिक असल्याने देखील कर्मचारी बेदरकारपणे वागत असू शकतात. गेल्या वषी दारूचे उत्पादन करणारा एक कर्जदार बँकेचे कित्येक कोटी रुपये बुडवून लंडनला पळाला. (पूर्वी लंडनला भारतातून गांधीजी, आंबेडकर, सावरकर वगैरे लोक जात. हल्ली भारतातून कर्जबुडवे फरार लोक जाऊन राहिलेत, पण ते असो. तो वेगळा विषय.)

गेल्या आठवडय़ात आणखीन एक व्यापारी काही हजार कोटीची कर्जे बुडवून नीरवतेने फरार झाला. त्याने दिलेले एक निवेदन आता सर्वत्र प्रसारित झाले आहे. हा व्यापारी म्हणे कर्ज काढण्यासाठी आधी उपरोल्लेखित बँकेतच गेला होता. पण तिथले कर्मचारी लंच अवरचा आनंद घेण्यात मग्न होते. त्यांनी त्याच्याकडे लक्ष दिले नाही. त्याला चांगली सेवा न देता टोलवाटोलवी केली. त्यामुळे वैतागून तो दुसऱया बँकेत गेला. तिथून कर्जे काढली आणि काही दिवसांनी रीतसर गायब झाला. अशा रीतीने कर्मचाऱयांच्या हलगर्जीपणामुळे ही मोठी बँक मोठय़ा एनपीएपासून बचावली.

वाईटातून चांगले निघते ते असे.

Related posts: