|Friday, July 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » जांबावलीचा प्रसिद्ध गुलाल आज

जांबावलीचा प्रसिद्ध गुलाल आज 

प्रतिनिधी/ मडगाव

गोव्यातील विशेषतः मठग्रामातील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या जांबावलीतील श्री दामोदर देवस्थानात आज मंगळवारी मोठय़ा उत्साहात गुलालोत्सव साजरा करण्यात येईल. दुपारी 3 वाजता श्री दामोदरची मूर्ती असलेल्या पालखीवर गुलालाची उधळण करुन या उत्सवाला प्रारंभ होणार आहे.

आज दुपारी जांबावली येथील श्री दामोदर देवस्थानात आरती व महाप्रसाद झाल्यानंतर 3 वा. जांबावली येथील श्री रामनाथ मंदिराच्या प्रांगणात ठेवण्यात येणाऱया श्रींच्या पालखीवर गुलालाची उधळण होईल व त्यानंतर सायंकाळी 5.30 वाजता श्रींची पालखी श्री दामोदर देवस्थानात मिरवणुकीने नेण्यात येईल.

रात्री 10.30 वाजता ‘घर जांव केदेंय दार तेदेंच’ हे विनोदी नाटक सादर करण्यात येईल. नारायण पै फोंडेकर निर्मीत ‘नवरदेवाची वरात’  हा  कार्यक्रम 14 मार्च रोजी मध्यरात्री होईल. बुधवारी 15 मार्च रोजी सकाळी 11 वाजता धुळपेट कार्यक्रमाने गुलालोत्सवाची सांगता हाणार आहे.

चोख पोलीस बंदोबस्त

जांबावली गुलालोत्सवात कोणताच अनुचित प्रकार होऊ नये यासाठी प्रशासनाने कडक पोलीस बंदोबस्त केला असल्याची माहिती दक्षिण गोव्याचे पोलीस अधीक्षक अरविंद गावस यांनी पत्रकारांना माहिती दिली. 350 वाहतूक पोलीस तैनात करण्यात आलेले आहेत. त्याशिवाय कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणखी 350 पोलीस तैनात करण्यात आलेले आहेत.

खिसेकापू व इतर चेरटय़ांवर नजर ठेवण्यासाठी साध्या कपडय़ातील सुमारे 50 खास प्रशिक्षित पोलिसांना तैनात करण्यात आले आहे. शिवाय जांबावली देवस्थानच्या परिसरावर एकंदर नजर ठेवण्यासाठी तीन मनोरे उभारण्यात आलेले असून त्यावरुन पोलिसांची घारीची नजर सर्वत्र फिरणार असल्याची माहिती श्री. गावस यांनी यावेळी दिली.

भाविकांना ‘मेटल डिटेक्टर’मधून जावे लागणार असून अशी चार मेटल डिटेक्टरची व्यवस्था करण्यात आलेली आहे. येणाऱया भाविकांना वाहने पार्क करुन ठेवण्यासाठी खास पार्किंगची सोय करण्यात आलेली आहे. शिवाय या परिसरात गस्त घालणारे एक पथकही ठेवण्यात आलेले असल्याची माहिती श्री. गावस यांनी दिला