|Saturday, March 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » एलईडी गैरव्यवहार पुन्हा चव्हाटय़ावर येण्याची शक्यता

एलईडी गैरव्यवहार पुन्हा चव्हाटय़ावर येण्याची शक्यता 

प्रतिनिधी/ मिरज

तालुक्यातील 24 ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या लाखो रुपयांच्या एलईडी घोटाळा प्रकरणावर शनिवारी पंचायत समितीच्या मासिक सभेत पुन्हा जोरदार चर्चा होण्याची शक्यता आहे. सभागृह नुतनीकरणाचे कामकाज सुरू असल्याने समितीने ही सभा तालुक्यातील आरग ग्रामपंचायतीच्या कार्यालयात सभापती सौ. जनाबाई पाटील यांच्या अध्यक्षेखाली आयोजित केली आहे.

तालुक्यातील 24 ग्रामपंचायतीमध्ये मोठय़ा प्रमाणात एलईडी घोटाळा झाल्याचे चव्हाटय़ावर आले होते. पंचायत समितीच्या मासिक सभेत यावर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सदस्यांनी सत्ताधारी भाजपाला अनेकवेळा धारेवर धरले आहे. एलईडी प्रकरणात ठेकेदार आणि ग्रामसेवकांनी संगनमत करुन लाखो रुपये हडप केल्याचा सदस्यांचा आरोप आहे. सत्ताधारी भाजपाचे उपसभापती काकासाहेब धामणे यांनी सुध्दा मालगांवमधील एलईडी घोटाळा प्रकरण चव्हाटय़ावर आणून निकृष्ठ दर्जाच्या एलईडीचे काही पुरावेच सभागृहासमोर सादर केले होते. तालुक्यातील एलईडी घोटाळ्यानंतर जिह्यातील एलईडी घोटाळा चव्हाटय़ावर आला होता.

याबाबत सविस्तर चौकशी करुन सभागृहास अहवाल सादर करावा आणि दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी करणारा ठराव झाला होता. याच दरम्यान ग्रामसेवकांनी जिल्हाभर आंदोलन सुरू केल्याने या घोटाळ्याच्या चौकशीला बगल मिळाली होती. गेली दोन महिने झाले तरी, यावर अद्याप अहवाल सादर झालेला नाही. त्यामुळे सदरचा प्रकार आजच्या मासिक सभेत पुन्हा चर्चेला येण्याची शक्यता आहे. केवळ कागदोपत्री ठराव करुन अधिकाऱयांना काय साध्य करावयाचे आहे, असा जाब या सभेत विचारला जाणार आहे. ग्रामसेवकांनी सहकार्याची भुमिका नसेल, तर त्यांच्या गेरव्यवहाराला खतपाणी का घालावयाचे, असा प्रश्न काही सदस्यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे एलईडी घोटाळा प्रकरणावर आज पुन्हा जोरदार चर्चा होण्याची शक्यता आहे.

याशिवाय म्हैसाळ प्रकल्पातून तात्काळ आवर्तन सुरू व्हावे, अशी मागणी करण्याबरोबर नरवाडच्या प्रलंबित पाणी योजनेबाबत काय कारवाई केली, याचाही खुलासा अधिकाऱयांना करावा लागणार आहे. गेल्या काही वर्षांपासून नरवाड पाणी योजनेचे काम ठप्प आहे. अधिकारी आणि ठेकेदारांनी संगनमत करुन योजनेवरील सर्व बिल मात्र हडप केले आहे. नरवाडकर मात्र पाण्याच्या प्रतिक्षेत आहेत. अनेक मासिक सभांमध्ये ठेकेदारांवर कारवाईचा निर्णय झाला असताना, अधिकारी केवळ कागदी घोडे नाचविताना दिसतात. त्यामुळे या अधिकाऱयांना नरवाड पाणी योजनेबाबत कठोर भुमिका घेण्यासाठी काही सदस्य धारेवर धरण्याची शक्यता आहे. त्यामुळे उद्याची ही मासिक सभा वादळी होण्याची शक्यता दिसत आहे.

Related posts: