|Wednesday, June 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » सर्वपक्षीय शिष्टमंडळ आज गडकरीना भेटणार

सर्वपक्षीय शिष्टमंडळ आज गडकरीना भेटणार 

प्रतिनिधी/ पणजी

गोव्यातील खाण लीजांचा लिलाव न करता खाण व्यवसाय सुरु ठेवावा, या मागणीसाठी गोव्यातील सर्वपक्षीय शिष्टमंडळ दिल्लीत दाखल झाले आहे. आज सोमवारी हे शिष्टमंडळ केंद्रीय जहाजोद्योगमंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतील. वाहतूकमंत्री सुदिन ढवळीकर यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीत धडकलेल्या या शिष्टमंडळामध्ये सर्वच राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींचा समावेश आहे.

सत्ताधारी भाजपसह विरोधी काँग्रेस पक्ष, मगो, गोवा फॉरवर्ड या पक्षांच्या प्रतिनिधींचा शिष्टमंडळामध्ये समावेश आहे.

गडकरी हेच सध्या आशास्थान

केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन हे शिष्टमंडळ गोव्यातील खाण व्यवसायाची बाजू मांडणार आहे. गोव्यातील खाण लीजांचा लिलाव केला जाऊ नये. त्याचबरोबर लिलाव न करताच खाण व्यवसाय 15 मार्चनंतरही सुरु रहावा अशी मागणी हे शिष्टमंडळ करणार आहे. गोव्यातील खाण व्यवस्थापनाबाबत गडकरी हेच सध्या आशास्थान बनले आहे. केंद्रीयमंत्री नरेंद्रसिंग तोमर हे सध्या दिल्लीत नाहीत. 8 मार्चला ते दिल्लीत पोचतील, त्यामुळे तोमर यांची भेट या शिष्टमंडळाला घेता येणार नाही.

तोमर यांनीच केली होती लिलावाची सूचना

हल्लीच गोव्यात येऊन गेलेले केंद्रीय खाणमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी 2020 पर्यंत गोव्यातील खाण लीजाचा लिलाव करण्याची तयारी करावी, असे स्पष्टपणे सूचित केले होते. खाण लीजांच्या लिलावातून राज्याला मोठय़ा प्रमाणात महसुल प्राप्त होतो. यावरही त्यांना भर दिला होता. पणजीतील एका तारांकित हॉटेलमध्ये ही परिषद झाली होती. या परिषदेला सर्वच राज्यातील प्रतिनिधींची उपस्थिती होती. 

केंद्राच्या प्रतिसादाकडे सर्वांचे लक्ष

केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाला अनुसरुन खाण लिजांच्या लिलावाचा निर्णय घेतला आहे. गोव्यालाही याबाबत केंद्र सरकारने कल्पना दिली आहे. त्यामुळे दिल्लीत गेलेल्या शिष्टमंडळाला केंद्राकडून कोणता प्रतिसाद मिळतो याबाबत गोव्यातील जनतेला मोठी उत्सूकता लागून राहिली आहे. दिल्लीला पोचलेल्या शिष्टमंडळामध्ये सांबाखामंत्री सुदिन ढवळीकर, आरोग्यमंत्री विश्वजित राणे, सभापती प्रमोद सावंत, विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर, आमदार नीळकंठ हळर्णकर, नीलेश काब्राल, दीपक प्रभू पाऊसकर यांचा समावेश आहे. आज सोमवारी सकाळी 10 वाजता हे शिष्टमंडळ केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांची भेट घेणार आहे.