|Tuesday, March 26, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » विमानतळासाठीचे भूमापन शिरगांव ग्रामस्थांनी रोखले

विमानतळासाठीचे भूमापन शिरगांव ग्रामस्थांनी रोखले 

विश्वासात न घेता प्रशासनाकडून नोटीसा

ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट

जबरदस्ती सहन न करण्याचा इशारा

प्रतिनिधी /रत्नागिरी

रत्नागिरी विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी जमीन संपादनाचा विषय पेटण्याची चिन्हे असून सोमवारी शिरगाव ग्रामस्थांनी जमीन मोजणीची प्रक्रिया बंद पाडली. विमानतळ विस्तारीकरण व त्यासाठीच्या आवश्यक भुसंपदानाबाबत ग्रामस्थांना विश्वासात न घेता भूमिअभिलेख खात्याकडून थेट नोटीसा मिळाल्याने गावकऱयांमध्ये संतापाची लाट आहे. जोरजबरदस्तीने कार्यवाही करू देणार नसल्याचा इशारा देत ग्रामस्थांनी अधिकाऱयांना याबाबतचे निवेदन दिले.

रत्नागिरीतील कोस्टगार्डच्या विमानतळासाठी पूर्वीच्या एमआयडीसीच्या विमानतळाचे विस्तारीकण केले जात आहे. या विमानतळासाठी विस्तारित धावपट्टी तयार करण्याचे काम सुरू आहे. रत्नागिरीच्या सागरी सुरक्षेच्या या विमानतळाचे महत्व असल्याने याचे काम नियोजनबद्ध सुरू आहे.

2009 पासून विमानतळासाठी जागा संपादनाचा विषय ऐरणीवर आहे. त्यावेळी परिसरातील लोकवस्ती उठवण्याच्या हालचाली कोस्टगार्डकडून सुरू होत्या. ग्रामस्थांच्या प्रचंड विरोधानंतर ते प्रकरण न्यायालयातही गेले होते. त्यानंतर आता या विमानतळाच्या धावपट्टीच्या विस्तारीकरणाचा मुद्दा वादग्रस्त ठरण्याची चिन्हे आहेत. विस्तारीत धावपट्टीसाठी शिरगांव तिवंडेवाडी व मिरजोळे परिसरातील अतिरिक्त जमीन संपादित केली जाणार आहे. यासाठी शिरगाव व मिरजोळे ग्रामस्थांना मोजणीबाबतच्या नोटीसा पाठवण्यात आल्या आहेत.

शिरगाव येथील सुमारे अडीचशे ग्रामस्थांना प्रक्रिया सुरू होण्याच्या दोन दिवस आधी या नोटीसा मिळाल्या. या नोटीसा पाठवण्यापुर्वी ग्रामस्थांशी चर्चा होणे गरजेचे होते. पण अचानक हाती पडलेल्या नोटीसांनी येथील ग्रामस्थही अवाप् झालेले आहेत. सोमवारपासून भूमिअभिलेख खात्यामार्फत शिरगांव तिवंडेवाडी परिसरातील जमिन मोजणीची प्रक्रिया सुरू झाल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. प्रशासनामार्फत हुकूमशाहीचे धोरण राबविले जात असल्याचा आक्षेप ग्रामस्थांनी नोंदवत ही प्रक्रिया बंद पाडली. यावेळी मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱयांना शिरगाव ग्रामपंचायतीच्यावतीने निवेदन सादर करण्यात आले आहे.

त्यावेळी सरपंच वैशाली गावडे, शिवसेना शाखाप्रमुख दिपक सनगरे, माजी नगरसेवक सलील डाफळे, ग्रामस्थ सुरेश ठिक, नारायण सनगरे, पांडुरंग सनगरे, रवि घडशी, बाबू ठिक, महेश बाणे, प्रभाकर पानगले, विश्वास ठिक, संजय सनगरे, यशवंत सनगरे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. जोरजबदस्तीने प्रशासनामार्फत सुरू असलेली ही मोजणी करू देणार नसल्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे. या कार्यवाहीवरून शिरगाव व मिरजोळे येथील ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

आज जिल्हाधिकारी कार्यालयात संयुक्त बैठक

विमानतळाच्या धावपट्टीसाठी घेण्यात आलेल्या आक्षेपानंतर प्रशासनाने तात्काळ शिरगाव व मिरजोळे येथील ग्रामपंचायत, ग्रामस्थ व अधिकाऱयांची संयुक्त बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. ही बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील जुन्या इमारतीच्या सभागृहात 13 मार्च रोजी सकाळी 11 वाजता होणार आहे.

Related posts: