|Saturday, August 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » विणकर समाजाने घेतली पोलीस आयुक्तांची भेट

विणकर समाजाने घेतली पोलीस आयुक्तांची भेट 

अभय पाटील,समर्थकांविरूद्ध कारवाई करण्याची मागणी

प्रतिनिधी/ बेळगाव

रविवारी सायंकाळी भाजपच्या बैठकीत विणकर समाजाचे नेते पांडुरंग धोत्रे (वय 48) यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले आहेत. विणकर समाजातील नेते, कार्यकर्त्यांनी सोमवारी सायंकाळी पोलीस आयुक्त व जिल्हाधिकाऱयांची भेट घेवून या प्रकरणी माजी आमदार अभय पाटील व त्यांच्या समर्थकांविरूद्ध कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.

जिल्हाधिकारी कार्यालय आवारात सायंकाळी महिलांनी पोलीस आयुक्त डी. सी. राजप्पा यांना गराडा घातला. आयुक्तांबरोबरच जिल्हाधिकारी झियाउल्ला एस. यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले आहे. आपल्या समाजाच्या नेत्यावर हल्ला करणाऱयांविरूद्ध कडक कारवाई करण्याची मागणी या नेत्यांनी केली आहे. निवेदनात पोलीस दलांवरही आरोप करण्यात आला आहे. दरम्यान पांडुरंग धोत्रे यांच्यावर केएलई इस्पितळात उपचार सुरू आहेत.

परशराम ढगे, विजय सोनटक्की आदींच्या नेतृत्वाखालील विणकर समाजातील प्रमुख नेते व कार्यकर्त्यांबरोबरच विविध संघटनांचे प्रतिनिधी पोलीस आयुक्तांची भेट घेण्यासाठी पोलीस मुख्यालयात गेले होते. मात्र पोलीस आयुक्त जिल्हाधिकारी कार्यालयात असल्याची माहिती मिळताच ते सर्वजण जिल्हाधिकारी कार्यालय आवारात पोहोचले. सायंकाळी बैठक संपल्यानंतर त्यांनी या अधिकाऱयांची भेट घेऊन निवेदन दिले.

रविवारी सायंकाळी 4.45 वाजण्याच्या सुमारास रामनाथ मंगल कार्यालय येथे बैठकीसाठी गेलेले भाजप महानगरचे सचिव पांडुरंग धोत्रे यांच्यावर अभय पाटील, प्रवीण पिळणकर, प्रदीप शेट्टी व इतरांनी हल्ला केला. या घटनेने बेळगावकरांना मोठा धक्का बसला आहे. अभय पाटील व त्यांच्या समर्थकांची ही दादागिरीच आहे. त्यामुळे विणकर समाजाच्या नेत्यावर हल्ला करणाऱयांवर कठोर कारवाई करा, अशी मागणी करण्यात आली आहे.

यापूर्वीही पोलीस, सरकारी अधिकारी, वकील आदींवर दादागिरीचे प्रकार घडले आहेत. सामान्य नागरिकांसाठी दादागिरीचा हा प्रकार धोकादायक ठरत आहे. रविवारी सायंकाळी तर पांडुरंग धोत्रे यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला आहे. टिळकवाडी पोलिसांनी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये येऊन फिर्याद दाखल करून घेतली असली तरी योग्य कलम घातले नाहीत. असा आरोप या नेत्यांनी केला.

कडक कारवाईचे आश्वासन

पांडुरंग धोत्रे यांच्यावर हल्ला करणाऱयांविरूद्ध कडक कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन पोलीस आयुक्तांनी दिले. यावेळी विणकर समाजाबरोबरच विविध संघटनांचे पदाधिकारीही उपस्थित होते. परशुराम ढगे, विजय सोनटक्की, गणेश विणकर, गंगाराम दिवर, प्रसाद जिंदे, उमेश कांबळे, विनायक जिंदे, भारती धोत्रे, रेखा भंडारे, यशोधा धोत्रे, हिरा सुरजकर, रेखा चिल्लाळ, आरती जिंदे, सुधा चौधरी आदींसह 100 हून अधिक जण यावेळी उपस्थित होते.

पोलीस अधिकारी संशयाच्या भोवऱयात

रविवारी सायंकाळी झालेल्या हल्ल्यासंबंधी टिळकवाडी पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला असला तरी पोलिसांनी योग्य कलमे घातली नसल्याचा आरोप विणकर समाजातील नेते, कार्यकर्त्यांनी केला आहे. त्यामुळे टिळकवाडी पोलीस स्थानकातील अधिकारी संशयाच्या भोवऱयात अडकले आहेत. हल्ल्यानंतर पोलिसांनी हल्लेखोरांवर कारवाई करण्यासाठी कसल्याच हालचाली केल्या नाहीत. या उलट पाठिशी घालण्याचा प्रकार सुरू आहे की काय? असा संशय बळावला आहे. गृहमंत्री रामलिंगा रेड्डी यांच्यापर्यंत हे प्रकरण पोहोचल्यानंतरही पोलीस अधिकाऱयांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले नसल्याचे दिसून येते.

विणकर समाजात असंतोष

रामनाथ मंगल कार्यालय येथे रविवारी सायंकाळी घडलेल्या घटनेनंतर विणकर समाजात असंतोष पसरला आहे. आपल्याच समाजातील नेत्यावर हल्ला करण्यापर्यंत मजल मारणाऱया माजी आमदार व त्यांच्या समर्थकांविरूद्ध समाज एकवटू लागला आहे. विधानपरिषद सदस्य एम. डी. लक्ष्मीनारायण यांनी सिव्हिल हॉस्पिटलला भेट देवून पांडुरंग धोत्रे यांना धीर दिला. आपण काँग्रेस पक्षाचे असलो तरी पांडुरंग हे आपल्या समाजाचे आहेत. आपल्या समाजाच्या एका नेत्यावर हल्ला झाला आहे. त्यामुळेच आपण हे प्रकरण गृहमंत्र्यांपर्यंत पोहोचविल्याचे त्यांनी पत्रकारांना सांगितले होते.