|Monday, November 19, 2018
You are here: Home » मनोरंजन » पाच राज्य आणि 30 दिवसात फुर्ररचे चित्रीकरण

पाच राज्य आणि 30 दिवसात फुर्ररचे चित्रीकरण 

मराठी चित्रपट केवळ आशय आणि मांडणीच्या जोरावर सीमा ओलांडतोय असं नाही तर त्याला नवं भौगोलिक परिमाणही लाभत आहे. प्रयोगशील दिग्दर्शक समीर आशा पाटील दिग्दर्शित आणि अँफरॉन एंटरटेन्मेंट निर्मित आगामी चित्रपट ‘फुर्रर’ हा चित्रपट त्याचं उत्तम उदाहरण ठरणार आहे. हा चित्रपट पाच राज्यांमध्ये 30 दिवसांत चित्रीत केला जाणार आहे. त्यामुळे या चित्रपटात नक्कीच काहीतरी वेगळं पाहायला मिळणार आहे.

‘फुर्रर’ या चित्रपटाचा नुकताच मुहूर्त करण्यात आला असून गुजरातमधील सापुरताजवळील डांग गावात सध्या या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू झाले आहे. समीरने त्याच्या ‘चौर्य’ या चित्रपटातही भौगौलिक सीमा ओलांडत चंबळमध्ये चित्रीकरण केलं होतं. आता ‘फुर्रर’ या चित्रपटाच्या निमित्ताने त्याही पुढे जात पाच राज्यांमध्ये चित्रीकरण केलं जाणार आहे. महाराष्ट्रासह गुजरात, राजस्थान, दिल्ली आणि उत्तराखंडमध्ये हे चित्रीकरण होणार आहे. तीस दिवसांमध्ये हे चित्रीकरण करण्याचे नियोजन आहे. चित्रपटात अभिनेते सयाजी शिंदे हे प्रमुख भूमिका  साकारणार असून अन्य कलाकारांची नावेही अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहेत. दिग्दर्शक समीर आशा पाटीलने या चित्रपटाविषयी माहिती दिली. चित्रपटाचे कथानक प्रवासाबद्दल आहे. प्रत्यक्ष प्रवासासह त्यात मानसिक आणि भावनिक प्रवासही आहे. त्यामुळे आम्हाला वेगवेगळय़ा लोकेशनवर जाण्याची गरज होती. हा तसा मोठा प्रवास आहे. त्यामुळे पाच राज्यांमध्ये आम्ही चित्रीकरण करणार आहोत. निर्माते कुशल व अनिरुद्ध सिंग यांनी माझ्या कथानकावर विश्वास ठेवत पूर्ण पाठिंबा दिल्यामुळेच हा प्रवास शक्य होत आहे. कारण या चित्रपटाचा पट मोठा आहे. मात्र, निर्मात्यांनी काहीही तडजोड न करता चित्रपटाच्या मांडणीवर भर दिला आहे. त्यामुळे मराठी चित्रपटात यापूर्वी न दिसलेला परिसर प्रेक्षकांना पहायला मिळेल, असे समीरने सांगितले.

Related posts: