|Wednesday, October 16, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » सावंतवाडीत चार बंद बंगले फोडले

सावंतवाडीत चार बंद बंगले फोडले 

एका बंगल्यातून साडेपाच लाखाचा ऐवज लंपास : अन्य बंगल्यांचे मालक मुंबईत : पाचजणांचे टोळके सीसीटीव्हीमध्ये कैद

प्रतिनिधी / सावंतवाडी:

शहरातील सर्वोदयनगर परिसरातील बंद असलेले चार बंगले शुक्रवारी मध्यरात्री चोरटय़ांनी फोडले. एका बंगल्यातील दागिन्यांसह रोख रक्कम असा एकूण साडेपाच लाखाचा ऐवज चोरटय़ांनी लंपास केला. मात्र, उर्वरित तीन बंगल्यातील कुटुंब मुंबईला असल्याने तेथून काय चोरीस गेले, याचा तपशील प्राप्त झालेला नाही. मध्यरात्रीच्या सुमारास पाचजणांच्या टोळीने ही चोरी केल्याचे सीसी टीव्ही  कॅमेऱयात दिसत आहे. त्यामुळे चोरटे सापडतील, असा विश्वास पोलीस निरीक्षक सुनील धनावडे यांनी व्यक्त केला.

सालईवाडा सर्वोदयनगर भागात लोकवस्ती मोठय़ा प्रमाणात आहे. या भागात मोठय़ा संख्येने बंगले आहेत. त्यातील काही कुटुंबीय मुंबई येथे कामानिमित्त गेले होते. ही संधी साधत चोरटय़ांच्या टोळीने रियाज अब्दुल रहमान राजगुरु, व्ही. बी. शिरोडकर, शशिकांत माळकर आणि कै. प्रा. गोपाळराव दुखंडे यांचे बंगले फोडून आतील ऐवज लंपास केला.

राजगुरुंच्या बंगल्यातून दागिने लंपास

राजगुरु कुटुंबीय सहा मार्चला मुंबईला गेले होते. दहा मार्चला ते आपल्या घरी परतले, त्यावेळी त्यांना घराचा पुढील दरवाजा उघडलेल्या स्थितीत दिसला. बंगल्यातील तिन्ही बेडरुमचे दरवाजे उघडे व कपाटे फोडलेली दिसली. तिन्ही कपाटातील सोन्याच्या दागिन्यांसह रोख सहा हजार रुपये चोरीस गेल्याचे निदर्शनास आले. 30 ग्रॅम वजनाचा हार, 20 ग्रॅमची चेन, 25 ग्रॅमचे लॉकेट, 15 ग्रॅमची दोन कडी, सहा ग्रॅमच्या दोन अंगठय़ा, चार ग्रॅमची रिंग, दोन ग्रॅमच्या कानातील वस्तू, 10 ग्रॅमच्या तीन जेन्टस् अंगठय़ा, मंगळसूत्र 20 ग्रॅमचे (70 हजार रुपये) अशा सुमारे 130 ग्रॅम वजनाच्या ऐवजावर चोरटय़ांनी डल्ला मारला.

अन्य तीन बंगलेही फोडले

चारही बंद बंगल्याच्या पुढील दरवाजाची कडी तोडून चोरटय़ांनी आतमध्ये प्रवेश केला. राजगुरु यांच्या घरासमोरील बंद असलेला शशिकांत माळकर यांचा बंगला फोडण्यात आला. आतील कपाटे उघडून ऐवज लंपास केला. तसेच्या त्याच्या मागील परिसरात असलेल्या संस्था लेखापरीक्षक व्ही. बी. शिरोडकर यांचा बंगलाही चोरटय़ांनी फोडला. तर कै. प्रा. गोपाळराव दुखंडे यांचा बंद बंगलाही चोरटय़ांनी फोडला. दुखंडे यांच्या घरातील कपाट फोडून आतील रोख पाच हजार रुपये चोरटय़ांनी लंपास केल्याचे पोलिसांनी सांगितले.

दरम्यान, या चोरीच्या घटनेची माहिती मुंबई येथे गेलेल्या संबंधित घरमालकांना देण्यात आली आहे. ते सावंतवाडीत परतल्यानंतर काय वस्तू चोरीस गेल्या, याबाबत माहिती मिळणार आहे. घटनास्थळी पोलीस निरीक्षक सुनील धनावडे, पोलीस उपनिरीक्षक देवानंद माने, कर्मचारी हरी सावंत, महेश देसाई, वासू परब, अमोल सरंगळे, भूषण मळगावकर आदींनी भेट देत पंचनामा केला. श्वान व ठसेतज्ञाला पाचारण करण्यात आले. तसेच स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पथक दाखल झाले. ‘पवन’ श्वानासेबत पथकाचे शेखर मोरजकर, निखिल चव्हाण,
जयप्रकाश जाधव, स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक पाटील, मनोज राऊत, अनुप खांडे, कृष्णा केसरकर, अमित तेली यांनी पाहणी केली.

बंद बंगल्यांची टेहळणी

चोरटय़ांच्या टोळीने या भागात दिवसाढवळय़ा फिरून बंद बंगल्याची टेहळणी केली अन् एकाच रात्री चार बंद बंगले फोडले. टोळीने वस्तीतून प्रवेश न करता नवीन शिरोडा नाका येथील पांगम यांच्या बंगल्याकडून पाठीमागच्या कंपाऊंडमधून प्रवेश केला, असे पांगम यांनी आपल्या बंगल्याच्या आवारात बसविलेल्या सीसी टीव्ही कॅमेऱयात पोलिसांना दिसून आले आहे.

चोरटय़ांची छबी कॅमेऱयात कैद

पांगम यांच्या सीसी टीव्ही कॅमेऱयात पाच चोरटय़ांची टोळी त्यांच्या बंगल्याच्या गेटपर्यंत आल्याचे दिसत आहे. त्यातील एकाने तोंडाला कपडा गुंडाळलेला आहे. तर दोघांनी डोक्याला कपडा बांधलेला आहे. टोळीने पांगम यांच्या घराच्या आवारात घुसण्यापूर्वी तेथील दोन बंगल्यांची टेहळणी केली. त्यानंतर ही टोळी पांगम यांच्या बंगल्याच्या मागून जातांना त्यांच्या बंगल्यामागे बसविलेला सीसीटीव्ही कॅमेरा फोडला. पोलीस यंत्रणेने सदर फुटेज ताब्यात घेतले आहे.

चोरटे सराईत

या घरफोडीमागे सराईत चोरटे असण्याची शक्यता आहे. ही टोळी परभागातील आहे. कॅमेऱयात कैद झालेल्या चोरटय़ांच्या चेहरेपट्टीवरून पोलीस शोध घेणार आहेत. या भागात प्लास्टिक भांडी विकण्यासाठी परप्रांतीय चार ते पाच व्यक्ती फिरत होत्या, असे तेथील रहिवाशांनी सांगितले. या व्यक्तींनी बंद बंगल्यांची टेहळणी केली असावी, अशी शक्यता आहे.

दरम्यान, कणकवलीनंतर आता चोरटय़ांनी आपले लक्ष सावंतवाडीकडे वळविले आहे. त्यामुळे पोलीस यंत्रणा जागी झाली आहे. गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांच्या होमपीचवर चोरीच्या घटना घडत आहेत. मग पोलीस यंत्रणा असते कोठे, असा सवाल महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे तालुकाध्यक्ष संजू परब यांनी केला.