|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » त्रिपुरापाठोपाठ इतर राज्यांमध्येही पुतळा विटंबना

त्रिपुरापाठोपाठ इतर राज्यांमध्येही पुतळा विटंबना 

पंतप्रधान मोदी यांचा कठोर कारवाईचा इशारा 

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

मंगळवारी त्रिपुरात लेनिन पुतळा पाडविण्यात आल्यानंतर त्याचे लोण आता इतर राज्यांमध्येही पसरले आहे. कोलकत्यात जनसंघाचे संस्थापक डॉ. शामाप्रसाद मुखर्जी यांच्या पुतळय़ाला काळे फासण्यात आले आहे. तर तामिळनाडूत रामस्वामी पेरियार यांच्या पुतळय़ाची नासधूस करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रकारांविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली असून कठोर कारवाई राज्यांनी करावी अशी सूचना केली आहे.

त्रिपुरात मंगळवारी लेनिन यांचा पुतळा पाडविण्यात आला. हे भाजपचे कृत्य असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला. पण भाजपने त्याचा ठाम इन्कार केला. तामिळनाडूतील भाजप नेते एच. राजा यांनी लेनिन नंतर आता पेरीयार यांची वेळ आहे, असा संदेश ट्विट केल्याने खळबळ उडाली होती. बुधवारी राजा यांनी याबद्दल खेद व्यक्त करून पेरीयार यांचा अवमान करण्याचा हेतू नव्हता, असे स्पष्टीकरण दिले आहे.

शामाप्रसाद मुखर्जी पुतळय़ाचा अवमान

कोलकत्यात जनसंघाचे संस्थापक डॉ. शामाप्रसाद मुखर्जी यांच्या पुतळय़ाला काही समाजकंटकांनी काळे फासले. या प्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आली आहे. . तर तामिळनाडूत दोन तरूणांनी मद्यधुंद अवस्थेत रामस्वामी पेरियार यांच्या पुतळय़ाची नासधूस केल्याचे दिसून आले आहे. या दोन तरूणांपैकी एकजण भाजपचा तर एकजण कम्युनिस्ट पक्षाचा असल्याचे सांगण्यात येत आहे. लेनिन पुतळा पाडापाडी विरोधात कोलकता आणि केरळमध्ये डाव्या कार्यकर्त्यांनी  मोर्चाचे आयोजनही केले होते.

राज्यांना दुसरा आदेश

इतिहास प्रसिद्ध व्यक्तींच्या पुतळय़ांची सुरक्षा सुनिश्चित करावी, अशी सूचना केंद्र सरकारने बुधवारी पुन्हा एकदा प्रसिद्ध केली. मंगळवारी रात्रीही अशी सूचना देण्यात आली होती. कायदा सुव्यवस्था ही राज्यांची जबाबदारी असून ती त्यांना योग्य रितीने पार पाडावीच लागेल, असे केंद्र सरकारने दुसऱया आदेशात स्पष्ट केले आहे.