|Sunday, June 16, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » हेवाळे ग्रा.पं.चे सेंद्रिय खत निर्मिती अभियान

हेवाळे ग्रा.पं.चे सेंद्रिय खत निर्मिती अभियान 

प्रतिनिधी / दोडामार्ग:

हेवाळे गावाने घनकचरा व्यवस्थापनची कास धरत भंगार संकलनानंतर घर तेथे सेंद्रिय खत निर्मिती अभियान हाती घेतले आहे. सरपंच संदीप देसाई यांच्या पुढाकाराने गावात तब्बल तीन सेंद्रिय काजू शेती गट स्थापन करत तब्बल 105 शेतकऱयांना पूर्णतः शासकीय अनुदानातून गांडुळ निर्मिती युनिट बांधून देण्यात आले आहेत. पहिल्या टप्प्यात 70 शेतकरी कुटुंब यात सहभागी झाले असून शनिवारपासून हेवाळे ग्राममध्ये प्रत्यक्ष सेंद्रिय खत निर्मितीला प्रारंभ झाला आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यास स्मार्ट हेवाळे खऱयाअर्थाने सेंद्रिय खत निर्मितीसाठी सुद्धा आदर्श निर्माण करेल, यात शंका नाही.

गेल्या अडीच वर्षात कित्येक अभियान व उपक्रम राबवून आज ग्रामविकासाचे मॉडेल बनू पाहणाऱया हेवाळे ग्रामने तालुका कृषी विभागाच्या सहकार्याने घनकचरा व्यवस्थापन करताना सेंद्रिय खत निर्मितीचा मोठा प्रकल्प हेवाळेवासियांसाठी उपलब्ध करून दिला आहे. गावातील एकूण 137 पैकी 105 शेतकऱयांचा समावेश असलेल्या या सेंद्रिय खत निर्मिती युनिट पैकी 70 शेतकऱयांची युनिट बांधणी पूर्ण झाली असून शनिवारपासून प्रत्यक्ष गांडुळ बेड निर्मिती युनिटमध्ये गांडूळ सोडून खतनिर्मिती प्रात्यक्षिक ग्रामवासीयांना दाखविण्यात आले. या युनिटपासून आता प्रत्येक कुटुंब 40 दिवसात 600 ते 1000 किलो इतके सेंद्रिय खत उत्पादन घेणार आहे. गावात एक कुटुंब जर 40 दिवसात सरासरी 600 किलो सेंद्रिय खत निर्मिती करू लागला तर 105 कुटुंबे 40 दिवसात सुमारे 60 हजार किलोहून अधिक उत्पादन घेऊ शकतात. त्यामुळे सेंद्रिय खत निर्माण करताना घराभोवती दैनंदिन साचणारा ओला व सुका अशा संपूर्ण कुजणाऱया कचऱयाची घरच्या घरी विल्हेवाट लावली जाणार आहे. त्यामुळे सलग दोन वर्षे स्वच्छ ग्राम पुरस्कार विजेत्या हेवाळे गावच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून विशेष कौतुक होत आहे.