|Saturday, August 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » मनपा प्रारूप प्रभाग आराखडा निवडणूक आयोगाकडे

मनपा प्रारूप प्रभाग आराखडा निवडणूक आयोगाकडे 

प्रतिनिधी/ सांगली

महापालिका निवडणुकीसाठीचा प्रभाग रचनेचा आराखडा शनिवारी मनपा आयुक्तांनी राज्य निवडणूक आयोगाकडे सादर केला. निवडणुकीसाठी दि 20 मार्च रोजी आरक्षण आणि प्रारूप प्रभाग रचना जाहीर करण्यात येणार आहे. दरम्यान, या आराखडय़ाने मोठे प्रभाग झाले असून अनेक प्रभागांची फोडाफोडी आणि जोडाजोडी झाल्याने इच्छुक चांगलेच धास्तावले आहेत.

महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभाग रचना आणि आरक्षण सोडतीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. यानुसार दोन मे रोजी अंतिम प्रभाग रोजी जाहीर करण्यात येणार आहे. चार नगरसेवकांसाठी एक प्रभाग, सर्व प्रभागात चार सदस्य होत नसल्यास एक-एक प्रभाग तीन आणि पाच सदस्यांचा होईल अथवा दोन प्रभाग तीन सदस्यांचे होतील अशाही सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार मनपाच्या समितीने प्रारूप प्रभाग आराखडा तयार केला आहे. सन 2013 च्या लोकसंख्येनुसार प्रभाग रचना आणि आरक्षित प्रभाग निश्चित करण्यात आले आहेत.

हा आराखडा मनपा आयुक्त रवींद्र खेबुडकर, जिल्हधिकारी विजय काळम-पाटील आणि विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांच्या त्रिस्तरीय समितीने अंतिम करून शनिवारी राज्य निवडणूक आयोगाकडे पाठविला पाठविण्यात आला. 20 मार्च रोजी नागरिकांचा मागास प्रवर्ग व महिलांसाठीचे आरक्षण सोडत काढली जाईल. त्याच्या दिवशी प्रारूप प्रभाग रचना जाहीर केली जाणार आहे. तर दोन मे रोजी प्रभाग रचनेची अंतिम अधिसूचना जाहीर केली जाणार आहे.

 मनपाक्षेत्राची मतदार संख्या पाच लाख चार हजाराच्या आसपास आहे. यानुसार 80 नगरसेवकांसाठी 20 प्रभाग तयार करण्यात आले असून सांगलीवाडी हा भाग पूर्वीप्रमाणेच तीन नगरसेवकांचा ठेवल्याची चर्चा आहे. तर मिरजेतील एक प्रभाग पाच नगरसेवकांचा तर राहिलेले 18 प्रभाग चार  नगररसेवकांचे केल्याची चर्चा आहे. 40 प्रभाग खुल्या प्रवर्गासाठी आहेत. 11 सदस्य अनु. जाती आणि 29 सदस्य नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आहेत. तर महिलांसाठी सर्वच प्रभागात 50 टक्के आरक्षण ठेवण्यात आले आहे. प्रारूप प्रभाग आराखडय़ामध्ये अनेक प्रभागांची तोडाफोड करून जोडाजोड करण्यात आली आहे.

नगरसेवकांनाही फोडाफोडीचा फटका बसणार असल्याने त्यांनीही धास्ती घेतली आहे. प्रथमच एका प्रभागातून चार नगरसेवक निवडून येणार असल्याने प्रभाग मोठे झाले आहेत. यामुळे इच्छुकांची संख्या कमी असली तरी निवडणुकीमध्ये फेस येणार आहे. मोठय़ा प्रमाणात आर्थिक उलाढाली होणार आहेत. प्रभाग रचनेवर बरेच काही अवलंबून असल्याने प्रभाग रचनेची धास्ती विद्यमान नगरसेवकांसह इच्छुकांनी घेतली आहे. काही राजकीय पक्षांच्या नेत्यांनी आपल्या कार्यकर्त्यांच्या सोयीसाठी सोईस्कर प्रभाग रचना करण्यासाठी अधिकाऱयांकडे फिल्ंिडग लावल्याची चर्चा आहे.

मनपा पातळीवरून जिल्हाधिकारी पातळीवर काही प्रमाणात बदल करून तो विभागीय आयुक्त पातळीवर आराखडा गेल्यानंतर तेथेही बदल झाल्याची चर्चा आहे. आता हा आराखडा राज्य निवडणूक आयोगाकडे गेला आहे. यामुळे या आराखडय़ात कोणाचा प्रभाग कसा जोडला आहे. यामुळे कोणाला फायदेशीर तर कोणाला अडचण झाली आहे हे अंतिम प्रभाग रचनेनंतरच स्पष्ट होणार असून दोन मे रोजी अंतिम प्रभाग रचना जाहीर केली जाणार आहे.