|Friday, April 19, 2019
You are here: Home » क्रिडा » बांगलादेशविरुद्ध वर्चस्व कायम राखण्याचा लंकेचा निर्धार

बांगलादेशविरुद्ध वर्चस्व कायम राखण्याचा लंकेचा निर्धार 

वृत्तसंस्था/ कोलंबो

सलामीच्या लढतीत भारतीय संघाला पराभवाचा दे धक्का देणाऱया यजमान लंकन संघाने आता बांगलादेशचा देखील धुव्वा उडवण्याचा चंग बांधला आहे. येथील टी-20 तिरंगी मालिकेतील राऊंड रॉबिन फेरीत आज (दि. 10) दोन्ही संघ सायंकाळ 7 पासून सुरु होणाऱया लढतीत आमनेसामने भिडतील. लंकेचे अलीकडे बांगलादेशविरुद्ध उत्तम प्रदर्शन राहिले असून यामुळे अर्थातच त्यांचे मनोबल येथे उंचावलेले असेल. यजमान संघाने बांगलादेशला काहीच कालावधीपूर्वे कसोटी, वनडे व त्यानंतर झिम्बाब्वेचा समावेश असलेल्या तिरंगी मालिकेत धूळ चारली होती.

या टी-20 मालिकेत लंकेने भारताविरुद्ध साकारलेला आक्रमक खेळ विशेष लक्षवेधी ठरला. त्यांनी कुशल परेराच्या झंझावाती खेळामुळे पावणेदोनशे धावांचा पाठलाग सहज साकारला. गोलंदाजीच्या आघाडीवर, मध्यमगती गोलंदाज दुष्मंता चमीरा व जीवन मेंडिसच्या वैविध्यपूर्ण माऱयासमोर भारतीय फलंदाजांकडे काहीच चपखल प्रत्युत्तर नव्हते. कुशल मेंडिस व दनुष्का गुणथिलका या सलामीवीरांनी आश्वासक सुरुवात केली. पण, नंतर ते मोठी भागीदारी साकारण्यात अपयशी ठरले. भारताविरुद्ध ती लढत जिंकल्यानंतर कर्णधार दिनेश चंडिमलने विजयाचे श्रेय चंडिका हथुरुसिंघा यांना दिले. चंडिका यापूर्वी बांगलादेश संघाच्या प्रशिक्षकपदी कार्यरत होते.

यापूर्वी, भारताविरुद्ध पराभूत झालेला बांगलादेशचा संघ मात्र सध्या अनेक आव्हानांना सामोरा जात आहे. त्यांचे फलंदाज स्ट्राईक रोटेट करण्यात बराच अपयशी ठरला असून ही त्यांच्यासाठी सर्वात चिंतेची बाब ठरत आहे. स्टार खेळाडू व कर्णधार शकीब-उल-हसनची गैरहजेरी त्यांना प्रकर्षाने जाणवेल, हे देखील जवळपास निश्चित आहे. यापूर्वी, भारताविरुद्ध 6 गडय़ांनी पराभव स्वीकारावा लागल्यानंतर हंगामी कर्णधार महमुदुल्लाहने आपल्या संघाने आणखी 30 धावा जमवणे आवश्यक होते, असे म्हटले होते.

भारताने त्या लढतीत 140 धावांच्या आव्हानाचा सहज पाठलाग केला होता. बांगलादेशचे फिरकीपटू त्यावेळी कोणतीही विशेष कामगिरी करु शकले नव्हते. त्या पार्श्वभूमीवर, यजमान लंकेविरुद्ध यश खेचून आणायचे असेल तर त्यांना आपल्या रणनीतीवर नव्याने विचार करावा लागेल. आजची लढतही गमावली तर दि. 18 रोजी खेळवल्या जाणाऱया या स्पर्धेतील अंतिम लढतीपासून त्यांना दूरच रहावे लागेल, असे संकेत आहेत.

संभाव्य संघ

श्रीलंका : दिनेश चंडिमल (कर्णधार), सुरंगा लकमल, उपूल थरंगा, दनुष्का गुणथिलका, कुशल मेंडिस, दसून शनाका, कुशल जनिथ परेरा, थिसारा परेरा, जीवन मेंडिस, इसुरु उदाना, अकिला धनंजया, अमिला अपोन्सो, नुवान प्रदीप, दुष्मंता चमीरा, धनंजया डिसिल्व्हा.

बांगलादेश : महमुदुल्लाह (कर्णधार), तमिम इक्बाल, सौम्या सरकार, इमरुल कायेस, मुश्फिकूर रहीम, शब्बीर रहमान, मुस्तफिजूर रहमान, रुबेल होसेन, तस्किन अहमद, अबू हिदर, अबू झायेद, अरिफुल हक, नझमूल इस्लाम, नुरुल हसन, मेहदी हसन, लिटॉन दास.

सामन्याची वेळ : सायं. 7 पासून.

Related posts: