|Monday, July 22, 2019
You are here: Home » क्रिडा » ताल स्मृती रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेत आनंद अजिंक्य

ताल स्मृती रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेत आनंद अजिंक्य 

वृत्तसंस्था/ मॉस्को

वर्ल्ड रॅपिड चॅम्पियन विश्वनाथन आनंदने आपला बहारदार फॉर्म कायम राखताना ताल स्मृती रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेत जेतेपदावर शिक्कामोर्तब केले. इस्त्रायलच्या बोरिस गेलफंडविरुद्ध शेवटच्या फेरीत सहज बरोबरी प्राप्त करत त्याने झळाळत्या चषकावर आपली मोहोर उमटवली. आनंदने येथे शक्य असलेल्या 9 पैकी 6 गुण मिळवले. 4 विजय, 1 पराभव व 4 बरोबरी अशी त्याची एकंदरीत कामगिरी राहिली. अझरबैजानच्या शखरियार मेमेद्यारोव्हविरुद्ध त्याला स्पर्धेतील एकमेव पराभव स्वीकारावा लागला.

सध्या उत्तम बहरात असलेल्या आनंदने येथे इयान नेपोम्नियाची, अलेक्झांडर ग्रिश्चूक व डॅनिल डुबोव्ह, तसेच अमेरिकेच्या हिकारु नाकामुरा यांना पराभूत केले. आठव्या फेरीत ग्रिश्चूकविरुद्धचा विजय जेतेपद संपादन करुन देण्यात विशेष निर्णायक ठरला. आनंदने तेथे पांढऱया मोहऱयांनी खेळताना रोसोलिमो व्हेरियशनवर भर दिला होता.

दोन्ही मास्टर्सनी विरोधी बाजूंनी कॅसलिंग केले आणि त्यानंतर मध्यातच जुगलबंदी रंगत गेली. आनंदने पटावरील गुंतागुंत कमी करत वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी एका प्याद्याचा बळी दिला आणि ग्रिश्चूक त्या चक्रव्युहात अगदी अलगद अडकला. आनंदने नंतरही हत्तीचा बळी देत ग्रिश्चूकला चेकमेट दिली. ही लढत केवळ 30 चालीतच निकाली झाली. वास्तविक, जेतेपदासाठी आनंदला मेमेद्यारोव्हचे तगडे आव्हान होते. पण, आठव्या फेरीत मेमेद्यारोव्हला युवा मास्टर डुबोव्हविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला आणि आनंदच्या मार्गातील मोठा अडथळा आपसूकच बाहेर फेकला गेला.

मेमेद्यारोव्ह, रशियाचा सर्जेई कर्जाकिन व नाकामुरा प्रत्येकी 5 गुणांसह संयुक्त दुसऱया स्थानी तर गेलफंड व ग्रिश्चूक प्रत्येकी 4.5 गुणांसह पाचव्या स्थानी बरोबरीत राहिले. 10 मास्टर्सचा सहभाग असलेली ही स्पर्धा राऊंड-रॉबिन पद्धतीने खेळवली गेली. डुबोव्ह व ब्लादिमिर क्रॅमनिक यांनी प्रत्येकी 4 गुण नोंदवले. पीटर स्विडलर व नेपोम्यिनाची नवव्या स्थानी राहिले. दोनच महिन्यांपूर्वी रियाध येथे वर्ल्ड रॅपिड जेतेपद संपादन करणाऱया आनंदसाठी येथील जेतेपद अर्थातच विशेष महत्त्वाचे ठरले. आता ब्लित्झ स्पर्धेत काही मास्टर्स खेळाडूंची भर पडत असताना तेथेही हाच फॉर्म कायम ठेवण्याचा आनंदचा प्रयत्न असणार आहे.