|Monday, November 19, 2018
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » गुणवंतांचा गौरव स्तुत्य

गुणवंतांचा गौरव स्तुत्य 

प्रा. सुनंदा शेळके, लेखक मनोहर भोसले जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित

प्रतिनिधी/ जयसिंगपूर

सत्य हेच इश्वर आहे. प्रामाणिकपणे, सत्यनिष्ठेने जगणाऱया आणि लिहिणाऱया लेखकांचे सत्कार झाले पाहिजेत. माणसाचं कर्तृत्व पाहून दिलेला पुरस्कार बळ देणारा असतो. ज्येष्ठ नागरिक सार्वजनिक वाचनालयाच्यावतीने दिलेला पुरस्कार प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन कवयित्री प्रा. सुनंदा शेळके यांनी केले.

येथील ज्येष्ठ नागरिक सार्वजनिक वाचनालय, कवितासागर साहित्य अकादमी यांच्यावतीने कवयित्री प्रा. सुनंदा शेळके यांच्या हस्ते सैनिक टाकळी येथील लेखक मनोहर भोसले यांना ‘जीवनगौरव पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी निवृत्त मेजर निवृत्ती जगताप होते. अजय जाधव, शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख मधुकर पाटील, ज्येष्ठ नागरिक सेवा संघाचे अध्यक्ष डी. बी. चिपरगे, एन. टी. पाटील प्रमुख उपस्थित होते.

समाजात आज काहीतरी अपेक्षा ठेवून पुरस्कार दिले जातात, अशी खंत व्यक्त करून प्रा. शेळके पुढे म्हणाल्या, आजच्या काळात सत्य सांगणे शिष्टाचाराला धरून राहिलेलं नाही. याउलट असत्यच शिष्टाचार बनत आहे. मनात सलणार, खदखदणार सत्य मांडणाराच खरा लेखक असतो. तो जीवन रहस्याच्या शोधात असतो. लेखकाच्या लेखणीतून समाजाच्या हृदयाला भिडणारे, समाजाला आत्मपरीक्षण करायला लावणारे, समाजाला दिशा देणारे साहित्य प्रसिध्द झाले पाहिजे. सत्यभावनेने केलेले लेखन काळाच्या कसोटीला निश्चितच उतरते. मनोहर भोसले हा संवेदनशील मनाचा लेखक त्यापैकीच एक आहे, असे गौरवोद्गार त्यांनी काढले.

सत्काराला उत्तर देताना लेखक मनोहर भोसले म्हणाले, पत्रकारितेनंतर साहित्य निर्मितीकडे वळलो. संवेदनशील मनाला अस्वस्थ करणारे समाजातील वास्तव साहित्यातून मांडले. माझ्या साहित्यनिर्मितीची दखल सरकारने घेतली आणि कठीण समय येता हा पाठ पाचवीच्या पुस्तकात समाविष्ट झाला. मी जिथे राहतो, त्या सैनिक टाकळी गावचे काहीतरी देणे लागतो, या भावनेतून सैनिकांच्या शौर्याचे लिखाण केले, कविताही लिहिल्या. मात्र आज लेखकाला जातीचे निकष लावले जातात, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. समाजात आजही माणुसकीचे, प्रामाणिकपणाचे दर्शन घडते. अडचणीच्या काळात लोक मदतीला धावतात. हे दिसते, तेव्हा माझी लेखणी सरसावते, असेही ते म्हणाले.

ईशस्तवनाने कार्यक्रमास सुरूवात झाली. स्वागत प्राचार्य डी. आर. खामकर यांनी केले. पाहुण्यांची ओळख प्राचार्य बी. बी. गुरव यांनी करून दिली.  आबासाहेब सूर्यवंशी, अजय जाधव यांनी मनोगते व्यक्त केले. जयपाल चौगुले, कवितासागर साहित्य अकादमीचे सुनील पाटील, सौ. संजीवनी पाटील, जयपाल चौगुले, सौ. जया भोसले यांच्यासह ज्येष्ठ नागरिक सेवा संघाचे सदस्य उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. कुमार पाटील यांनी केले. आभार उज्ज्वला आडके यांनी मानले.

Related posts: