|Wednesday, July 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » अमरापूरमध्ये पतीकडून पत्नीचा खून

अमरापूरमध्ये पतीकडून पत्नीचा खून 

खुन्यास बारा तासात पकडले : घरगुती वादातून खून झाल्याची पोलिसांची माहिती

प्रतिनिधी/ कडेगाव

अमरापूर ता. कडेगाव येथे शेतमजूर मल्लप्पा नामदेव कुठेकर ( मूळ रा. हुलजंती. ता. मंगळवेढा जि. सोलापूर सध्या रा. अमरापूर ता. कडेगाव) यांनी पत्नी कमल मल्लाप्पा कुठेकरच्या डोक्यात कुऱहाडीने वार करून खून केला. ही घटना बुधवारी पहाटे चार वाजता घडली. कडेगाव पोलिसांनी आरोपीस चिंचणी वांगी पोलीस स्टेशनच्या हद्दीजवळ कमळापूर येथे पळून जाताना पाठलाग करून पकडले.

 याबाबत कडेगाव पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, कराड विटा रस्त्यावरील अमरापूरच्या हद्दीत दौलतराव मालोजीराव पाटील यांच्या कुकूटपालनाचा व्यवसाय आहे. यामध्ये शेतमजूर म्हणून काम करण्यासाठी मल्लापा कुठेकर व त्यांची पत्नी कमल काही महिन्यापासून कामाला होते. मल्लाप्पा दररोज सकाळी लवकर उठून पोल्ट्री फार्मवरील कोंबडयांना खादय व पाणी घालण्याचे काम करीत असे.

तो राहत असलेल्या ठिकाणापासून काही अंतरावर मालक दौलत पाटील यांच्या असलेल्या घरी शेडची चावी आणण्यासाठी जात होता. मात्र तो बुधवारी सकाळी बराच वेळा झाला तरी आला नाही. तो न आल्याने पाटील यांची आई चावी देण्यासाठी त्याच्या खोलीकडे गेली त्यावेळी त्याच्या घराचा दरवाजा बंद दिसला खेलीजवळ जावून हाक मारून दरवाजा ठोठावण्याचा प्रयत्न केला असता दरवाजा अचानक उघडला.

त्यावेळी खोलीत मल्लापा कुठेकर यांची पत्नी कमला डोक्यात व तोंडावर कुऱहाडीने वार केल्याने मोठया प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने खोलीत रक्ताच्या थारोळयात पडलेली दिसली. त्यांनी ही घटना आपला मुलगा दौलत पाटील यांना दिली. दौलत पाटील यांनी याबाबत माहिती कडेगाव पोलीसांना दिली. पोलीस निरीक्षक के. एस. पुजारी कर्मचाऱयासह घटनास्थळास भेट देवून पंचनामा केला. यावेळी मृतदेहाजवळ कुऱहाड टाकून दिल्याचे आढळून आले. त्यामुळे कुऱहाडीने खून झाल्याचे व पती गायब असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले.

घटनास्थळावरून घरगुती कारणावरून खून झाल्याचा अंदाज पोलिसांनी करून आरोपीस पकडण्यासाठी पथके तैनात केली. त्यांच्या पै पाहुणे यांची माहिती काढली व दोन पथके करून एक कमळापूर तर एक विटा परिसरात पाठवून दिली. आरोपीस बारा तासाच्या आत अटक केली. मयत कमल कुठेकर यांचे शवविच्छेदन कडेगाव येथील ग्रामीव रूग्णालयात करण्यात येवून नातेवाईकांच्या ताब्यात मृतदेह देण्यात आला.