|Friday, July 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » चोवीस तास पाणीपुरवठा योजना दिवास्वप्न ठरणार ?

चोवीस तास पाणीपुरवठा योजना दिवास्वप्न ठरणार ? 

प्रतिनिधी / बेळगाव

संपूर्ण शहरात चोवीस तास पाणीपुरवठा करण्याची योजना राबविण्यासाठी महापालिका प्रशासनाने प्रस्ताव तयार केला आहे. सदर योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली होती. पण दोनवेळा निविदा प्रक्रिया राबविण्यात आली होती. मात्र निविदा प्रक्रियेला प्रतिसाद मिळत नाही. यामुळे चौविस तास पाणी पुरवठा योजना दिवास्वप्न ठरणार का? असा मुद्दा उपस्थित झाला आहे.

शहरातील दहा वॉर्डमध्ये चौविसतास पाणी पुरवठा केला जातो. संपुर्ण शहरात चौवीस तास पाणी पुरवठा योजनेचा विस्तार करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. सदर प्रस्ताव राबविण्यासाठी 635 कोटी खर्च अपेक्षित आहे. चौविस पाणी पुरवठा योजना राबविण्यासाठी जागतिक बॅकेने अर्थसहाय्य करण्याची तयारी दर्शविली आहे. शहरातील 48 वॉर्डमध्ये योजनेचा विस्तार करण्यात येणार आहे. योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी जलशुध्दिकरण प्रकल्पाची क्षमता वाढविण्याचा प्रस्ताव होता. यामुळे बसवणकोळ येथे नव्याने जलशुध्दिकरण प्रकल्प निर्माण करण्यात आला आहे. आवश्यक ठिकाणी जलकुंभ उभारण्यात आले आहेत.  काही भागात जलवाहिन्यादेखील घालण्यात आल्या आहेत. पण योजना राबविण्यासाठी कंत्राटदार मिळत नाही. योजना राबविण्यासाठी निविदा काढण्यात आली होती. पण निविदा प्रक्रियेला प्रतिसाद मिळाला नाही. पात्र कंत्राटदाराने निविदेची रक्कम कमी घातल्याने बॅक गॅरंटी देण्याची सुचना करण्यात आली होती. पण बॅक गॅरंटी दिली नसल्याने कंत्राट रद्द करण्यात आले होते.

दुसऱयांदा निविदा मागविण्यात आली होती. पण निविदा प्रक्रियेत एकाही कंत्राटदारांने सहभाग घेतला नाही. यामुळे निविदा प्रक्रियेत तसेच कामकाजात बदल करून नव्याने निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. आतापर्यत दोनवेळा निविदा प्रक्रिया राबविण्यात आली असून आता तिसऱयांदा निविदा मागविण्याची तयारी सुरू आहे. योजना राबविण्यासाठी चार वर्षापासून निविदा प्रक्रिया सुरू आहे.  पण निविदा प्रक्रियेत कंत्राटदार पात्र होत नसल्याने योजनेचे कामकाज रखडले आहे. पाणी पुरवठा योजना राबविण्यास विलंब होत चालल्याने योजनेच्या खर्चाच्या रक्कमेत वाढ होत आहे. योजनेअंतर्गत जलवाहिन्या, जलकुंभ, हिडकल डॅम ते बेळगाव जलशुध्दिकरण प्रकल्पापर्यत पाणी पुरवठा करणाऱया पंपाची क्षमता वाढविण्याचा प्रस्ताव आणि जलशुध्दिकरण प्रकल्प आदी कामे करण्यात येणार होती. पण जलशुध्दिकरण प्रकल्प, जलकुंभ आदी कामे पुर्ण झाली आहेत. तसेच पंपाची क्षमता वाढविण्यासाठी महापालिका सभागृहाने ठराव संमत केला आहे. हा प्रस्ताव शासनाकडे मंजूरीकरिता पाठविण्यात आला आहे. यामुळे उर्वरीत कामे पुर्ण करण्यासाठी निविदा काढण्यात आल्या आहेत. पण कंत्राटदार पात्र होत नसल्याने ही कामे रखडली आहेत.

 वास्तविक पाहता, महापालिकेने दहा वॉर्डमध्ये ही योजना राबवून चौवीस तास पाणी पुरवठा चालविला आहे. याचपध्दतीने प्रत्येकी पाच किंवा दहा वॉर्डमध्ये चौविसपास पाणी पुरवठा योजनेचा विस्तार करण्याची गरज आहे. प्रत्येक पाच वॉर्डमध्ये विस्तार केल्यास योजना मार्गी लागण्याची शक्मयता. पण याबाबत महापालिका प्रशासन कोणताच विचार करीत नाही. यापुर्वी दोनवेळा निविदा प्रक्रिया राबवूनही कंत्राटदार पात्र होत नाही. यामुळे योजनेच्या अंमलबजावणीस विलंब होत आहे. यामुळे चौविस तास पाणी पुरवठा योजना केवळ दिवास्वप्न ठरणार का? असा मुद्दा उपस्थित झाला आहे. योजनेच्या अंमलबजावणीकरिता पर्यायी मार्गाचा अवलंब करण्याची गरज आहे.