|Tuesday, March 26, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » डॉ.पावसकर दांपत्यांचा जामीन अर्ज फेटाळला

डॉ.पावसकर दांपत्यांचा जामीन अर्ज फेटाळला 

जिल्हा सत्र न्यायालयाचा निर्णय

डॉ. करमरकर यांना सशर्त अटकपूर्व जामीन

प्रतिनिधी /रत्नागिरी

ज्ञानदा पोळेकर माता मृत्यू प्रकरणी डॉ. दिपा व डॉ. संजीव पावसकर दांपत्याचा अटकपूर्व जामीन अर्ज सोमवारी जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळून लावला असून डॉ. गिरीश करमरकर यांचा सशर्त अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे डॉ. पावसकर दांपत्यावर अटकेची टांगती तलवार कायम आहे.

रूग्णाची प्रत्यक्ष तपासणी न करता केवळ फोनवरून चर्चा करून औषधोपचार करण अत्यंत चुकीचे असून त्यातून निष्काळजीपणा दिसून येतो. ज्ञानदा पोळेकर माता मृत्यू प्रकरणाच्या सखोल तपासासाठी पोलिसांना स्वातंत्र्य देणे गरजेचे आहे. हे प्रकरण सामाजिकदृष्टय़ाही संवेदनशील असल्याने डॉ. पावसकर दाम्पत्याला अटकपूर्व जामीन मंजुर करू नये अशी विनंती ऍड. संकेत साळवी यांना केली होती. ती मान्य करत न्यायालयाने अटकपूर्व जामीन नाकारला आहे.

ज्ञानदा प्रणव पोळेकर यांचा प्रसुतीनंतर काही दिवसांतच मृत्यू झाला होता. या प्रकरणी डॉ. पावसकर दांपत्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांनी अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला आहे. त्यांच्या या अर्जावर अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश वर्षा दीक्षित यांच्यासमोर सुनावणी झाली. यावेळी पोलीस निरिक्षक विनीत चौधरी यांनी भक्कम बाजू मांडल्यानंतर ऍड. साळवी यांनी प्रभावी युक्तीवाद करत अटकपूर्व जामीन देऊ नये अशी विंनती न्यायालयाला केली.

ज्ञानदा पोळेकर यांच मृत्यू डॉ. पावसकर दाम्पत्यांच्या हलगर्जीपणामुळेच झाला आहे. नर्सच्या जीवावर हॉस्पीटलमध्ये रूग्णांना ठेवणे योग्य आहे का? दहा तास ज्ञानदा पोळेकर यांच्यावर उपचारच झाले नाही, त्यांना वेळीच दुसरीकडे दुसरीकडे हलवण्याचा सल्ला दिला असता तर त्यांचा जीव वाचू शकला असता, असे अनेक मुद्दे ऍड. संकेत साळवा यांनी मांडले.

यावेळी आरोपीच्या वकीलानी उच्च व सर्वोच्च न्यायालयाचे दाखले देत डॉ पावसकर दाम्पत्याला अटकपूर्व जामीन मंजूर करावा अशी विनंती केली. मात्र दाखल्यांमध्ये सांगितलेल्या प्रकरणांमध्ये डॉक्टर प्रत्यक्ष हजर होते. मात्र ज्ञानदा पोळेकर मृत्यु प्रकरणात डॉक्टरांची अनुपस्थिती होती. या प्रकरणात तपास काम प्राथमिक अवस्थेत असल्यामुळे कलम 304 लागू होते की नाही हे आत्ताच निश्चित करणे खूप घाईचे ठरेल. त्यासाठी तपास यंत्रणेला तपास करण्यासाठी पूर्ण स्वातंत्र दिले पाहिजे असा युक्तीवाद ऍड. संकेत साळवी यांनी केला.

दरम्यान, याप्रकरणी डॉ.गिरीष करमरकर यांना अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे. डॉ. करमरकर 10 फेब्रुवारी रोजी रात्री अन्य रूग्णाच्या तपासणीसाठी पावसकर हॉस्पीटलमध्ये गेले होते. नर्सच्या सांगण्यावरून करमरकर यांनी पोळेकर यांची तपासणी केली. यापलीकडे त्यांचा यात वैयक्तीक सहभाग नसल्याने त्यांना कस्टडीची आवश्यकता नाही. मात्र पोलीस कामात सहकार्य करावे अशी भुमिका ऍड. संकेत साळवी यांनी मांडल्याने न्यायालयाने सशर्त अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. दर सोमवारी करमरकर यांनी पोलीस स्थानकात हजेरी लावणे बंधनकारक करण्यात आले आहे.

Related posts: